डोक्यावरील जोरदार वाराने दुखापत झाल्याने विश्वनाथचा मृत्यू

वैद्यकीय अहवालातून स्पष्ट : खूनप्रकरणी संशयिताला नऊ दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th March, 12:12 am
डोक्यावरील जोरदार वाराने दुखापत झाल्याने विश्वनाथचा मृत्यू

मडगाव : पेडा बाणावली येथील विश्वनाथ सिधनलच्या खूनप्रकरणी कोलवा पोलिसांनी त्याची पत्नी वैभवी उर्फ मंगल सिधनल व सूरज मायगेरी (कडोळी, बेळगाव) यांना अटक केली आहे. मंगलला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती तर आता संशयित सूरजला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डोक्यावरील वाराने मेंदूला दुखापत झाल्याने विश्वनाथचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समजले आहे.

पेडा बाणावली येथे विश्वनाथ सिघनल (३५, रा. लोंढा कर्नाटक) याचा खून झाला होता. सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्याच्या माध्यमातून कोलवा पोलिसांकडून मृत विश्वनाथ याची पत्नी वैभवी ऊर्फ मंगल सिधनल हिला कोलवा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. तिच्याकडून माहिती घेतल्यावर प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पतीला प्रियकराच्या साथीने मारल्याचे सांगितले. कोलवा पोलिसांकडून चौकशीअंती बुधवारी दुपारी विश्वनाथ याच्या खूनप्रकरणी पत्नी वैभवी हिला अटक केली असून न्यायालयाकडून तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार तपास करण्यास सुरुवात केल्यावर प्रेमसंबंधातील अडथळा ठरत असल्याने विश्वनाथला मारल्याचे कारण पोलिसांना समजले. सूरज मायगेरी व मंगल यांचे शाळेत शिकताना आठवीपासून एकमेकांवर प्रेम होते. सूरज हा खालच्या जातीचा असल्याने मंगलच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार देत विश्वनाथसोबत लग्न लावून दिले. दरम्यान, सूरज याचेही लग्न झाले पण त्याची पत्नी मुकी व बहिरी होती. दोघेही आपापल्या संसारात असमाधानी होते. इन्स्टाग्रामवरुन दोघांची पुन्हा प्रेमाच्या गोष्टींना सुरुवात झाली. यातून सहा महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमात बाधा ठरत असलेल्या विश्वनाथचा काटा काढण्याचे ठरवले होते. त्यानुसार २४ रोजी रात्री विश्वनाथला मारुन दोघेही पळाले होते. कोलवा पोलिसांकडून बेळगाव येथे जात सूरज यालाही ताब्यात घेतले व गोव्यात आणून अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून सूरजला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विश्वनाथ याच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृत्यू डोक्यावर झालेल्या वारामुळे मेंदूला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या खूनप्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.