यजमान एफसी गोवाकडून चेन्नईयनचा ४-१ गोलने पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th April, 12:10 am
यजमान एफसी गोवाकडून चेन्नईयनचा ४-१ गोलने पराभव

फातोर्डा : एफसी गोवाने घरच्या मैदानावर चेन्नईयन एफसीवर ४-१ असा सफाईदार विजय मिळवत आयएसएल २०२३-२४ हंगामातील गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप घेत उपांत्य फेरीसाठीची दावेदारी कायम ठेवली.

फातोर्डा स्टेडियमवरील संडे स्पेशल लढतीत यजमानांनी प्रतिस्पर्ध्यांवर चार गोल चढवले. त्यातील पिछाडीनंतरचे मध्यंतरापूर्वीचे १५ मिनिटांत ३ गोल त्यांच्या मोठ्या फरकाच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. उत्तरार्धात यजमानांनी आणखी एका गोलची भर घालताना गोलचौकार पूर्ण केला. कार्लोस मार्टिनेझने दोन गोल करताना सलग चौथ्या आणि एकूण १३व्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मध्यंतराला यजमान गोवाने ३-१ अशी आघाडी घेतली. १३व्या मिनिटाला पिछाडीवर पडलेल्या एफसी गोवाने शेवटच्या १५ मिनिटांत ३ गोल करताना जबरदस्त कमबॅक केले. यजमानांनी सुरुवातीला ४-२-३-१ अशा फॉर्मेशनने खेळणे पसंत केले. मात्र, सुरुवातीलाच गोल खावा लागल्याने बचावफळी दडपणाखाली आली. १८ आणि २२व्या मिनिटाला बोर्जा हेरेराने मारलेले चेंडू गोलपोस्टवरून गेले. मात्र, पूर्वार्धातील दुसर्‍या टप्प्यात यजमानांचे सेट पीस यशस्वी ठरले. ३३व्या मिनिटाला बोर्जा हेरेराने डाव्या कॉर्नरने मैदानी गोल करताना एफसी गोवाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

बरोबरीनंतर दोन मिनिटांनी सचू सिबी याला रेड कार्ड दाखवण्यात आल्याने चेन्नईयन एफसीला दहा खेळाडूंसह खेळावे लागला. त्याचा फायदा यजमानांनी उठवला. ३८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर कार्लोस मार्टिनेझने एफसी गोवाला (२-१) आघाडीवर नेले. ३९व्या मिनिटाला आणि अतिरिक्त वेळेत सलग दोन असे तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले तरी यजमानांना गोलसंख्येत भर घालता आली नाही. इंज्युरी टाईममधील तिसर्‍या मिनिटाला नोह सदाओईच्या पासवर ब्रँडन फर्नांडेसने सहा यार्डांवरून केलेल्या अप्रतिम गोलने यजमानांना ३-१ अशा आघाडीवर नेले. कार्लोस मार्टिनेझने ७२व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि एफसी गोवाचा चौथा गोल केला. त्याने उदंता सिंगच्या पासवर चेंडूला अचूक गोलजाळ्यात ढकलले.

निकाल : एफसी गोवा ४ (बोर्जा हेरेरा ३३व्या मिनिटाला, कार्लोस मार्टिनेझ ३८ आणि ७२व्या मिनिटाला, ब्रँडन फर्नांडेस ४५+३व्या मिनिटाला) वि. विजय चेन्नईयन एफसी १ (रहिम अली १३व्या मिनिटाला)