भूतानची राजधानी थिम्पू

Story: प्रवास |
30th March, 11:11 pm
भूतानची राजधानी  थिम्पू

फुएन्शोलिंगहून जवळपास तीन तासांच्या ड्राईव्हनंतर, आम्ही भूतानची राजधानी असलेल्या थिम्पूमध्ये पोहोचलो. भूतानच्या डोंगराळ लँडस्केपमधून केलेली ही रोड ट्रिप, म्हणजे आमच्या अनुभवांच्या गाठोड्यात पडलेला एक अविस्मरणीय अनुभव होता. नागमोडी वळणं आणि एका बाजूला खोल दरी असूनही, हा रस्ता कुठेच धोकादायक वाटला नाही. सुंदर मेन्टेन केलेल्या ह्या रस्त्यामुळे हा प्रवास सुखकर झाला आणि आमचं लक्ष फक्त ह्या भूमीच्या सुंदरतेवरचं राहिलं. फुएन्शॉलिंगच्या गजबजलेल्या शहरापासून भुतानच्या शांत राजधानी थिम्पूला पोहोचेपर्यंत, प्रत्येक क्षण नयनरम्य दृश्यं आणि सांस्कृतिक समृद्धीने भरलेला होता. थिंपुला आम्ही पोहोचताच, तिथल्या स्थानिकांनी आमचं आनंदाने स्वागत केलं, जिथे तिथे आमचं आम्ही भारतीय असल्याने खास स्वागत होत होतं. अगदी आपुलकी वाटावी असे हे लोक आमच्याशी वागत होते. थिम्पूमध्ये आम्ही फक्त एकच दिवस राहिलो आणि ग्रेट बुद्ध डोर्डेन्मा नावाच्या बुद्धाच्या विशाल पुतळ्याला भेट दिली.

ग्रेट बुद्ध डोर्डेन्मा ही भूतानच्या पर्वतरांगांमधील एक अवाढव्य शाक्यमुनी बुद्ध मूर्ती आहे जी चौथा राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या साठाव्या जयंती निमित्त बांधली गेली होती. या पुतळ्यामध्येच आत एक देऊळ आहे जिथे एक लाखापेक्षा जास्ती लहान लहान बुद्धाच्या मुर्त्या आहेत, ज्यातील प्रत्येक, ग्रेट बुद्ध डोर्डेन्मा प्रमाणेच कांस्य आणि सोन्याने बनवलेली आहे. आणि ह्या मुर्त्यांसमोर दिव्यांच्या रांगा तेवत होत्या त्यामुळे ग्रेट बुद्ध डोर्डेन्मा बाहेरून जितका सोनेरी चमकत होता, त्यापेक्षा चार पट अधिक आत सोन्याने माखलेला वाटत होता. आत जाताच आम्हाला मांडी घालून बसलेल्या माँक्सच्या एकूण सहा रांगा दिसल्या. प्रार्थना म्हणण्यात ते गुंग झाले होते. तरुण नि वयस्कर माँक्स एकमेकांसोबत जोड्या करून बसले होते. त्यामुळे त्यातला एक गुरू एक शिष्य असावा असा अंदाज मी बांधला. आमचा वाटाड्या ताशी नामा आम्हाला माहिती देत होताच. 

विसाव्या शतकात, इथले योगी सोनम झांगपो यांनी भविष्यवाणी केली होती की संपूर्ण जगाला आशीर्वाद, शांती आणि आनंद देण्यासाठी या प्रदेशात पद्मसंभव बुद्ध किंवा फुर्बाची एक मोठी मूर्ती बांधली जाईल. आणि खरंच तसंच झालं. मजा म्हणजे या पुतळ्याचा उल्लेख इथले गुरू रिनपोचे उर्फ ​​पद्मसंभव यांच्याही प्राचीन कालखंडात आहे, जो स्वत: अंदाजे आठव्या शतकातील आहे. त्यामुळे ह्या वास्तूला भूतानी लोक मानतात. उंचावर बांधलेला असल्याने ग्रेट बुद्ध डोर्डेन्माला पूर्ण थिंपू दरीचा नजारा मिळतो. इथे उभं राहून तासनतास ह्या दृश्याला टिपून घ्यावं इतकं सुंदर. मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करून देखील त्याला न्याय नाही देऊ शकले. इथला राजवाडा दक्षिणेला विसावलेला. समोरून वाहणारी नदी. तिच्या आजूबाजूला लहान मोठी घरं. ताशिने ह्यांवर खुलासा केला की ज्यांची छप्परं हिरवी आहेत, त्या सर्व सरकारी इमारती आहेत. ज्यांची छप्परं तांबडी आहेत ती राहती घरं. ह्या फरकामुळे इथला कारभार सोपा होतो. हा फरक इथल्या वेशभूषेत देखील आढळतो. भुतानी पुरुष जे उपरणं पंघरतात त्याच्या रंगावरून त्यांचं समाजातलं स्थान हेरता येतं. उदा. पिवळं उपरणं फक्त इथला राजा घेऊ शकतो.

क्रमशः


भक्ती सरदेसाई