पार्सेकर, उत्पल यांच्या घरवापसीबद्दल तानावडे यांनी दिले ‘हे’ उत्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd April, 03:54 pm
पार्सेकर, उत्पल यांच्या घरवापसीबद्दल तानावडे यांनी दिले ‘हे’ उत्तर

पणजी : माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर आणि कॅडरचे नेते माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपपासून बऱ्याच काळापासून लांब आहेत. त्यांच्या घरवापसीसंदर्भात केंद्रीय नेतेच निर्णय घेऊ शकतात, असे उत्तर प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज दिले आहे.

वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी २०२२ साली विधानसभेचे तिकीट नाकारल्यावर भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आज त्यांनी पुन्हा आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचवेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी, ‘आणखी काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काहीजण नाराज बनून दूर गेलेले घरवापसी करणार आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत’, असे सांगितले. त्याचवेळी पत्रकारांनी पार्सेकर आणि उत्पल यांच्याविषयी प्रश्न विचारला. यावर तानावडे यांनी वरील उत्तर दिले. पार्सेकर आणि उत्पल यांचा निर्णय येथे घेऊ शकत नाही. तो निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतेच घेऊ शकतात, असे ते म्हणाले.

२०२२ साली पार्सेकरांनी भाजपला दिली सोडचिठ्ठी

माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेचे तिकीट नाकारल्याने २२ जानेवारी २०२२ रोजी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, सोपटे आणि पार्सेकर या दोघांचाही पराभव झाला होता.

तब्बल ३२ वर्षे पक्षासाठी एकनिष्ठेने कार्य केल्यानंतर पार्सेकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. सध्या ते कोणत्याही पक्षात नाही. २०१२ मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली तत्कालीन विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाले होते. त्यानंतर पर्रीकर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पराजय झाल्यापासून पक्षाचे त्यांच्याशी बिनसले होते.

उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल थोडक्यात

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल यांना भाजपचे तिकीट मिळेल, अशी आशा होती. पणजी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनीही तशी मागणी केली होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले. यामुळे नाराज उत्पल भाजपपासून दूर झाला आहेत.

हेही वाचा