कसे ठरतात सोन्या चांदीचे भाव ?

सोन्यातील खरीखुरी गुंतवणूक ही शुद्ध स्वरूपातील सोने खरेदी-विक्री करून होऊ शकते. परंतु सोन्यावर तीन टक्के व त्याचे नाणे किंवा बिस्कीट बनवण्याच्या मजुरीवर पाच टक्के जीएसटी लावला जातो. त्यामुळे त्याच्या हाताळणी खर्चात वाढ होते. याशिवाय त्याला सुरक्षित ठेवण्याची जोखीमही वाढते.

Story: विचारचक्र | |
13th April, 12:31 am
कसे ठरतात सोन्या चांदीचे भाव ?

शेअर बाजाराबरोबर सोन्याच्या भावात झालेली विक्रमी वाढ अनेक पारंपरिक गुंतवणूकदार मित्रांना आकर्षित करीत आहे. ही वाढ चलनवाढीहून किंचित जास्त आहे. त्यामुळे ती सुरक्षित गुंतवणूक म्हणता येईल. खरे तर, गुंतवणूक करणे या हेतूने सोने विकत घेणारे लोक अत्यंत कमी आहेत. सोन्यातील त्यांची गुंतवणूक ही भावनात्मक असते. ते अत्यंत कठीण प्रसंगातही होता होईतो सोने विकत नाहीत. अनेकदा त्याचे दागिने केले जातात. यात घडणावळ जातेच, शिवाय ते मोडताना त्यात घट कापली जाते. याशिवाय दागिने सांभाळण्याची जोखीम असते ती वेगळीच. सोन्याचे दागिने विकून अथवा गहाण ठेवून कर्ज मिळवणे हे आपल्या संस्कृतीत कमीपणाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे एकदा दागिन्यांत रूपांतर झालेले सोने फक्त नवीन पद्धतीचा दागिना निर्माण करण्यासाठी पुन्हा वापरले जाते. लोकांच्या या मानसिकतेत बदल व्हावा म्हणून सरकारने सोन्याच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा ‘सुवर्ण सार्वभौम रोखे’ खरेदी करण्यासाठी वापरला तर त्यावर कोणत्याही भांडवली नफ्याची आकारणी केली जाणार नाही, अशी तरतूद गेल्या वर्षी केली आहे.

सोन्यातील खरीखुरी गुंतवणूक ही शुद्ध स्वरूपातील सोने खरेदी-विक्री करून होऊ शकते. परंतु सोन्यावर तीन टक्के व त्याचे नाणे किंवा बिस्कीट बनवण्याच्या मजुरीवर पाच टक्के जीएसटी लावला जातो. त्यामुळे त्याच्या हाताळणी खर्चात वाढ होते. याशिवाय त्याला सुरक्षित ठेवण्याची जोखीमही वाढते. हा खर्च कमी करण्यासाठी ‘सुवर्ण सार्वभौम रोखे’, ‘इ गोल्ड’, ‘गोल्ड ईटीएफ’, ‘ईजिआर’ यासारखे पर्याय आता गुंतवणुकदारांना उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक गुंतवणूक व्यासपीठावर किमान गुंतवणुकीतही डिजिटल गोल्ड खरेदी-विक्री व्हावी, यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना आपल्या गरजेनुसार योग्य मार्ग शोधता येणे शक्य आहे.

कोविडनंतर जगभरातील अर्थव्यवस्था मंदावली. त्यामुळे बहुतेक सर्व देशांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ज्या योजना राबविल्या त्या योजनांमधील बरीचशी रक्कम ही ‘थेट मदत’ या स्वरूपात होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पैसा बाजारात आला. याचा परिणाम म्हणून कोसळलेला शेअरबाजार सावरून तो नवनवे उच्चांक करू लागला. याच काळात व्याजदर कमी झाल्याने लोक म्युच्युअल फंड योजनांकडे वळले. सध्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून दरमहा १८ हजार कोटीहून अधिक रुपये भांडवल बाजारात येत आहेत. आजवरचा अनुभव असा आहे की, जेव्हा शेअरबाजार वाढतो तेव्हा सोन्याचा भाव स्थिर राहतो. यावेळी प्रथमच शेअरबाजार आणि सोने दोघेही उच्चांकी भाव दर्शवित आहेत. अलीकडे हा भाव वर जाऊन किंचित खाली आला असला तरी भाववाढीच्या तुलनेत तो अत्यल्प आहे.

अर्थव्यवस्था सुधारत असताना सोन्याचांदीच्या औद्योगिक वापरात वाढ होत असल्याने त्याचा मागणीवर प्रभाव पडत आहे. इलेक्ट्रॉनिक, आटोमोटिव्ह आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या उद्योगांमध्ये सोन्याचांदीचा वापर केला जातो.

गेल्या काही महिन्यात विशेषतः ऑक्टोबर २०२३ पासून ज्या गतीने सोन्याच्या भावात वाढ झाली ती पाहता येत्या दिवाळीत दहा ग्रॅम सोन्याचा भाव ७० हजार रुपयांपर्यत जाऊ शकेल असा या क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही एक औस सोन्याचा भाव २०३० डॉलरच्या वर गेला आहे, जो या वर्षभरात लवकरच २३०० डॉलरच्या वर जाईल. तर सन २०२५ मध्ये तो २५०० डॉलर होऊ शकेल असा अंदाज आहे. प्रति एक औस चांदीची किंमत गेल्या वर्षभरात १९ डॉलर होती, ती २६ डॉलरचा उच्चांक गाठून २३ डॉलरवर रेंगाळत आहे. बहुतेक सर्व देशाच्या मध्यवर्ती बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करीत असतात. याप्रमाणे आपली रिझर्व बँकही सोन्याची नियमित खरेदी करीत असते. जुलै १९९१ मध्ये आपल्याकडे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला त्यावेळी आयातीसाठी आणि परकीय कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे काहीच शिल्लक नव्हती. जागतिक बँकेने कर्ज देण्यास नकार दिला होता. अशा वेळी आपल्याकडील सोने गहाण ठेवून पैशांची उभारणी करण्यात आली. फेडरल रिझर्व ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक सोने खरेदी न करता सरकारच्या मालकीच्या सोन्याचे विश्वस्त म्हणून काम पहाते. बाकी बहुतेक सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका नियमित स्वरूपात सोने खरेदी करीत असतात. यामुळे साठा कमी आणि खरेदीदार अधिक अशी परिस्थिती बाजारात निर्माण होते व भाव वाढतात. भाववाढ आणि चलनाचे अवमूल्यन यावर मात करण्यासाठीही (हेजिंग) सातत्याने जगभरातून सोन्यामध्ये गुंतवणूक होत असल्याने सोन्याचांदीचे भाव वाढत असतात.

न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्सचेंज आणि लंडन मेटल एक्सचेंज हे सोन्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होणारे जागतिक बाजार आहेत. येथील चालू भावाचा जगभरच्या बाजारातील सोन्याच्या भावावर परिणाम होतो. जगभरातील बाजारात कुठे ना कुठे सोन्याचांदीचे व्यवहार होत असतात.

याशिवाय सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. २४ कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध असते तर चांदीची शुद्धता संख्येने दर्शवली जाते. “999” असा शिक्का असलेली चांदी सर्वाधिक शुद्ध असते. जितकी शुद्धता अधिक तेवढी अधिक किंमत मिळते. सोने, चांदी यांची खरेदी-विक्री होताना ते बार, लगडी, बिस्कीट, तयार दागिने यापैकी कोणत्या स्वरूपात आहे त्यावरुन त्यांचे भाव निश्चित होतात. अर्थव्यवस्था अस्थिर असली की लोकांचा चलनावरील विश्वास कमी होतो व ते गुंतवणुकीचे पर्यायी मार्ग शोधतात. त्यामुळे जगभर असुरक्षिततेच्या भावनेतून सोन्याची सातत्याने खरेदी होत असते.

थोडक्यात घाऊक बाजारातील सोन्याचांदीचे भाव हे शुद्धता, वजन, आकारमान, औद्योगिक मागणी, अर्थव्यवस्थेची स्थिती, भूराजकीय परिस्थिती यावर अवलंबून असतात. सोन्याचांदीची दुर्मिळता, रोकडसुलभता आणि सर्वंमान्यता या गुणांमध्ये आता मोठ्या परताव्याची शक्यता हाही गुणधर्म जोडला गेल्याने त्याच्या भावात उत्तरोत्तर वाढ होत राहील. याच बरोबरीने अमेरिकेत नवीन सरकार स्थापन होऊन त्यांचे जे औद्योगिक धोरण ठरेल तोपर्यंत या वाढीस लगाम बसणे अशक्य आहे, असे वाटते. तेव्हा आज जास्त वाटणारा भाव अजून आठ महिन्यांनी कमी वाटण्याची शक्यता कदाचित जास्त आहे. आपल्या गुंतवणुकीतील पाच टक्के ते दहा टक्के वाटा सोन्यामध्ये असावा असे गुंतवणुकतज्ञांचे मत आहे. त्या दृष्टीने ज्यांना शक्य असेल त्यांनी सोन्यात गुंतवणूक करायला आणि असलेल्यांनी ती वाढवायला हरकत नसावी. आपल्या आवश्यकतेनुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा खात्रीपूर्वक माहितीचा विचार करून सोन्याचांदीची विविध पर्याय उपलब्ध आहेत. तेव्हा खात्रीपूर्वक माहितीचा विचार करून सोन्याचांदीची खरेदी/ विक्री करणे किंवा ‘जैसे थे स्थिती’ कायम ठेवणे याविषयी गुंतवणुकदारांनी निर्णय घ्यावा.

उदय पिंगळे