जोस बटलरकडून कोलकाता नॉकआऊट! राजस्थानची नाईट रायडर्सवर मात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th April, 12:03 am
जोस बटलरकडून कोलकाता नॉकआऊट! राजस्थानची नाईट रायडर्सवर मात

कोलकाता : रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना केकेआरने सुनील नरेनच्या शतकी खेळीमुळे २२३ धावा केल्या होत्या. मात्र जोस बटलरने शतक लगावत सामना राजस्थानच्या खिशात घातला.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ५० धावांतच संघाने २ मोठे विकेट गमावले. आजच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसन केवळ १२ धावा करून बाद झाला तर यशस्वी जैस्वाल १९ धावा करून बाद झाला. पण रियान पराग अत्यंत तुफानी फलंदाजी करताना दिसला. त्याने ४ चौकार आणि २ षटकार खेचले आणि अवघ्या १४ चेंडूत ३४ धावा केल्या. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या जोस बटलरने राजस्थानकडून सर्वाधिक धावा केल्या. बटलरने ६० चेंडूत १०७ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले.

१० षटकांनंतर राजस्थान रॉयल्सची धावसंख्या ४ बाद १०९ धावा होती आणि संघाला पुढील ६० चेंडूत ११५ धावांची गरज होती. पुढच्या ४ षटकांत संघाने केवळ १९ धावा केल्या तेव्हा आरआरसाठी अडचणी वाढू लागल्या. १५ व्या षटकापासून जोस बटलर आणि रोव्हमन पॉवेल यांनी तुफानी फलंदाजीला सुरुवात केली. शेवटच्या ५ षटकांत संघाला ७९ धावांची गरज होती. पॉवेलच्या १३ चेंडूत २६ धावांच्या खेळीसह आशेची सुरुवात झाली, पण सुनील नरेनच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली.

सामना रोमांचक होत होता आणि राजस्थानला शेवटच्या १२ चेंडूत २८ धावांची गरज होती आणि बटलर अजूनही क्रीजवर होता. १९व्या षटकात १९ धावा आल्या, त्यामुळे राजस्थानला शेवटच्या षटकात फक्त ९ धावांची गरज होती. केकेआरसाठी समस्या वाढली जेव्हा षटकांच्या संथ गतीमुळे, ते शेवटच्या षटकात फक्त ४ खेळाडूंना ३० यार्ड वर्तुळाबाहेर ठेवू शकले. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत बटलरने आरआरला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

जोस बटलरचे ७वे आयपीएल शतक

जोस बटलरने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ७ वे शतक झळकावले. त्याने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या पुढे फक्त विराट कोहली आहे आहे, ज्याने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात ८ शतकी खेळी केली आहेत.

सुनील नरेनने रचला इतिहास

कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना हरला असला तरी सुनील नरेन या सामन्याचा हिरो ठरला यात शंका नाही. या सामन्यात सुनील नरेनने केवळ आयपीएलच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.