वाट पाहती लोचने

Story: मनातलं |
29th March, 10:18 pm
वाट पाहती लोचने

वाट पाहणं हा प्रत्येकाचा स्वभाव धर्म. कमी-अधिक प्रमाणात तो सगळ्यातच असतो.  ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते.  प्रत्येक माणूस हा कशाची ना कशाची वाट पाहताना दिसतो त्याचे कारण त्याच्या मनात एक सुप्त आशा असते. जिच्या पूर्तीसाठी त्याला वाट बघावी लागणार आहे हे ठाऊक असते आणि ही वाट बघण्याची घडी फारच अवघड असते. कारण त्यामध्ये कधीकधी काळजी असते कधी दु:खातून बाहेर पडण्याची तगमग असते कधीकधी भीती पण वाटत असते. आपण रोजच अशा छोट्या-मोठ्या गोष्टींची वाट पहात असतो. कुठलीही गोष्ट मनात आली आणि ती त्या क्षणी मिळाली तर त्याची इतकी किंमत वाटत नाही पण तीच गोष्ट  खूप वाट पाहून नंतर मिळाली तर त्याची अपूर्वाई खूप मोठी असते. माझ्या लहानपणी मला आठवतं एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि ती वडिलांकडे मागितली तर त्या वेळी लगेच ते कधीच आणून द्यायचे नाहीत त्यांना जमेल, सवड  होईल तेव्हा घेऊन यायचे. त्यामुळे एकतर त्या गोष्टीची वाट पाहिल्याने त्याचे कौतुक माझ्या दृष्टीने जास्त असायचं तर त्यांच्या दृष्टीने मागितलेली वस्तु जर ताबाडतोब मुलांच्या हातात पडली तर स्वभाव हट्टी होतो. आत्ता लगेच हवं असा आजकालच्या मुलांचा हेका असतो.   कधीकधी त्यांना ती गोष्ट लगेच हातात मिळाली नाही तर ती आक्रस्ताळेपणा करून आरडा ओरडा करतात काही मुले तर नको ते पाऊल उचलतात. माणसाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पहावीच लागते याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी. वाट पाहाण्यामुळे  होणारी तगमग, होणारा त्रास, मिळणारे दु:ख या सर्व गोष्टींचा अनुभव येतो तेव्हा ती मिळणारी गोष्ट अधिक आनंददायक ठरते. वाट पाहण्यामागे दु:ख, आतुरता, कळकळ, अपेक्षा, तळमळ अशा अनेक भावनांचे मिश्रण असते. या सर्व भावना सुखदायी असतातच असे नाही पण तरीही जीवनात त्यामुळे  वाट बघण्याचे फायदे तोटे बघायला मिळतात बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट पहात असतो आणि ती व्यक्ति जेव्हा  आपल्या समोर उभी ठाकते तेव्हा त्याला पाहून आपल्या मनाला झालेला  आनंद अवर्णनीय असतो. ती घडी अनमोल असते. त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात किती ओढ आहे याची जाणीव आपल्याला तर होतेच, समोरच्या व्यक्तीलाही आपल्या डोळ्यात पाहून किंवा आपल्या प्रतिक्रियेतून ते जाणवू शकतं. ते प्रेम मग बोलून दाखवायची गरज पडत नाही. अनेकदा सहजपणे मिळालेल्या गोष्टींची माणसाला किंमत वाटेनाशी होते पण महतप्रयत्नांनी  मिळालेली गोष्ट म्हणजे “तिच्या साठी मी रक्ताचे पाणी केले”असे वाटून  ती जास्त अनमोल, किमती ठरते. एखाद्या गोष्टीसाठी तडफड सहन केल्याने तिचे मोल समजून येते. त्यामुळे वाट पाहणे ही एरव्ही सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल किती आहे याची जाणीव करून देण्यासाठी उपयोगी पडते. 


आपल्या मनात अशा अनेक इच्छा आकांक्षा दडलेल्या असतात आणि त्या लगेच पूर्ण करून घ्यायला आपल्या हातात ‘जिन’ ची जादू नसते “बोल मेरे आका” म्हणत तो समोर येईल आणि हवं ते काही सेकंदात आणून समोर उभे करेल. त्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावीच लागते. ती पूर्णत्वाला येई पर्यंत मनात  शंका-कुशंका, होईल की नाही ही भीती, मन पोखरून काढत असते त्यामुळे वाट पाहण्याचा काळ हा लहान असो की मोठा मनाला क्लेशदायक ठरणारा असतो. आपला नवरा लवकर घरी आला नाही तर बायकोला वाटणारी त्याची काळजी त्या वाट बघण्यात असते. शाळेतून परत येणाऱ्या मुलाला उशीर झाला तर त्या आईची तगमग त्या वाट बघण्यातून जाणवते, प्रियकराला भेटायला उत्सुक असणारी प्रेयसी त्याच्या वाट बघण्यात झुरत असते तो आपल्याला विसरला तर नाही ना? ही चिंता वाटत असते. लग्नाची पसंती झाल्यावर मुलाकडचा फोन लवकर आला नाही म्हणून वधू पक्षाला वाटणारी काळजी, सगळं ठीक असेल ना या काळजीने स्वस्थ बसू शकत नाही. वाट बघण्याच्या सवयीमुळे आपण स्वैर मनाला बांध घालू शकतो. एखाद्यावर विश्वास ठेवायला शिकतो. वाट बघणं ही एक अटळ गोष्ट आहे , त्यामध्ये उत्कंठा असते परीक्षेचे पेपर्स जरी चांगले गेलेले असले तरी हातात रिझल्ट येण्याची प्रत्येक जण वाट पहात असतो. आणि जेव्हा अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळालेले असतात तेव्हा मिळालेल्या यशाची गोडी वाढते. मनाची हुरहूर दडपण सारे नाहीसे होते. पूर्वी फोन मोबाईल नव्हते त्यावेळी मी ही माझ्या नवऱ्याच्या पत्रांची खूप आतुरतेने वाट बघायची म्हणजे जरी दुरून पोस्टमन येताना दिसला तरी मन आनंदाने कावरंबावरं व्हायचं. त्याने पत्र आणलं की नाही ही पुढची गोष्ट झाली. त्याच्या येण्याशी माझा आनंद  जोडला गेला होता म्हणून त्याची वाट बघायची सवयच लागली होती. पूर्वी नोकरदार वर्गाला महिनाभर वाट बघून एक तारखेला पगार हातात पडायचा त्यामुळे सगळेच एक तारखेची वाट बघायचे. जेव्हा पैसे हातात पडत तो क्षण आनंदाचा असे. आपल्याला आयुष्यात नक्की काय हवे याचा अंदाज वाट बघण्यातून येतो. जीवन जगण्याचा सुख मंत्र म्हणजे वाट बघणं  हा असेल.  वाट बघण्यातून तुम्ही तुमच्या अधीर मनाला शिस्त संयम लावून काबूत ठेवायला शिकता. मनात उठणारे काहूर, वेडेवाकडे विचार यांच्यावर चाप बसतो. श्रद्धा आणि सबुरी यावर विश्वास पक्का होतो.  हल्लीच एक छोट्याश्या मुलीचा व्हिडिओ पाहिला कामावरून परत येणाऱ्या बाबांची पायऱ्यांवर बसून वाट पाहणारी चिमुकली आणि बाबांचं दर्शन होताच तिच्या चित्तवृत्ती कशा खुलून येतात, आनंदाने ती टाळ्या वाजवते त्यांच्याकडे  झेपावते. आपलं मन ही त्या लहान मुलीसारखं वाट पहात असतं आणि ती गोष्ट मिळाल्यावर आनंदित पण होतं. पण तो आनंद फार काळ टिकत नाही दुसऱ्या एखाद्या गोष्टीची आपण प्रतीक्षा करू लागतो कारण मनातल्या आशेला मर्यादा नसतात. एक झालं की त्या पाठोपाठ दुसरं काहीतरी हवंसं वाटत राहतं. शेतकरी  पावसाची वाट पहात असतो किंवा एखादा भक्त देव दर्शनाची वाट पहात असतो, बाळ आईची वाट पहात असतं, कुणी बसची वाट पहात थांबलेले असतं, कुणी फोनची वाट पहात असतं, कुणीतरी कुणासाठी कशाची तरी वाट पहात असतं त्या वेळेचा प्रत्येक क्षण न क्षण युगासारखा  प्रदीर्घ वाटत असतो. तरी ही डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली जातेच.


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.