पणजीचा फेरी धक्का आता ‘नो पार्किंग झोन’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 12:35 am
पणजीचा फेरी धक्का आता ‘नो पार्किंग झोन’

पणजी : येथील फेरीधक्क्यावर यापुढे गाड्या उभ्या करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हे ठिकाण पार्किंगची जागा म्हणून असलेली अधिसूचना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्किंग केल्यास दंड आकारला जाणार, असे वाहतूक खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही जागा पार्किंगची जागा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचित केली होती. यामुळे कॅसिनोवाले आपल्या गाड्या येथे लावायचे. तसेच पर्यटकही आपल्या गाड्या लावायचे. त्यामुळे फेरीतून प्रवास करणाऱ्यांना अडथळे येत. फेरी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पार्किंगसाठी जारी केलेली अधिसूचना मागे घेण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना मागे घेतली आहे, त्यामुळे या ठिकाणी गाड्या उभ्या असल्याचे दिसल्यास आम्ही पोलिसांना कळवू, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

पहिल्यांदा फेरी धक्क्यावर आम्ही रात्री १० नंतर गेट बंद करायचो. परंतु काही लोक रात्रभर गाड्या पार्क करून ठेवत असल्याने गोंधळ होत असे. आता पार्किंगची अधिसूचना रद्द करण्यात आल्याने आम्ही पुन्हा गेटला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.