प्रथा परंपरांचा गोमंतकीय शिगमोत्सव

फाल्गुन महिना म्हणजेच गोवेकरांचा ‘शिगमा’ साजरा करण्याचा महिना. छोट्यामोठ्यांना विशेषतः पुरूषांचा हर्ष शिगेला पोहचवणारा हा महिना. महिलांचा धालोत्सव तर पुरूषांचा शिगमोत्सव. खरं म्हणजे समृद्धतेचा महिना.

Story: शिगमोत्सव विशेष |
23rd March, 11:44 pm
प्रथा परंपरांचा गोमंतकीय शिगमोत्सव

फळा-फुलांना बहर आणणारा त्यामुळे वाढती उष्णता असून देखील वसंत ऋतु बद्दल आपूलकी जाणवू लागते आणि मग मागील वर्षाची सुख-दु:खे विसरून कष्टकरी समाज शिगमोत्सवाच्या तयारीला लागतो. ढोल ताशांची डागडूजी सुरू होते. गावातील धार्मिक कार्यासाठी राखून ठेवलेली पवित्र जागा ‘मांड’ शेणाने सारवून स्वच्छ केली जाते आणि मग या ठिकाणी समई पेटवून गाऱ्हाणे घालून मांडाच्या गुरुला ढोल-ताशे, कासाळ या वाद्यांना व उपस्थित जनसमूदायाला तिबा करून नमन घालण्याचा कार्यक्रम झाला की शिगमोत्सवाला सुरुवात होते.

गोव्यामध्ये ‘धाकटो शिगमो’ व ‘व्हडलो शिगमो’ अशा पद्धतीने शिगमोत्सव साजरा होतो. फाल्गुन शु. नवमीपासून होणारा शिगमोत्सव होळी पौर्णिमेने संपतो तर हा दक्षिण गोव्यातील शिगमोत्सव नवमीपासून सुरु होतो. या दिवसात खेळे गावातील  देवदेवताना नमन घालून घराघरात खेळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ‘जती’ गात निरनिराळ्या पद्धतीने फेरे धरून नाचतात.

गुरुदेव, पाळणा, रघुनाथ, भपरतोळा, कोकण चाफा, विठोबा, मोरूलो असे नाचण्याचे कितीतरी प्रकार येथे पहावयसा मिळतात. देहभान विसरून नाचणाऱ्या या खेळाकडे पाहून पाहणाऱ्याच्या मनातील शीण, थकवा सुद्धा कुठल्याकुठे नाहीसा होतो. धाकट्या शिगमोत्सवात रोमट मारणे हा प्रकार विशेषत: पहावयास मिळतो. यांना रोमटामेळ असेही म्हटले जाते. येथील शिगमोत्सवाची सांगता होळी पाैर्णिमेने होते. या दिवशी रंगपंचमी असते. शिगमोत्सवात गडे पाहण्याची प्रथा आहे. शिगमोत्सवात केवळ मनोरंजन नसून धार्मिक प्रथाही पाळल्या जातात. 

होळी पौर्णिमेनंतर सुरू होणारा शिगमोत्सव म्हणजे व्हडलो शिगमो. वाळपई, सत्तरी, सुर्ल, पेडणे या गावात हा शिगमोत्सव साजरा होतो. यामध्ये चोर, करवली, घोडेमोडणी असे लोककलेचे विविध प्रकार पहावयास मिळतात. या ठिकाणी लोकगीतातून सोकारतीचे गायन होते. आपल्या व्यथांचे गायन सोकारतीमधून केलेले असते.

गोमंतकीयांच्या जीवनात शिमगो ही एक पर्वणी आहे. त्याचबरोबर धार्मिकतेची झालर असलेला हा उत्सव गावागावांमधून वेगवेगळ्या पद्धतीने त्याचप्रमाणे निरनिराळ्या नावांनी साजरा होतो. तीन डोक्यांची चूल तयार करून त्यावर भात शिजवणारा काणकोणचा शिशिरान्नी उत्सव. रहाटावर लोंबकळणारा बाळ्ळी गावाचा शिडियोत्सव, जिवंतपणे संपूर्ण जमिनीमध्ये गाडून घेणारा मानवाचा करंझोळ-झरमे येथील चोरोत्सव, अग्नीचे तुषार अंगावर झेलणारा मलकर्णेचा शेणी उजोत्सव हे उत्सव अचंबित करणारे असेच आहेत. याशिवाय सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणणारा फातर्पे शांतादुर्गा-कुंकळ्ळीकरणी देवीचा छत्रोत्सव. फातर्पे शांतादुर्गा देवीचा ‘तोपशोत्सव’, वळवईचा गोंधळ, धार्मिक सलोखा राखणारा सुर्ल गावाचा शिगमोत्सव असे कितीतरी उत्सव गोमंतकामध्ये शिगमोत्सवाच्या निमित्ताने साजरे होत असतात.

विविधतेतून एकता साधणाऱ्या उत्सवामधून रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून डोक्यावर फुलांचे तोप, गळ्यात हातात अबोली फुलांच्या माळा घालून तोणयामेळात पारंगत असलेले लोक पहावे तर केपे तालुक्यातील बारशे गावात. अबोली फुलांअभावी कागदी फुलांचा तोप घातल्यास एकतरी अबोलीचे फूल व पातीचा तुरा त्या तोपात रोवण्याची प्रथा या लोकांनी राखून ठेवलेली आहे. खेळासाठी लागणाऱ्या तोणया काठ्या अजूनही रानातूनच आणतात. ऐक्याचे प्रतीक असलेल्या या मेळामध्ये जवळजवळ हजारभर लोक एकत्र येताना दिसतात. प्रत्येकाच्या घरी खेळणाऱ्या गड्यासाठी खास जेवण तयार असते. साळचे गडे, आमोणेचे गडे हा अवसरी प्रकारही शिगमोत्सवात असतो. शिवाय काैल, तरंग, गुलाल असेही प्रकार पहावयास मिळतात. 

सारांश शिगमोत्सव म्हणजे केवळ पर्वणी नसून आपल्या रूढी परंपरा राखून ठेवणे, मिळून मिसळून आनंदोत्सव साजरा करणे, कलांना प्रोत्साहन देणे शिवाय होळीसाठी दुरीगोत्सवासारख्या उत्सवासाठी निरनिराळ्या झाडपेडांचे रक्षण करून ती वाढवणे, उत्सवाच्या निमित्ताने व्यवसायासाठी लागणाऱ्या कामाचा सराव करणे अशी कितीतरी उदाहरणे शिगमोत्सवामध्ये दिसून येतात.


पिरोज नाईक