गोवा राज्य सेलिंग चॅम्पियनशिपचा समारोप

विंडसर्फिंग वरिष्ठ पुरुष गटात आदर्श चुनेकरला सुवर्ण

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 11:47 pm
गोवा राज्य सेलिंग चॅम्पियनशिपचा समारोप

पणजी : गोवा राज्य सेलिंग चॅम्पियनशिपचा समारोप हवाई बीच, दोनापावला येथे झाला. विंडसर्फर्सने रेसबोर्ड प्रकारात स्पर्धा केली तर इतर सेलर्सनी ऑप्टिमिस्ट श्रेणीत भाग घेतला. 

चॅम्पियनशिपचे संचालन राष्ट्रीय रेस अधिकारी राम लाल यांनी केले, अर्जुन सिंग यांनी त्यांना सहाय्य केले. चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन दिवसांत जोरदार वाऱ्याची परिस्थिती आणि प्रचंड लाटा यामुळे सेलर्सची चांगलीच परीक्षा झाली.

विंडसर्फिंग वरिष्ठ पुरुष गटात आदर्श चुनेकरने सुवर्ण तर अनिल डिसाझाने रौप्यपदक जिंकले. विंडसर्फिंग युवा खुल्या गटात मैथिली असगेकरने सुवर्ण, समिक सातार्डेकरने रौप्य आणि नॅथॅनेल मिनेझिसने कांस्यपदक जिंकले.

‘ऑप्टिमिस्ट’ कनिष्ठ गटात तन्मय चुनेकरने सुवर्णपदक पटकावत रौप्यपदक जिंकणाऱ्या आरोन डिसिल्वाला मागे टाकले. 'ऑप्टिमिस्ट' सब-ज्युनियर गटात पातराव ट्विन्सने दोन पदके जिंकली. अझुरो पातरावने सुवर्ण आणि झेफिर पातरावने कांस्य तर नील करमरकरने रौप्य पदक जिंकले.

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या अंतर्गत गोवा यॉटिंग असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण समारंभाला डॉल्फिन अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचे माल्कम कोएल्हो हे प्रमुख पाहुणे होते आणि विंडसर्फिंगचे माजी राष्ट्रीय विजेते मॅथ्यू गोम्स हे सन्माननीय अतिथी होते.