साळातील गडे, ठाणेची घोडेमोडणी, मळकर्णेचा शेणी उजो, सांगेतील वीरभद्र प्रसिद्ध उत्सव
पणजी : गोव्याच्या समृद्ध, वैभवशाली भव्य संस्कृतीचे दर्शन घडवणारा सण म्हणजे शिमगोत्सव. घोडे-मोडणी, फुगडी रोमटामेळ यांसह मार्गावरून निघणारी चित्ररथ मिरवणूक तर डोळे दीपवणारीच असते. या मिरवणुकीत उभे केले जाणारे हिंदू पौराणिक कथांमधील प्रसंग नजर खिळवून ठेवतात. गोव्याच्या विविध तालुक्यांत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हा पारंपरिक शिमगोत्सव साजरा केला जातो.
चतुर्थी, दिवाळीप्रमाणेच होळी हा गोव्यातील सर्वात मुख्य सणांपैकी एक सण आहे. तिथीनुसार होळी सण हा रविवार, २४ मार्च रोजी असला तरी केपे तालुक्यातील बार्शे, मोरपिर्ला येथे पारंपरिक शिमग्याला सुरुवात झाली आहे. साळ येथील गडे, ठाणेतील घोडेमोडणी, झर्म्याचा चोरोत्सव, मळकर्णेचा येथील शेणीऊजो, सांगेतील पारंपरिक वीरभद्र हे शिमग्यातील प्रसिद्ध उत्सव आहेत. गडे, घोडेमोडणी व चोरोत्सव रविवारपासून सुरू होणार आहे.
यंदाच्या शिगमोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे
फोंडा -२६ मार्च २०२४
कळंगूट - २७ मार्च
सांखळी व डिचोली -२८ मार्च
वाळपई - २९ मार्च
पणजी - ३० मार्च
पर्वरी - ३१ मार्च
पेडणे - १ एप्रिल
काणकोण - २ एप्रिल
वास्को - ३ एप्रिल
शिरोडा व कुडचडे -४ एप्रिल
केपे तसेच धारबांदोडा - ५ एप्रिल
मडगाव - ६ एप्रिल
म्हापसा तसेच सांगे - ७ एप्रिल
कुंकळ्ळी - ८ एप्रिल
उत्सव गाव दिनांक
गडे उत्सव - साळ - २५ ते २७ मार्च
चोरोत्सव - झर्मे - २५ मार्च
घोडेमोडणी - ठाणे - २९ मार्च
करवली - शिरोली - २६ व २७ मार्च
चोरोत्सव - धावे - २५ मार्च
शेणीऊजो - मळकर्णे - २४ मार्च
वीरभद्र - सांगे - ८ एप्रिल
शिमग्याचा इतिहास आणि परंपरा मोठी आहे. यंदाची होळी रविवारी रात्री झाल्यानंतर सोमवारी (२६ मार्च) रंगपंचमी आहे. रंगपंचमीच्या दिवशी गुलाल उधळणे आणि एकमेकांना रंग लावणे हे आलेच. ग्रामीण भागात आजही लोक ‘शबयऽ शबयऽऽ’ म्हणत भीक मागण्यासाठी फिरतात. दरम्यान, अशा लोकांची संख्या आता कमी होत आहे. ‘शबयचो बावलो, तारीकडे पावलो...’ हे गाणे शिगम्याच्या काळात पूर्वीसारखे ऐकू येत नाही.
मूळ संस्कृत सुग्रीष्मक या शब्दापासून शिगमो या शब्दाची उत्पत्ती सुगिम्मअ,सुगीम्म,शिगमो अशी झाली,असे मानतात.कोकणात आणि महाराष्ट्रात याला शिमगा म्हणतात.गोव्यातील शिगमो हा कष्टकरी समाजाचा महत्त्वपूर्ण लोकोत्सव आहे. दक्षिण गोव्यात या शिगम्याला ‘धाकटो शिगमो’ आणि उत्तर गोव्यात ‘व्हडलो शिगमो’ म्हणतात. दक्षिण गोव्यातील शिगमो फाल्गुन शुद्ध नवमीला सुरू होऊन पौर्णिमेला संपतो, तर उत्तर गोव्यातील उत्सव पौणिमेला सुरू होऊन रंगपंचमीला समाप्त होतो.काही गावातून तो पुढील दहा दिवसांपर्यंत चालतो.
शिगम्याची सुरवात ही मांडावरील दैवताला गाऱ्हाणे घालून होते. ग्रामदैवतास हाक मारल्यावर नमन सुरू होते. हे सुरूच असतानाच काहींच्या अंगात संचारून भार येतो. या 'गड्यांना' त्यांचे सहकारी सांभाळतात. ढोल, तासे, कांसाळी, झांजा, कर्णो, बांको, शिंग, जघांट ही वाद्ये वाजवीत मिरवणुकीने ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत जातात,याला रोमट असेही म्हणतात.मंदिरातील सभामंडपात तालगडी अथवा चौरंग-ताळे खेळून गावाच्या परिक्रमेसाठी निघतात.प्रत्येक अंगणात मेळ विविध लोकनृत्ये सादर करतात.मिरवणूक निघताना लहान-मोठ्या गुढ्या, पताका, तोरणे, अब्दागीर, झाडांच्या डहाळ्या,रानफुलांचे झेले घेऊन नाचतात.
तसेच राम,सीता,हनुमान, कृष्ण, राक्षस अशी पौराणिक तसेच शिवाजी, मावळे, संतपुरुष अशी ऐतिहासिक पात्रे आणि धनगर,अस्वल,गवळण,वानर,मद्यपी अशी सोंगे साकारणारी मंडळी या वेळी रोमटाच्या वेळी दृष्टीस पडतात. ‘चानयेचया पिला तुका तीन गो पाट। रावणान शिते व्हेल्या दाखय वाट’ किंवा ‘विटेवरी उभा कटेवरी हात। काय मौजेचा पंढरीनाथ’ अशी दोन ओळींची गीते असतात. चालताना ते ‘ओस्सय-ओस्सय’ असे म्हणत असतात.ठरलेल्या कालावधीत गावाची फेरी पूर्ण करून मेळ मांडावर परत येतात.
मग पुन्हा नमन सुरू असताना गडेमंडळींच्या अंगात संचारते. ते तडक स्मशानात जातात काही मांडावरील असे अंगात आलेले गडे स्मशानात जाऊन प्रेतांचे अवशेष घेऊन परततात. डिचोलीतील साळ गावात ही प्रथा उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. पिळगाव तसेच कुडणे या गावातही या प्रथा वर्षानुवर्षे सुरूच आहेत.
गोव्यात शिगमोत्सवात साजऱ्या होणाऱ्या विविध प्रथा, नृत्यकला आणि उत्सव
१) विरामेळ : वीर म्हणजे गावचे दैवत.त्या दैवताचा संचार शिगमोत्सवाच्या वेळी संपूर्ण गावातून होतो. यात युद्धसदृश्य सादरीकरण करणाऱ्यांचा भरणा असतो.त्यात तीन-चार व्यक्तींच्या हातात नंग्या तलवारी असतात. वेळीप गडी हातात मोरपिसांचा भलामोठा जुडगा घेऊन, तर भगत हातात तलवार घेऊन सामील होतो. मोरपिसांच्या जुडग्याला ‘पिल्लकुचा’ म्हणतात. वाद्यांचे वादन गती पकडते,तेव्हा पिल्लकुचा घेतलेल्याच्या अंगात येते.त्याला ‘मोड’ असेही म्हणतात. भगत आपल्या हातातील तलवार जोरात फिरवून थांबतो.नंतर तलवार घेतलेले दोघेजण थरारक नृत्य करतात. काही ठिकाणी धारदार तलवारी मांडून त्यावर गड्याला झोपवितात आणि त्याच्या पाठीवर नृत्य केले जाते.याला ‘कातर’ असे म्हणतात. ही प्रथा काणकोण सांगे भागात उगम पावल्याचे सांगितले जाते.
२) घोडेमोडणी : उत्तर गोव्यातील बोर्डे, कुडणे,ठाणे,मोरजी, कासारपाल,नातोडा इत्यादी गावांतून शिगमोत्सवात घोडेमोडणी हे वीरश्रीयुक्त घोडा-नृत्य करतात.गावातील निवडक दोन ते पाच पुरुष वीरयोद्धाचा पोषाख घालतात. बांबूच्या कामट्यानी बनविलेल्या इरल्याला घोड्याचा लाकडी मुखवटा बांधून तो रंगीत लुगडी व फुलांनी सजवितात.योद्धाच्या डोक्यावर फुलांनी सजविलेले पागोटे असते. सजविलेला घोडा योद्ध्याच्या कमरेला बांधून हातात तलवार घेऊन युद्धनृत्य करतात.ढोल,ताशे, शिंग, कांसाळे या वाद्यांच्या तालावर ही घोडेमोडणी मिरवणूक गावाच्या मंदिरापर्यंत किंवा वेशीपर्यंत जाऊन येते.काही वेळा दोन घोडेस्वार एकमेकांना भिडतात. तेव्हा त्यांचे साथीदार त्यांना आवरतात. काही घोडेमोडणीत वेगवेगळी ऐतिहासिक पात्रेही पहायला मिळतात.
३)चोरोत्सव : साळातील गडे उत्सवाप्रमाणेच सत्तरी येथील चोरोत्सव प्रसिद्ध आहे. सत्तरीच्या गावांत होळीनंतर दिवशी चोरोत्सव होतो. झर्मे आणि करंजाळेचा चोरोत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. या दोन्ही गावांत चोरांना जमिनीत पुरण्याची प्रथा आहे. इतर गावात चोरोत्सवामध्ये चोरांना पुरत नाहीत. दरवर्षी झर्मे येथे दुसऱ्या दिवशी चोरोत्सव होतो. यंदा झर्मेचा चोरोत्सव सोमवार, २६ रोजी, तर करंजोळचा चोरोत्सव गुरुवारी २८ रोजी आहे. झर्मेत यंदा सोमवारी चोरोत्सव, तर मंगळवारी घोडेमोडणी, पालखी आणि रणमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्तरी तालुक्यातील सर्व गावांत चोरोत्सव होतो. झर्मे आणि करंजोळ येथे चोरांना जमिनीत पुरले जाते. या दोन्ही गावांतील चोरोत्सव प्रसिद्ध आहे.
४) मळकर्णेचा शेणीऊजो : हा उत्सव यंदा रविवार, २४ रोजी होणार आहे. या सणादरम्यान लोक शेणी धुतात आणि नंतर त्यांची होळी करतात. मळकर्णे येथील लिंगाजवळ तसेच इतर पारंपरिक ठिकाणी होळी पेटवली जाते. होळीच्या वेळी लोक नाचतात.
५) वीरभद्र : गुढी पाडव्याच्या आदल्या सांगेत ८ एप्रिल रोजी वीरभद्र साजरा केला जाणार आहे. सरस्वती समाजातील एक वीरभद्राचा वेश धारण करतो. मापारी समाजातील एक माणूस हाताने चुडी देतो. वडील समाजातील एकजण तलवार देतो. नंतर वीरभद्र तलवार आणि चुडी घेऊन नाचतो. वीरभद्राच्या दर्शनासाठी दरवर्षी गर्दी असते.
६) ‘न्वहरो’: शिगम्याच्या उत्सवात फोंडा आणि सांगे भागांत नवरदेवाची मिरवणूक निघते.त्याला ‘न्वहरो’ असे म्हणतात.नवरदेव नटून-थटून नवरीकडे निघतो. परंतु वाटेत प्रेतयात्रा आडवी येते.त्या अभद्र प्रसंगामुळे घाबरून नवरदेव पळ काढतो. गावागावातील शिगमोत्सव वेगवेगळ्या विधींनी समाप्त होत असला, तरी बहुतेक ठिकाणी धुळवडीने त्याची समाप्ती होते. धुळवडीच्या वेळी गुलाल उधळण्याची परंपरा आहे. मात्र हा गुलाल फक्त पुरुषांच्या अंगावर उधळण्यात येतो. दक्षिण गोव्यातील जांबावली या गावच्या शिगम्याचा ‘गुलाल’ प्रसिद्ध आहे.
७) गजानृत्य : शिगमो आणि दसऱ्याच्या निमित्ताने धनगरजमात गजानृत्य करते. सर्व पुरुष लांब सफेद पायघोळ चोळणा घालतात त्यावर हाताच्या पंजाकृती लाल रंगात रंगविलेल्या असतात. डोक्याला सफेद मुंडासे, कमरेला शेला, गळ्यात कंठा, हातात कडे, कानात बाळी, पायांत वाक्या आणि हातात वेतकाठी घेऊन गोलाकार नृत्य करतात. नृत्याला ढोल, ताशा, थाळी व घुमट ही तालवाद्ये आणि कोंडपावा तसेच सुरपावा ही स्वरवाद्ये असतात. ‘होरबला’ आणि ‘चांगबला’ अशी हाकाटी देत गिरक्या मारून वेगवेगळ्या हस्तमुद्रा करीत नृत्य रंगत जाते.
८) तालगडी, तोणयांमेळ, चौरंग, ताळो, ताणयांखेळ, जोत(आरती), गोफ : थोड्या-फार फरकाने ही लोकनृत्ये गोव्यातील शिगमोत्सवात पुरुषकलाकार सादर करतात.घुमट, शामेळ, कांसाळे यांच्या साथसंगतीने लोकगीते गात, हातांत रंगीबेरंगी रुमाल घेऊन नर्तकांच्या जोड्या फेर धरून नाचतात. अधूनमधून ‘भले भले’ असे म्हणत ज्या कुटुंबाच्या अंगणात नृत्य चालू असते त्या कुटुंबाचे भले इच्छितात. तोणयां मेळमध्ये रुमालाऐवजी लाकडी टिपऱ्या हातांत घेऊन एकमेकांच्या टिपरीवर ठोका देऊन द्रुत गतीचे नृत्य करतात. चौरंग नृत्यात एखाद्या गीतकथेच्या तालावर संथ गतीने फेर धरला जातो. शेवटी द्रुत गतीचे कवन गाताना त्या तालावर नृत्य करून थांबतात.
९) शिरी रान्नी : शिरी रान्नी हा एक पारंपारिक उत्सव आहे जो काणकोण भागात साजरा केला जातो. या विधी दरम्यान, तीन गड्यांच्या डोक्यावर तांदूळ शिजवला जातो. 'रान्नी' या शब्दाचा थेट अनुवाद 'चूल' असा होतो. देवांप्रती आपल्या भक्तीच्या उल्लेखनीय प्रदर्शनात, काणकोण तालुक्यातील गांवडोंगोरी येथील तीन ग्रामस्थ लाकडाच्या आगीवर भात शिजवण्यासाठी स्वेच्छेने आपले शिर देतात.
गोव्याचा इतिहास, येथील समृद्ध परंपरा आणि संस्कृतीशी बांधील असलेला गोवेकर जो पर्यंत आपली गड्याची भूमिका वठवत राहिल तो पर्यंत शीमग्याच्या ढोल-ताश्यावर 'घुमचे कटर घुम'चे पडसाद उमटत राहील.
संदर्भ : गोंयच्या लोकवेदांचे सौंदर्यशास्त्र, पणजी, २०१७- लेखक : पांडुरंग फळदेसाई