बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th April, 04:23 pm
बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

पणजी : छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी चिखली चर्चचे धर्मगुरु बोलमॅक्स परेरा याच्या विरोधात वास्को पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याबाबतचा निवाडा न्या. महेश सोनक आणि न्या. वाल्मिकी मिनिझीस या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे.

वास्कोतील चिखली चर्चचे धर्मगुरु बोलमॅक्स परेरा यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये चर्चमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याच्यांविरोधात राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत माफी मागितली होती. दरम्यान शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल किरण नाईक यांनी संघटनेतर्फे वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. 

त्यानंतर वास्को पोलिसांनी परेरा यांच्याविरोधात भा.दं.सं.च्या कलम २९५, ५०४ खाली गुन्हा नोंद केला. त्यानंतर परेरा यांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना २० हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच किमतीचा हमीदार व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर परेरा यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वरील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. त्यात त्यांनी राज्य सरकार, वास्को पोलीस आणि किरण नाईक यांना प्रतिवादी केले.या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर परेरा याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा  रद्द करण्याचा आदेश देण्यात आला 

हेही वाचा