दुष्काळ जाहीर करून काजू उत्पादकांना मदत करा : प्रकाश वेळीप

सेंद्रीय काजूंचे गेल्यावर्षी १,९२० टन तर यंदा ९०९ टन उत्पादन झाले. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्केही उत्पादन झालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात काजू दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तसेच ट्रेसनेटवरील माहितीच्या आधारे गेल्यावर्षीपासूनची आधारभूत किंमत द्यावी. - प्रकाश वेळीप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th April, 12:50 pm
दुष्काळ जाहीर करून काजू उत्पादकांना मदत करा : प्रकाश वेळीप

मडगाव : राज्यातील २० टक्के काजू उत्पादकांना आधारभूत किमतीचा लाभ मिळतो. आधारभूत किमतीत वाढ करून ट्रेस नेट साईटवरील माहितीनुसार, गेल्या वर्षापासून उत्पादकांना लाभ द्यावा. सेंद्रीय काजूसाठी हेक्टरी १५ हजार व इतर काजूसाठी १० हजार देण्याची योजना करावी. यंदा कमी उत्पादनामुळे राज्यात काजू दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व राज्याबाहेरील काजू विक्रीला बंदी घालावी, अशा मागण्या आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केल्या आहेत.

प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषद घेत काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. राज्यात सध्या काजूला ११३ रुपये दर आहे. राज्यात ८ हजार हेक्टर जागेवर १६ हजार शेतकरी काजू उत्पादन घेतात. ३,५४६ शेतकरी सेंद्रीय काजू लागवड करतात. सरकारकडून १५० रुपये आधारभूत किंमत मिळत असून १७५ रुपये दर मिळण्याची मागणी केलेली होती. पण, किमान १६० रुपये किंमत द्यावी, अशी मागणी वेळीप यांनी केली.

केवळ २ हजार काजू उत्पादकांकडे कृषी कार्ड आहे. आधारभूत किमतीनुसार उर्वरित ३७ रुपयांचा लाभ हा राज्यातील २० टक्के शेतकऱ्यांना मिळतो. कृषी कार्ड हे सगळ्यांकडे नसणे, कृषी कार्डावर काजू लागवडीची जमीन नमूद असणे, अशा अनेक अडचणी असल्याने आधारभूत किमतीचा लाभ मिळत नाही. टेसनेट तसेच काजू उत्पादक ज्या संस्थांना काजू विक्री करतात, त्यांचे बिल गृहीत धरत शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे वेळीप यांनी म्हटले.

बाळ्ळी येथे २६ रोजी शेतकरी मेळावा

आदर्श कृषी सहकारी खरेदी विक्री प्रक्रिया संस्थेतर्फे २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बाळ्ळी येथील आदर्श कम्युनिटी हॉलमध्ये काजू शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात काजू शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली जाईल. यासाठी कृषी खात्याचे संचालक तसेच मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले आहे.