बिघडलेल्या हवामानामुळे महागाई भडक्याची शक्यता! RBI चा अहवाल जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 09:48 am
बिघडलेल्या हवामानामुळे महागाई भडक्याची शक्यता! RBI चा अहवाल जारी

मुंबई : भारतासह जागतिक पातळीवर हवामानात अचानक तीव्रतेने बदल होत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती आणखी भडक्याची शक्यता आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई दर मागील दोन महिन्यांत सरासरी ५.१ टक्क्यांनंतर मार्चमध्ये ४.९ टक्क्यांवर आला आहे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

‍रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वै-मासिक पतधोरणात मुख्यत्वे करून सीपीआयचा समावेश केला असून, वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करत फेब्रुवारी २०२३ पासून रेपो रेट अर्थात प्रमुख व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या 'स्टेट ऑफ द इकॉनॉमी'च्या लेखात वरील माहिती देण्यात आली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत जागतिक विकासाची गती कायम राहिली आहे. जागतिक व्यापाराचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. ट्रेझरी उत्पन्न आणि तारणावरील व्याजदर मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये वाढत आहेत. कारण व्याजदर कपातीची अपेक्षा धूसर झाली आहे.

वास्तविक जीडीपी वाढीच्या ट्रेंडच्या विस्तारासाठी परिस्थिती निर्माण होत आहे. कारण भारतात गुंतवणुकीत मोठी वाढ होत आहे. व्यवसाय-उद्योगात उत्साह असून ग्राहकांकडून जोरदार खरेदी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान,  जागतिक पातळीवर सरासरी तापमानात वेगाने वाढ होत आहे. त्यासोबतच हवामानात अचानक तीव्र बदल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचा थेट परिणाम अन्नधान्यांच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात त्याचे दूरगामी आर्थिक आणि सामाजिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवामान बदलामुळे चलनविषयक धोरणावर तीन प्रकारे परिणाम होऊ शकतो. पहिला परिणाम म्हणजे, प्रतिकूल हवामानाच्या घटनांद्वारे कृषी उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करते, यातून महागाई वाढते. दुसरे, वाढणारे तापमान आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत होते. त्यामुळे व्याज दर बदलू शकतात, उत्पादकता आणि संभाव्य उत्पादन कमी होऊ शकते. तिसरे, हवामान बदलाचे परिणाम आर्थिक धोरणाच्या परिणामकारकतेमध्ये घरे आणि कंपन्यांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या परिस्थितीवर परिणाम करू शकतात, असेही या आरबीआयने म्हटले आहे.