पराभवाच्या भीतीनेच भाजपने काँग्रेसची बँक खाती गोठवली!

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका; भाजप सरकारच्या कृतीचा केला निषेध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd March, 12:44 am
पराभवाच्या भीतीनेच भाजपने काँग्रेसची बँक खाती गोठवली!

पणजी : लोकसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास नसल्यामुळे भाजप सरकारने काँग्रेसची विविध मार्गांनी कोंडी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसची अकरा बँक खाती गोठवण्यात आली आहेत असे म्हणत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदवला.

पणजीतील काँग्रेस भवनात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा आणि माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप उपस्थित होते.

अमित पाटकर म्हणाले, २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी २१० कोटी रुपयांच्या प्राप्तीकर मागणीवर खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेसची खाती गोठवून आणि जबरदस्तीने ११५.३२ कोटी रुपये काढून घेऊन भाजपने काँग्रेसवर अन्याय केला आहे. लोकांनी काँग्रेस पक्षाला दिलेल्या देणग्या भाजपने लुटल्या आहेत. आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. प्रचारासाठी काँग्रेसकडे पैसे नाहीत. भाजपसह कोणताही राजकीय पक्ष आयकर भरत नाही. तरीही काँग्रेसची अकरा बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेसला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठीच भाजप सरकारने हे सर्व केले आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला.

भाजपची दोन्ही इंजिन निकामी : आलेमाव

युरी आलेमाव म्हणाले, भाजप लोकशाही संपवून टाकण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. निवडणूक आयोगाने यात तत्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. रोजगार, खाणी, म्हादई आदींसह इतर प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरले आहे. दोन्ही इंजिन निकामी झाली आहेत, असा निशाणाही त्यांनी साधला. 

हेही वाचा