रोहितच्या शतकानंतरही मुंबईचे जहाज बुडाले!

चेन्नईकडून इंडियन्स पराभूत : दुबे, गायकवाडसह पाथिरानाही चमकला

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th April, 12:06 am
रोहितच्या शतकानंतरही मुंबईचे जहाज बुडाले!

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते, परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १८६ धावा करता आल्या. अशाप्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी सामना जिंकला. 

मात्र, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. रोहित शर्माने ६३ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले, पण मुंबई इंडियन्सचा पराभव टाळू शकला नाही. पाथिराना ही मुंबईसाठी मोठी समस्या बनली. त्याने ४ षटकांत २८ धावा देत ४ बळी घेतले.


नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. अजिंक्य रहाणे आज सलामीला आला, पण डावाच्या दुसऱ्या षटकात ५ धावा काढून बाद झाला. रचिन रवींद्रने १६ चेंडूत २१ धावांची खेळी खेळली, पण कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी सर्वाधिक प्रभावित केले. 


एकीकडे गायकवाडने कर्णधारपदाची खेळी खेळताना ४० चेंडूत ६९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत केवळ ५ चौकार आणि ५ षटकार मारले. शिवम दुबेने चेन्नईतर्फे सर्वाधिक धावा केल्या. यात त्याने १० चौकार आणि २ षटकारांसह स्फोटक पद्धतीने ६६ धावा केल्या. यासह चेन्नईचा डाव २०६ धावांवर संपला. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईकडून जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपालने १ तर हार्दिक पांड्याने २ विकेट घेतले.

१५ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या १४९ धावा होती, पण पुढच्या २ षटकांत केवळ १२ धावा झाल्या. त्यामुळे संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडता येणार नाही असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने हार्दिक पांड्याच्या ३ चेंडूत ३ षटकार ठोकले. हार्दिकने टाकलेल्या शेवटच्या षटकात एकूण २६ धावा आल्या, ज्यामुळे चेन्नईने २०६ धावा केल्या. धोनीने अवघ्या ४ चेंडूंत २० धावा केल्या.

शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नई सुपर किंग्जकडून चमकदार कामगिरी केली. दोघांमध्ये ९० धावांची भागीदारी झाली, ज्याने चेन्नईला सामन्यात आघाडीवर आणले. गायकवाडने ४० चेंडूत ६९ धावा केल्या आणि आयपीएल २०२४ मधील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले.