पर्रा ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोपपत्र दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th March, 12:16 am
पर्रा ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोपपत्र दाखल

पणजी : गुन्हा शाखेने ड्रग्ज तस्करी प्रकरणी पर्रा येथे छापा टाकून मुंबईतील स्टॅन्ली लुईस कार्व्हालो याला अटक केली होती. या प्रकरणी गुन्हा शाखेने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
गुन्हा शाखेच्या एका अधिकाऱ्याला पर्रा येथे एक तस्कर ड्रग्ज व्यवहार करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, २५ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११.३० ते उत्तर रात्री २.३० या कालावधीत ब्रिट्टोवाडो-पर्रा येथील एका जंक्शनवर पथकाने सापळा रचून मूळ डोंबिवली (महाराष्ट्र) येथील स्टॅन्ली लुईस कार्व्हालो (५०, रा. आराडी) याला ताब्यात घेतला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ९.७८५ ग्रॅम अॅम्फेटामाईन, १० एॅक्टसी गोळ्या आढळून आल्या. याची बाजारपेठेत २ लाख ५० हजार इतकी किंमत होते. याप्रकरणी गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांनी गुन्हा नोंद करून संशयित कार्व्हालो याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान गुन्हा शाखेने तपास पूर्ण करून संशयित स्टॅन्ली याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.