ब्रिटनमधील शेतकरी उतरले सरकारच्या विरोधात

Story: विश्वरंग |
26th March, 10:23 pm
ब्रिटनमधील शेतकरी उतरले सरकारच्या विरोधात

भारतासह जगभरातील विशेषतः युरोपातील देशांमध्ये शेतकरी तेथील सरकारांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत आहेत. दोन दिवसांपूर्वीपासून ब्रिटनमध्येही शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. नुकतेच लंडनमध्ये शेतकऱ्यांनी संसदेजवळ ट्रॅक्टर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला आहे. मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर चालवत राजधानीत पोहोचले आणि संसद चौकात ट्रॅक्टर मोर्चा काढला. अखेर ब्रिटनमध्ये शेतकरी रस्त्यावर का उतरलेत? चला जाणून घेऊया.

सरकारी धोरणांविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी जगभरात शेतकरी आंदोलनाचा भडका झालेला सध्या पाहायला मिळत आहे. भारतात मागील १३ फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायद्यासाठी आंदोलन करत आहे, तर काही आठवड्यांपूर्वी युरोपातील अनेक देशातील शेतकरी सरकारी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले होते. आता इंग्लडमधील शेतकऱ्यांनी संसदेला घेराव घालत अन्नसुरक्षेबाबत निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे मूळ ब्रेक्झिटच्या परिषदेत दडले आहे. तब्बल ४७ वर्षांनंतर ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला. यामुळे ब्रिटनच्या शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. ब्रिटन आता मुक्त व्यापार क्षेत्राखाली आले आहे. कृषी नियमांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून सुटले आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांमधील व्यापार करारामुळे आयातीचे दरवाजे उघडले आहेत. म्हणजे या देशांतील शेतीमाल सहज ब्रिटनमध्ये येऊ शकतो आणि ब्रिटनमधील लोकांना तो कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतो. मात्र, यामुळे ब्रिटनमधील शेतकऱ्यांच्या मालाला स्थानिक बाजारपेठेत योग्य भाव मिळणार नाही. त्यांना अपेक्षित दर मिळणार नाही. ब्रिटनमधील व्यापाऱ्यांना विदेशांतून कमी किमतीत माल मिळाल्यास ते स्थानिक शेतकऱ्यांना जेरीस आणतील. ठरावीक मोठे उद्योजक येथील शेतकऱ्यांना नियंत्रित करतील, अशी त्यांना भीती वाटत आहे. तसेच जागतिक स्पर्धांमध्ये ब्रिटनच्या शेतकऱ्यांना तग धरता येणार नाही. त्यामुळे इंग्लड सरकारने आयात धोरणात बदल करावा, शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या देशातील अन्न सुरक्षा कायदयात बदल करावा, अशी त्यांची मागणी आहे.

वरील मागणीसाठी ‘सेव्ह ब्रिटिश फार्मिंग अँड फेअरनेस फॉर फार्मर्स ऑफ केंट’ या मोहिमेच्या गटाने आंदोलन छेडले आहे. गेल्या महिन्याभरात युरोपमध्ये शेती हे बंडाचे कारण ठरले आहे. पॅरिसच्या रस्त्यावर अनेक दिवस आंदोलन सुरू होते. फ्रेंचमध्ये सरकारी इमारतींवर खताची फवारणी करण्यात आली. युरोपियन संसदेवर अंडी फेकण्यात आली. ब्रसेल्समधील १९व्या शतकातील ब्रिटिश उद्योगपतीचा पुतळा रागाच्या भरात पाडण्यात आला. स्पेनपासून पोलंड, जर्मनी ते ग्रीसपर्यंत सरकारांविरुद्ध संताप पसरला आहे.


- संतोष गरुड, गोवन वार्ता