ऑडिओ बुकद्वारे वाचकांशी जोडली गेली मंजिरी मयूरेश वाटवे

ज्यांना पुस्तके वाचायची आवड आहे, परंतु त्यासाठी वेळ काढून हातात पुस्तक घेऊन वाचत बसायला कामाच्या व्यस्ततेमुळे अजिबात वेळ नाही, अशांना ऑडिओ बुक ऐकणे हे आज सुखावह झाले आहे. पुस्तकातील लेख किंवा इतर छापील साहित्य ध्वनी मुद्रित करून हे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे ऑडिओ बुक आणि ही संकल्पना आज समाजात आकार घेत असून अनेकांना ही संकल्पना आकर्षित करत आहे.

Story: तू चाल पुढं |
29th March, 10:24 pm
ऑडिओ बुकद्वारे वाचकांशी जोडली गेली मंजिरी मयूरेश वाटवे

साहित्याच्या क्षेत्रात मंजिरी मयूरेश वाटवे या पुस्तक स्वरुपातील छापील लेख किंवा साहित्य स्वत:च्या आवाजात ध्वनी मुद्रित करून युट्यूब, फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर प्रसारित करत असून त्यांच्या या उपक्रमाला वाचकांचा आणि श्रोत्यांचा फार मोठा प्रतिसाद लाभत आहे. आज ऑडिओ बुक ऐकणार्‍यांमध्ये पर्वरी येथील मंजिरी मयूरेश वाटवे यांचे नाव अग्रेसर आहे.

अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या मंजिरी यांनी प्री प्रायमरी टीचर कोर्स केला असून हेल्थ सायकॉलॉजी आणि काउन्सीलिंगच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. रेकी हिलिंगचा कोर्स त्यांनी केला असून त्यांचा वास्तुशास्त्र विषयाचा गाढा अभ्यास आहे. तसेच वृत्त वाहिनीसाठी वृत्त लेखन, मुलाखतकार, वृत्त निवेदक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांचे अनेक ललित लेख प्रसिद्ध झाले असून त्यांचा दुसरा ललित लेख संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

ऑडिओ बुक या तंत्रज्ञानामार्फत सोशल मीडिया द्वारे जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी हा उद्देश मंजिरी यांचा असून त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. एखाद्या पुस्तकाची निवड करून त्या स्वत: च्या आवाजात ध्वनिमुद्रित करतात आणि मग त्या सोशल मीडियावर प्रसारित करतात.

ऑडिओ बुककडे आता तरुण पिढी जास्त वळलेली दिसते असे मंजिरी या सांगतात. तरुण पिढीला पीडीएफ, ई बुक स्वरुपात वाचन करायला हल्ली आवडतं. आपलं लेखन सर्वांपर्यंत जावं, जास्तीत जास्त वाचक त्याला लाभावेत, ही प्रत्येक वाचकाची सुप्त इच्छा असते. त्याला ऑडिओ बुक ही संकल्पना वाव देते.

फेसबुक, युट्यूब यासारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे त्यांचे लक्ष ऑडिओ बुककडे वेधले गेले. हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यासाठी त्यांनी 'डेटिंग' हे पुस्तक निवडलं. 'डेटिंग' हे पुस्तक कॉलेज विश्वातील पत्ररूपी संवाद असून तरुण वर्ग या ऑडिओ बुकला चांगला प्रतिसाद देईल अशी आशा मंजिरी यांना होती. त्यांनी हा प्रयोग केला आणि त्यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वीही झाला. त्याला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मंजिरी यांनी या क्षेत्रात अधिक पुढे जायचे ठरवले.

ऑडिओ बुकसाठी ध्वनीमुद्रण करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. हे ध्वनि मुद्रण घरगुती स्वरुपातील असल्याने कॉलनीतील गाड्यांचा आवाज, आजूबाजूचा माणसांचा आवाज, पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचे आवाज  हे सर्व आवाजही ध्वनीमुद्रित व्हायचे. त्यामुळे त्यांनी रात्रीच्या शांत वेळेस हे ध्वनि मुद्रण करून पाहिले तर ते खूप छान झाले आणि मग आता एक दिवस ठरवून त्याच दिवशी पूर्ण आठवड्याचे ध्वनी मुद्रण त्या करतात. आज पावेतो त्यांनी ७२ पुस्तकांची निवड केली असून आतापर्यन्त त्यांचे अनेक लेख ऑडिओ बुकवर प्रसारित झालेले आहेत.

तंत्रज्ञात युगात नवनवीन माध्यमे येत असतात. त्याचा वापर योग्य रितीने कसा करावा हे एकदा समजले की त्याचा फायदा आपल्याला होतो. ऑडिओ बुक हे नवीन तंत्रज्ञान आहे. आपल्याला कामाच्या व्यग्रतेमुळे जर पुस्तक हातात धरून वाचायला वेळ नसेल, तर आपण ऑडिओ बुकवरुन आपले आवडते पुस्तक इतर काही काम करतानाही ऐकू शकतो. त्यामुळे कामे करतानाही वाचनाचा आनंद आपल्याला लाभू शकतो. मंजिरी यांचे लेख ऑडिओ बुकवर ऐकून अनेक जण ते त्यांना आवडल्याची पावती कॉमेंट करून तिथेच देतात, तर काही व्हाट्सअप वर देतात. वाचकांचा मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत असून त्यामुळे मंजिरी यांना नवा हुरूप मिळतो. व अधिक जोमाने काम करण्यासाठी त्या प्रवृत्त होतात. मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात असतो. त्यामुळे त्यावरही आपण हे ऑडिओ बुक ऐकू शकतो. अगदी प्रवासात असताना, घरातील कामे करताना, मुलांचे संगोपन करताना, अगदी  ऑफिसची कामे करतानाही! 

नवीन माध्यमाचा वापर करताना त्यातून मिळणारा वेगळा आनंद व समाधान व तरुण पिढीसोबत आपणही अपडेट आहोत ही सुखावह भावना असून अनेक जण ऑडिओ बुकचा वापर करताना वाचनाचाही आनंद मिळवत आहेत.


कविता प्रणीत आमोणकर