बंगळुरूसमोर लखनौ ठरला ‘सुपरजायंट’

चिन्नास्वामीवर आरसीबीचा पराभव; मयंक यादवचे तीन बळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd April, 12:00 am
बंगळुरूसमोर लखनौ ठरला ‘सुपरजायंट’

बंगळुरू : आयपीएल २०२४ च्या १५ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २८ धावांनी पराभव केला. लखनौच्या या विजयाचा हिरो होता वेगवान गोलंदाज मयंक यादव. स्पीड स्टार मयंकने कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद केले.

लखनौने प्रथम खेळून बंगळुरूला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबी अवघ्या १५३ धावांत गारद झाला. या मोसमात आरसीबीचा घरच्या मैदानावरील हा तिसरा पराभव आहे. लखनौचा हा दुसरा विजय आहे.


आरसीबीला शेवटच्या २ षटकांत ४४ धावा हव्या होत्या आणि फक्त १ विकेट हातात होती. मोहम्मद सिराजने रवी बिश्नोईच्या चेंडूवर सलग २ षटकार ठोकले, परंतु हे सर्व अपुरे ठरले. शेवटच्या ६ चेंडूंवर संघाला विजयासाठी ३० धावांची गरज होती, परंतु मोहम्मद सिराज २० षटके पूर्ण होण्याआधीच बाद झाला. आरसीबी १५३ धावांवर ऑलआऊट होताच एलएसजीने २८ धावांनी सामना जिंकला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ५ गडी गमावून १८१ धावा केल्या. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या झंझावाती खेळीत ८ चौकार आणि ५ षटकार मारले. यानंतर शेवटच्या षटकांमध्ये निकोलस पुरनने २१ चेंडूत ४० धावा केल्या. निकोलस पुरनने आपल्या स्फोटक खेळीत १ चौकार आणि ५ षटकार ठोकले.

डी कॉक - राहुलची झंझावाती सुरुवात

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी झंझावाती सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी ५.३ षटकांत ५३ धावा केल्या. केएल राहुल १४ चेंडूत २० धावा करून ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण क्विंटन डी कॉकने चेंडूवर आपला ताबा ठेवला आणि सहज धावा काढल्या. मात्र, केएल राहुल बाद झाल्यानंतर देवदत्त पडिकल फलंदाजीला आला आणि त्याने ११ चेंडूत केवळ ६ धावा केल्या. तर मार्कस स्टॉइनिसने १५ चेंडूत २४ धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. ग्लेन मॅक्सवेलने लखनौ सुपर जायंट्सच्या २ फलंदाजांना आपला बळी बनवले. याशिवाय रीस टोपले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी १-१ बळी घेतला.