वाढते अपघाती मृत्यू

मार्च आणि एप्रिलचे गेलेले दिवस हे खरे तर अपघातांचे दिवस ठरले. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे अपघात होत राहिले आणि धक्कादायक म्हणजे, त्यात मानवी बळी गेले. प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी या जगाचा अकाली निरोप घेत होता, तो केवळ अपघातात सापडल्याने.

Story: अग्रलेख | |
13th April, 12:36 am
वाढते अपघाती मृत्यू

राज्यात महामार्ग तसेच सर्व्हिस रोडचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले असल्यामुळे वाहनचालकांना प्रशस्त रस्ते प्राप्त झाले आहेत. गुळगुळीत रस्ते एकीकडे तर दुसरीकडे दुर्लक्षित रस्ते, ही काही भागांची व्यथा बनली आहे. एक मात्र खरे की बेशिस्त वाहतुकीमुळे मौल्यवान मानवी बळी गेल्याचे चित्र महिनाभरात गोव्यात दिसले. घरातील कमावता माणूस किंवा रोजंदारीवरील कामगार हा संबंधित कुटुंबाचा पोशिंदा असतो. काही वेळा  उदरनिर्वाहासाठी सारेच कुटुंब राबत असते, अशावेळी एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू हे त्या कुटुंबावर आलेले संकट असते. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणे किंवा भरधाव चालविणे हे केवळ वाहनचालकांवर आलेले संकट नसते, तर पादचारीही त्या कचाट्यात सापडतो आणि आपला जीव गमावून बसतो. मृत्यूला जबाबदार कोण याची चौकशी अपघातानंतर होते, पण गेलेला जीव परत मिळत नाही. अशा स्थितीत अपघात होणे टाळणे कसे शक्य आहे, यावर अधिक विचार व्हायला हवा. 

मार्च आणि एप्रिलचे गेलेले दिवस हे खरे तर अपघातांचे दिवस ठरले. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे अपघात होत राहिले आणि धक्कादायक म्हणजे, त्यात मानवी बळी गेले. सरासरी प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी या जगाचा अकाली निरोप घेत होता, तो केवळ अपघातात सापडल्याने.

पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यात रोज अपघात होत राहिले. कोलवा, नेसाय, कासारवर्णे, बाळ्ळी, पैरा, हरमल, कुळे, हणजूण, थिवी, उस्ते, माशे, बांबोळी, मोले, शिरसई येथील अपघातांत मनुष्यहानी झाली. प्रत्येक ठिकाणी एक-दोघांना प्राण गमवावे लागले. हे त्या कुटुंबावर कोसळलेले संकट होते. हे अपघात का झाले याच्या मुळाशी गेल्यास असे दिसते की, वाहतूक शिस्त पाळली गेली नाही. यापैकी काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले, काही अपघात हे दुसऱ्याने वाहन नियम न पाळल्यामुळे झाले. याचाच अर्थ बेशिस्त वाहतूक पद्धत अवलंबिल्यामुळे सारे अपघात घडले. नियमांचे पालन झाले असते, ते केवळ बळी गेलेल्यांनीच नव्हे तर जे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले, त्यांनीही नियमभंग केल्याने अपघात घडले. धोकादायक वळणे हे गोव्याचे फार जुने दुखणे आहे. संबंधित वळणे किंवा अरुंद रस्ते यावर उपाययोजना करणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आहे. आणखी किती जणांचे बळी घेतल्यावर या कामाला चालना मिळणार आहे, असे संतापजनक प्रश्न नागरिक विचारत असतात. पाहणी, अभ्यास यापेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. यासाठी गरज आहे ती संवेदनशीलतेची. एखाद्या नागरिकाचा अपघाती मृत्यू ही त्या खात्याला आपली नामुष्की वाटेल, त्यावेळीच तत्परता दाखवली जाईल. तसे घडत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. नेतेमंडळी प्रचारात गुंग आहेत. याचबरोबर हेही खरे की प्रशासन यंत्रणा यापासून दूर असायला हवी. ही यंत्रणा कार्यतत्पर असेल तरच अपघात रोखता येतील. वाहतूक पोलीस केवळ दंड वसुलीसाठी नसावेत, वाहतूक शिस्त पाळली जाते की नाही, यावर या विभागाचे अधिक लक्ष हवे. वाहतूक किंवा चालक परवाने देणाऱ्यांवर याची अधिक जबाबदारी आहे. योग्य प्रशिक्षणाशिवाय मिळणारे परवाने हे खरे तर या सर्वांचे कारण आहे. वाहनचालकाला नियमांची माहिती नसल्याने अनेक अपघात होतात. वाहन पुढे कसे न्यावे, यापासून ते वळविताना काय खबरदारी घ्यायला हवी, यापासून ते वाहन कुठे थांबवावे याचीही माहिती बहुतेकांना नसते. छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येताना कोणती काळजी घ्यावी, याचेही ज्ञान अनेकांना नसते. त्यांच्याजवळ दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालविण्याचा कायम परवाना असतो मात्र नियम ठाऊक नसतात. यावर सरकारने तोडगा काढायला हवा. मध्यंतरी तत्कालीन वाहतूक संचालकांनी फोंडा येथे खास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सूतोवाच केले होते. रितसर प्रशिक्षणाशिवाय आणि चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्याशिवाय परवाने मिळू शकणार नाहीत, अशी तजवीज करायला हवी. दंड करून अथवा तालाव देऊन हे होणारे नाही. पर्यटक गोव्यात वाहतूक नियम पाळत नाहीत, कारण या राज्यात कसेही वाहन चालवता येते असा समज पसरला आहे, तो वाहतूक पोलिसांच्या गलथानपणामुळे. नको तेथे शिस्तीचा बडगा उगारण्यापेक्षा नियमपालनावर या विभागाने भर दिल्यास अपघातांची संख्या निश्चितच घटेल. अपघातस्थळी तातडीने रुग्णवाहिका पोचत नसल्याचे प्रकारही टाळण्यासाठी पावले उचलायला हवीत.