स्पोर्टिंगने रोखली बंगळुरूची अपराजित वाटचाल; अखेरच्या मिनिटांत विजयी गोल

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th April, 11:57 pm
स्पोर्टिंगने रोखली बंगळुरूची अपराजित वाटचाल; अखेरच्या मिनिटांत विजयी गोल

पणजी : माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आदिल खान याने सामना संपण्यास पाच मिनिटे असताना बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरताच लगावलेल्या गोलाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब दी गोवाने अव्वल स्थानावरील एससी बंगळुरूचा गुरुवारी पराभव केला. वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या द्वितीय विभागीय आय-लीग स्पर्धेतील सामन्यात स्पोर्टिंगने ४-३ असा विजय साकार केला.

अ‍ॅलिस्टर अँथनी, डॉयल आल्वेस व बिस्वा दार्जी यांनीदेखील स्पोर्टिंगकडून गोल केला. सलग तिसर्‍या विजयासह स्पोर्टिंगने ११ सामन्यांतून १९ गुणांसह चौथा क्रमांक मिळविला आहे. गोव्याच्या स्पोर्टिंगने या विजयासह बंगळुरूची सलग सात सामन्यांची अपराजित मालिका खंडित केली. या पराभवानंतरही बंगळुरूचा संघ २४ गुणांसह पहिले स्थान टिकवून आहे.


स्पोर्टिंगने या सामन्याला अनपेक्षित सुरुवात केली. सामना सुरू होऊन मिनिटभराचा खेळ झालेला असताना रोहन रॉड्रिग्ज याने विंगेतून धाव घेताना चेंडू डॉयल आल्वेस याला पास केला. डॉयलला रोखण्याच्या प्रयत्नात बंगळुरूला चेंडूवर ताबा राखता आला नाही. मोकळ्या चेंडूवर अ‍ॅलिस्टर अँथनी याने ताबा मिळवत अप्रतिम मैदानी फटक्यासह बंगळुरूचा गोलरक्षक नीरज कुमारला चकवत स्पोर्टिंगला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

बंगळुरूने या पिछाडीनंतर स्वतःला सावरताना चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण राखण्यावर लक्ष केंद्रीत केले. यानंतर त्यांच्या श्रवण शेट्टी याने बॉक्समध्ये प्रवेश करून गोल नोंदविण्याचा केलेला प्रयत्न स्पोर्टिंगचा कर्णधार जोयल कुलासो याने यशस्वी होऊ दिला नाही.

१४व्या मिनिटाला प्रतिबंधित क्षेत्रात श्रवण याला अवैधरित्या पाडल्याचे कारण देत रेफ्रींनी बंगळुरूला पेनल्टी बहाल केली. रेफ्रीचा हा निकाल स्पोर्टिंगला पसंत पडला नाही. या पेनल्टीवर थॉमयो शिमरे याने १५व्या मिनिटाला गोल करत बंगळुरूला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या बरोबरीनंतरही स्पोर्टिंगने हार मानली नाही. त्यांच्या क्लुझनर परेरा याच्या क्रॉसवर डॉयल गोल नोंदविण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. परंतु, फिनिशिंग टच देणे स्पोर्टिंगला यावेळेस शक्य झाले नाही.

मध्यंतरापूर्वी स्पोर्टिंगने आपला दुसरा गोल केला. रोहन याने बॉक्समध्ये आक्रमकतेसह प्रवेश केल्यानंतर मनोज कन्नन याने त्याला धोकादायकरित्या पाडले. यामुळे रेफ्रींनी पेनल्टीचा इशारा केला. यावर डॉयल याने नीरजला चकवून स्पोर्टिंगने २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ५७व्या मिनिटाला स्पोर्टिंगने आपला तिसरा गोल केला. अ‍ॅलिस्टर याने बिस्वा दार्जी याला चेंडू पास केल्यानंतर बॉक्सच्या कोपर्‍यावरून डोळ्यांचे पारणे फेडणारी सुरेख किक लगावत स्पोर्टिंगला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. थॉमयो याच्या हाफ व्हॉलीवर बंगळुरूने पिछाडी २-३ अशी कमी केली.

स्पोर्टिंगचे मुख्य प्रशिक्षक आर्मांदो कुलासो यांनी आदिल खान, विदिप्त दुआ व लिस्टन कुलासो यांच्या रुपात बदली खेळाडू उतरवले. सामना संपण्यास ८ मिनिटे बाकी असताना रेफ्रींनी बॉक्सच्या कॉर्नरवर बंगळुरूला वादग्रस्त फ्री किक बहाल केली. या किकवर जॉन्सन मॅथ्यूज याने गोल करत बंगळुरूला ३-३ असे बरोबरीत आणले. या बरोबरीनंतरही स्पोर्टिंगने गोल प्रयत्न सुरूच ठेवले.

सामना संपण्यास पाच मिनिटे असताना क्लुझनर याच्या कॉर्नरवर आदिलने हवेत झेपावत शानदार विजयी गोल लगावला. स्पोर्टिंगचा संघ आता पुढील सामन्यासाठी मुंबईला जाणार आहे. तिथे त्यांचा सामना रविवारी महाराष्ट्र ऑरेंज एफसी संघाशी होणार आहे.