जुने वीज खांब, केबल्सपासून वास्कोतील स्वातंत्र्यपथाला ‘स्वातंत्र्य’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th March, 05:42 pm
जुने वीज खांब, केबल्सपासून वास्कोतील स्वातंत्र्यपथाला ‘स्वातंत्र्य’

वास्को : येथील स्वातंत्र्य पथावरील रस्ता दुभाजकाच्या मधोमध जुने व गंजलेले वीज खांब, त्यावर लोंबकळणाऱ्या केबल्स काढण्यात आल्याने स्वातंत्र्य पथाला एक नवे रुप मिळाले आहे. स्वातंत्र्य पथाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्य पथावरील रस्त्या दुभाजकाच्या मधोमध वीज खांबे होते. या खांबांवरून इंटरनेट केबल ऑपरेटर्सनी आपल्या केबल नेल्या होत्या. या केबल्समुळे सौंदर्याला बाधा येत होती. या केबल्स तुटून पडल्यावर दुचाकीचालकांना त्रासदायक ठरत होत्या. वीजखांबांवर लोंबकळणाऱ्या केबल्ससंबंधी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. या खांबांवरून आसपासच्या आस्थापनांना वीज पुरवठा करताना तेथे वाटेल तशा वीजवाहिन्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकंदर स्वातंत्र्य पथाला ओंगळवाणे रुप प्राप्त झाले होते. परंतु आमदार साळकर यांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्यपथावर भूमिगत वीजवाहिन्या घातल्या गेल्या आणि स्वातंत्र्यपथाला नवे रुप मिळाले.


स्वातंत्र्यपथावर दुतर्फा वीजखांबांवर पथदीप लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता दुभाजकामधील जुने वीज खांबे व वीजवाहिन्या हटविण्यात आल्या आहेत. या वीजखांबांवर लोंबळणाऱ्या केबल्स कापण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. त्यांनी आमदार साळकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे. दुभाजकातील वीज खांबे हटविण्यात आल्याने आता नरकासूर स्पर्धेच्या वेळी अधिक उंचीचे नरकासूर संबंधित क्लबांना आणणे सोयीस्कर होणार आहे. तसेच शिमगोत्सव चित्ररथ मिरवणुकीला आता चित्ररथ नेताना ओव्हरहेड वीजवाहिन्या बाजूला करण्याची कसरत करावी लागणार नाही.

स्वातंत्र्य पथाचे सुशोभिकरण लवकरच

वास्को शहराला पूर्वीचे वैभव मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही फक्त सुरुवात आहे. जुनी सरकारी शाळा (मेन) इमारतीचे जीर्णोद्वार करण्यात आले आहे. वास्को रेल्वे स्थानकाचे नियोजित अपग्रेडेशन, संपूर्ण स्वातंत्र्य पथाचे सुशोभिकरण व लँडस्केपिंग लवकरच सुरू होणार असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा