त्रैवार्षिक ठाणे घोडेमोडणी सोहळा सात गावांसाठी भूषणावह

२९ मार्च रोजी रंगणार १४ घोड्यांचा नृत्याविष्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th March, 11:17 pm
त्रैवार्षिक ठाणे घोडेमोडणी सोहळा सात गावांसाठी भूषणावह

वाळपई : नृत्य परंपरेचा अाविष्कार म्हणून गोवा राज्याबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांत वैशिष्ट्यपूर्ण समजल्या जाणाऱ्या ठाणे सत्तरी येथील सात भावांचा त्रैवार्षिक घोडेमोडणीचा उत्सव गावासाठी भूषणावह बाब आहे. यात हजारो नागरिक, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदा हा पारंपरिक लोकप्रकार कोळगिरो व मंडळगिरो या विस्तीर्ण मैदानावर २९ मार्च रोजी साजरा होणार आहे. या नृत्य अविष्काराचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे सत्तरी येथे आयोजित केलेल्या सात भावांच्या प्रतिनिधींनी केले आहे.

यावेळी प्रतिनिधींनी सांगितले की, घोडेमोडणी उत्सव हा गावासाठी एक आनंद सोहळा असून दर दोन वर्षांनंतर हा संपन्न होत असतो. याच्या माध्यमातून १४ घोड्यांचा संगम पाहण्याची संधी लाभत असते. ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा सोहळा साजरा करण्यासाठी सात गावांचे सर्व बांधव एकत्र येऊन यासाठी आपल्यापरीने योगदान देत असतात.

दि. २९ मार्च रोजी सकाळपासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवापूर्वी सर्व सात भावांची बैठक होणार अाहे. सोहळा आनंददायी वातावरणात साजरा करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. २९ रोजी सकाळी धार्मिक उपक्रम व दुसऱ्या सत्रात साडेचार वाजता घोड्यांची तयारी सुरू होणार आहे. सर्वप्रथम ठाणे गावातील चार घोडे तयार होऊन देवाचा आशीर्वाद घेतात व आपल्या नृत्याविष्काराला सुरुवात करतात. त्यानंतर पाल सत्तरी येथील घोड्यांचे आगमन होते व त्यांना मान-सन्मानाने देवाच्या दर्शनासाठी आणण्यात येते. अशाच प्रकारे चरावणे, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक, गोळावली, रिवे आदींना मानसन्मानाने देवाच्या दर्शनासाठी आणण्यात येते. त्यानंतर १४ घोडे एकत्र येऊन नृत्य अाविष्कारला प्रारंभ होतो. सदर वैशिष्ट्यपूर्ण नृत्याविष्कार पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. रात्री बारा ते एक पर्यंत नृत्य आविष्कार चालूच असतो. भाविकांचे नवस फेडणे, गार्हाणे घालणे आदीसारखे कार्यक्रम पार पाडण्यात येतात. पहाटे सदर १४ घोडे देवळापाशी होळीकडे जाऊन नृत्याविष्कार करतात. धार्मिक परंपरा व प्रक्रिया पूर्ण करून मांसाहारी भोजनानंतर उत्साहाची समाप्ती होते.

गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. यासाठी सात गावातील बांधवांची एकजूट महत्त्वपूर्ण आहे, असे पाली सत्तरी येथील बुधाजी गावकर यांनी सांगितले.  

गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत घोडेमोडणी उत्सव चांगलाच प्रसिद्ध आहे. यात मोठ्या संख्येने लोक आपली उपस्थिती लावत असतात, असे चरावणे सत्तरी येथील नारायण गावस यांनी सांगितले.  

अशा पारंपरिक सोहळ्याने सात गावांना वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. यामुळे हा पारंपरिक सोहळा तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी तरुण पिढीने सहकार्य करावे, असे रिवे येथील महादेव गांवकर यांनी सांगितले. 

सात गावांची एकजूट, धार्मिक परंपरा याच देवस्थानच्या माध्यमातून अबाधित राहिली आहे. याचे श्रेय सात गावातील सर्व बांधवांना जाते. घोडेमोडणी सोहळ्यास भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक संस्था व गावातील तरुण एकजुटीने प्रयत्न करीत आहेत, असे ठाणे येथील जेष्ठ नागरिकांनी सांगितले. 

हेही वाचा