म्हापसा पालिकेकडून ९२.६३ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

अंदाजपत्रकात ३३.१७ कोटींचा महसूल, ३२.२५ कोटींचा खर्च

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 12:19 am
म्हापसा पालिकेकडून ९२.६३ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

म्हापसा : येथील नगरपालिकेने विशेष बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या आपल्या ९२.६३ लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

बुधवारी सकाळ आयोजित केलेल्या या बैठकीत अंदाजपत्रकावर दुपारपर्यंत चर्चा पूर्ण न झाल्याने ती तहकूब केली व पुन्हा बैठक संध्याकाळी ४.३० वा. बोलावली. नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक झाली.

या अंदाजपत्रकात ३३ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल दाखवला आहे. ३२ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. कचरा कराच्या रुपात ३ कोटी ५० लाख रुपये, व्यापारी तसेच व्यावसायिक कराच्या रुपात १ कोटी १० लाख रुपये, घरपट्टीवर १२ कोटी ५० लाख रुपये, औद्योगिक वसाहतीतील करावर ८० लाख रुपये असा महसूल दाखवण्यात आला आहे.

यावेळी बिचोलकर यांनी अंदाजपत्रकाला झालेल्या विलंबाची माहिती दिली. नव्या नगराध्यक्ष म्हणून आपण ताबा घेतल्यानंतर उपनगराध्यक्षांची निवड झाली. त्यानंतर पालिकेच्या स्थायी समितीची निवड होणे गरजेचे होते. स्थायी समितीची निवड होऊन १५ मार्च रोजी समितीची बैठक संपन्न झाली, पण १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्याने अंदाजपत्रकासाठी १८ मार्चला बोलावलेली बैठक रद्द करावी लागली. त्यानंतर बैठकीसाठी आयोगाकडून परवानगी घेणे अत्यावश्यक होते असेही त्या म्हणाल्या.

निवडणूक आयोगाकडून परवानगीनंतर अंदाजपत्रक मंजुरी हा एकमेव विषय बैठकीसमोर ठेवल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात योग्य काळजी घेऊन योग्यवेळी अंदाजपत्रक सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दोषींवर कारवाईची मागणी

निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती असूनही अंदाजपत्रक उशिराने मांडण्यामागचे कारण नगरसेवक प्रकाश भिवशेट व शुभांगी वायंगणकर यांनी विचारले. यात हलगर्जी केलेल्या दोषींवर कारवाईची मागणी भिवशेट यांनी केली. 

हेही वाचा