जसप्रीत बुमराहच्या वेगाला ‘सूर्या’ची चमक !

मुंबईकडून बंगळुरूचा पराभव : ईशानचीही शानदार फलंदाजी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th April, 11:51 pm
जसप्रीत बुमराहच्या वेगाला ‘सूर्या’ची चमक !

मुंबई : एकतर्फी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १५.३ षटकांत ३ गडी गमावून सामना जिंकला. 

मुंबईकडून तुफानी फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. इशान किशनने ३४ चेंडूत ६९ धावा केल्या. रोहित शर्माने ३८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २१ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान आरसीबीकडून आकाश दीप, विजय कुमार विशाक आणि विल जॅकने प्रत्येकी एक विकेट घेतली.


नाणेफेक गमावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध १९६ धावा केल्या. आरसीबीने विराट कोहली आणि नवोदित विल जॅकच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या, ज्यामुळे संघाने केवळ २३ धावांवर २ महत्त्वाचे विकेट गमावले होते. मात्र त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार यांच्यात ८२ धावांची शानदार भागीदारी झाली. आरसीबीसाठी डुप्लेसिसने सर्वाधिक ६१ धावा केल्या. या झंझावाती खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकारही मारले. पाटीदारने २६ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकनेही ५३ धावांची तुफानी खेळी करत संघाला १९० धावांच्या पुढे नेले.


शेवटच्या ५ षटकांमध्ये आरसीबीच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत ६६ धावा केल्या. १५ व्या षटकानंतर संघाची धावसंख्या ४ विकेटवर १३० धावा होती. १६व्या षटकात १९ धावा आल्या असल्या, तरी पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने लागोपाठच्या चेंडूंवर टीम डेव्हिड आणि महिपाल लोमररला बाद केले. दरम्यान, बुमराहला दोनदा हॅटट्रिकची संधी मिळाली, पण दोन्ही वेळा तो अपयशी ठरला. तर शेवटच्या षटकात १९ धावा आल्या, त्यामुळे आरसीबीचा डाव १९६ धावांवर संपुष्टात आला.

जसप्रीत बुमराहने विरोधी संघाच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा देत ५ बळी घेतले. यासह बुमराहने आयपीएलच्या चालू हंगामात १० बळी पूर्ण केले आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत तो युझवेंद्र चहलसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने विराट कोहलीसह ५ खेळाडूंना बाद केले.