लोकसभा पहिल्या टप्पयासाठी सरासरी ६३ टक्के मतदान

त्रिपुरात सर्वाधिक, बिहारात सर्वांत कमी


20th April, 12:20 am
लोकसभा पहिल्या टप्पयासाठी सरासरी ६३ टक्के मतदान

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांवर शुक्रवारी मतदान पार पडले. जागांच्या दृष्टीने हा सर्वांत मोठा टप्पा आहे. सायं. ६ पर्यंत ६३ टक्के मतदान झाले होते. त्रिपुरामध्ये सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले, तर बिहारमध्ये सर्वांत कमी ४८ टक्के मतदान झाले.
मागील २०१९ च्या निवडणुकीत या १०२ जागांपैकी भाजपने ४०, द्रमुकने २४ आणि काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या. इतरांना २३ जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये १,४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. ८ केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालही रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण ७ टप्प्यांत ५४३ जागांसाठी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.
काही भागांत हिंसाचाराचे गालबोट
पूर्व इंफाळमधील मोइरांगकंपू येथे निवडणुकीदरम्यान जाळपोळ झाली. येथे हल्लेखोरांनी ईव्हीएम जाळले. छत्तीसगडमधील विजापूर थेथे उसूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील गलगाम येथे ग्रेनेड स्फोटात जखमी झालेल्या सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला. देवेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. मतदान केंद्रापासून ५०० मीटर अंतरावर ग्रेनेडचा स्फोट झाला. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुरई लैखुतलेनबी येथील लोकांचा आरोप आहे की, सशस्त्रासह बदमाश आले आणि त्यांनी मतदान केले. प्रत्यक्ष मतदार आल्यावर त्यांचे मतदान झाल्याचे कळले. त्यामुळे संतप्त लोकांनी ईव्हीएमची तोडफोड केली.

हेही वाचा