अवघ्या पाचशे रुपये भांडवलावर उद्योग सुरू करणार्‍या मंदा बिभिषण सातपुते

Story: तू चाल पुढं |
05th April, 10:03 pm
अवघ्या पाचशे रुपये भांडवलावर उद्योग सुरू करणार्‍या मंदा बिभिषण सातपुते

स्त्रिया या जात्याच हुशार असतात. कठीण परिस्थितीतही मार्ग कसा काढावा, ही कला त्यांना उपजतच असते. समोर आलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देताना त्या स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या राहायला शिकतात आणि समाजापुढे स्वत:चा आदर्श ठेवतात. अशा स्त्रियांचा जीवन प्रवास जाणून घेताना त्या किती धैर्यवान आहेत, याची जाणीव आल्याशिवाय रहात नाही.

बार्शी तालुक्यातील उंडेगाव या खेड्यात शेतकरी कुटुंबात वाढलेल्या मंदा बिभिषण सातपुते या १९८३ मध्ये लग्न होऊन गोव्यात आल्या. त्यांचे पती बिभीषण सातपुते हे लग्नाअगोदर वास्को आणि फार्मागुडी येथे नोकरी करत होते. फंड, घरभाडे आदी वजा होऊन त्यांच्या हातात फक्त पाचशे रुपयेच मिळत होते. घरातली सर्व जबाबदारीही त्यांच्यावरच होती. सासुबाईंना दर महिन्याला पैसे पाठवावे लागत होते. हे सर्व करताना आणि दोन मुलांचे संगोपन करत घरचा खर्च भागवताना आलेले पैसे महिना संपायच्या आतच संपत असल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अशातच त्यांचे पती एम.ए. अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी बदलण्याच्या हेतूने मुलाखतीला जाऊ लागले. यात मंदा यांची खूपच आर्थिक ओढाताण होत होती.

नोकरी करावी तर शिक्षण जास्त नसल्याने नोकरी मिळणे संभव नव्हते. दोन मुलांच्या संगोपनाचाही प्रश्न समोर होता. त्यासाठी घरातच राहून काहीतरी गृहोद्योग करावा असे त्यांनी मनोमन ठरवले.  पुरणपोळी व पापड तयार करण्याचा गृहउद्योग सुरू करायचा त्यांनी निश्चय केला.

सुरुवातीला त्यांची पुरणपोळी जाड होत असे. ही जाड पुरणपोळी विक्रीसाठी योग्य नव्हती. त्यासाठी त्यांनी प्रत्येक रविवारी पाव किलोची पुरणपोळी बनवयाला सुरुवात करत त्यावर अभ्यास केला. हा त्यांचा अभ्यास अखंड सहा महिने चालू होता. सहा महिन्यानंतर त्यांना यश आले व त्या सरावाने त्यांची पुरणपोळी पातळ आणि मुलायम होऊ लागली. १२५ ग्रॅममध्ये त्या चार पुरणपोळ्या बनवायल्या शिकल्या व मे १९९१ मध्ये त्यांनी त्या बाजारात आणल्या. १९९१ सालात पाच रूपयाच्या पाकिटात ग्राहकांना चार मऊसूत पुरणपोळ्या खाल्ल्याचा आनंद मिळत असे.

सुरुवातीला त्यांनी या पुरणपोळ्यांच्या पाकिटांची विक्री फक्त फोंडा शहरात केली. त्यानंतर त्यांनी मडगाव, पणजी, म्हापसा, वास्को, सावंतवाडी, कारवार, कुमठा या ठिकाणीही पुरणपोळ्यांची पाकिटे पुरविण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला एक खोली भाड्याने घेऊन ४/५ महिलांना रोजगार देऊन कामाला ठेवले. सुरुवातीला दिवसासाठी शंभर पुरणपोळ्यांची पाकिटे त्या तयार करत असत. या पाकिटांची विक्री करण्यासाठी त्यांनी एका मुलाला कामाला ठेवले. या पुरणपोळीच्या जोडीला त्यांनी पापड करण्याचा उद्योगही सुरू केला. दोन वर्षांचा गाढा अनुभव घेतल्यावर त्यांनी या व्यवसायात पुढचे पाऊल टाकले आणि रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, चकली, मका चिवडा, फरसाण तयार करून त्याचा पुरवठा सहकार भांडार, बागायतदार बाजार व इतर दुकानात केला. यातच त्यांनी वेगवेगळी चविष्ट अशी मिठाई बनवण्यास सुरुवात केली. परंतु कामगारांच्या समस्या येऊ लागल्यावर त्यांनी मिठाई बनवणे बंद केले आणि लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, तीळ चटणी, कारळा चटणी, जवस चटणी, खोबरा चटणी, फुटाणा चटणी व कडिपत्ता चटणी अशा विविध आठ प्रकारच्या चटण्या बनवून त्याची विक्री विविध सहकारी भांडार, दुकाने यात सुरू केली. त्याच बरोबर त्यांनी बेसन लाडू, रवा लाडू, मूग लाडू, पिठाचे लाडू,  मल्टीग्रेन लाडू, नाचणी लाडू बनवण्यास सुरुवात केली.

तीन चार महिलांना मदतीस घेऊन मंदा यांनी हा व्यवसाय जवळजवळ २८ वर्षे केला. अपार मेहनत घेऊन काढलेल्या या कष्टाचे फळ मंदा यांना भरभरून मिळाले. त्यांनी स्वत:ची जागा घेऊन घर बांधले. आज त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित आहेत. मुलीने एम.बी.ए. करताना एक सेमिस्टर पॅरिस येथे राहून पूर्ण केले व सध्या ओस्ट्रेलिया इथे नोकरी करत आहे. मुलगा मॅकेनिकल इंजिनियरची पदवी घेऊन त्याचा व्यवसाय सांभाळत आहे.

मंदा यांचा जीवनप्रवास हा फारच प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श महिलांनी घेण्यासारखा आहे. आलेल्या कठीण प्रसंगावर धीराने मात करताना त्यांनी दाखवलेली जिद्द ही अनेक महिलांना नक्कीच प्रेरित करणारी आहे.


कविता प्रणीत आमोणकर