हेडसमोर बंगळुरूची बत्ती गुल !

सनरायझर्सचा २५ धावांनी विजय : क्लासेनचेही अर्धशतक

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th April, 11:46 pm
हेडसमोर बंगळुरूची बत्ती गुल !

बंगळुरू : सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम खेळताना २८७ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. 

आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करताना, पॉवरप्ले षटकांमध्ये संघाने ७९ धावा केल्यामुळे आशादायक सुरुवात झाली. विराट कोहलीने २० चेंडूत ४२ धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही अर्धशतक लगावले. डू प्लेसिसने २८ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावा केल्या. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन खेळत नसल्याने खालच्या फळीतील फलंदाजीचा भार दिनेश कार्तिक आणि युवा फलंदाजांवर पडला. दिनेश कार्तिकनेही ३४ चेंडूत ८३ धावांची झंझावाती खेळी केली, पण तो आरसीबीला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.


नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २८७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. ८व्या षटकातच अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेल्याने हैदराबादची सुरुवात चांगली झाली. 

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अवघ्या ३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ४१ धावांच्या खेळीत १०२ धावा केल्या. हेडने या काळात ९ चौकार आणि ८ षटकारही मारले. २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्याने हेनरिक क्लासेनच्या बॅटनेही गोलंदा​जांची धुलाई केली. क्लासेनने ३१ चेंडूंच्या खेळीत २ चौकार आणि ७ षटकारांसह ६७ धावा केल्या. एका टोकाकडून आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली.

हैदराबादने पहिल्या १० षटकांत १२८ धावा केल्या होत्या आणि पुढच्या १० षटकांतही धावगती कमी झाली नाही. खरे तर ११व्या षटकानंतर असे एकही षटक नाही ज्यात १० पेक्षा कमी धावा झाल्या असतील. हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला अभिषेक शर्माने २२ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. शेवटी एडन मार्कराम आणि अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. एकीकडे मार्करामने १७ चेंडूत ३२ धावा केल्या तर अब्दुल समदने १० चेंडूत ३७ धावांची झंझावाती खेळी करत हैदराबादने शेवटच्या ५ षटकांत ८२ धावा करून बंगळुरूच्या गोलंदाजांची पिसे काढली. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २७७ धावा केल्या होत्या, पण बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत २८७ धावा केल्या होत्या.

आरसीबीच्या गोलंदाजांची बिकट अवस्था

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला चांगलाच फटका बसला. लॉकी फर्ग्युसनने त्याच्या पुनरागमन सामन्यात २ विकेट घेतल्या, परंतु ४ षटकांत ५२ धावा दिल्या. रीस टोपलीनेही एक विकेट घेतली, पण त्याने ४ षटकांत ६८ धावा दिल्या. तर विजय कुमार विशाक आणि यश दयाल यांनीही आपापल्या ४ षटकांत ५० हून अधिक धावा दिल्या.