व्यसनमुक्तीसाठी संत संप्रदायाचे कार्य महत्त्वाचे

धुम्रपान निषेध दिवस नुकताच साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या वाईट सवयीपासून धूम्रपान होत असते. या धूम्रपानाचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. आतापर्यंत धूम्रपनाच्या माध्यमातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा अनेक घटना देशामध्ये व जगामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे धूम्रपान संदर्भात जनजागृती करून धूम्रपानाच्या आहारी जाणाऱ्यांचे मार्ग बदलावेत, त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावा यासाठी धूम्रपान निषेध दिवस साजरा करण्यात येत असतो.

Story: भवताल |
16th March, 10:47 pm
व्यसनमुक्तीसाठी संत संप्रदायाचे कार्य महत्त्वाचे

दोन दिवसापूर्वीच 'धूम्रपान निषेध दिन' साजरा करण्यात आला. देशाच्या अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था यामध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. धूम्रपान केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर कशाप्रकारे होऊ शकतात. त्या संदर्भाची जनजागृती करण्यात आली. धूम्रपानाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, मोर्चे व पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली. मुलांसाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांमध्ये धूम्रपानासंदर्भात जनजागृती करण्यावर भर देण्यात आली. सामाजिक स्तरावर अनेक प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले. धूम्रपानामुळे होणार्‍या दुष्परिणामासंदर्भात विकसित माहिती देण्याचा हा प्रयत्न अनेक ठिकाणी करण्यात आला खरा मात्र त्यातून आपण जोपर्यंत बोध घेत नाही तोपर्यंत धूम्रपान निषेध दिवस हा फक्त कागदापुरताच शिल्लक राहणार आहे.


एकेकाळी सिगरेट, बिडी ओढणे याकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागामध्ये असे स्पष्टपणे दिसत होते. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरी आल्यानंतर किंवा काम करून थकलेल्या जीवाला थोडासा विसावा मिळावा म्हणून बिडी, सिगरेट ओढण्याची परंपरा रूढ झाली. गावाचे परिवर्तन हळूहळू शहरांमध्ये होऊ लागले. सिगरेट, बिडी पिल्यानंतर आरोग्यावर कशाप्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात. या संदर्भाचे जनजागृती झाल्यानंतर सिगरेट व बिडी पिण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले. आत्ताच्या घडीस हे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीचे आपणच शिल्पकार अशा प्रकारचा अंदाज बांधून गुटखा, अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे प्रमाण एवढे झपाट्याने वाढू लागले आहे की याचा धूर आपल्या घरापर्यंत पोहोचू लागलेला आहे. घरातील कानाकोपऱ्यापर्यंत याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. अंमली पदार्थांमुळे होणार्‍या आरोग्यावरील दुष्परिणाम व गंभीर परिणाम या संदर्भाची माहिती असून सुद्धा आज तरुणपिढी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गोव्यासारख्या विकसित भागांमध्ये 'सनबर्न' यासारख्या पार्टी आयोजित करून त्याबद्दल तरुण पिढीला आकर्षित करण्याचे प्रयत्न हे बरबादीचे खरे कारण ठरू लागलेले आहे. सरकारला कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळतो खरा, मात्र ज्याच्या विचारावर, ज्याच्या खांद्यावर भारताचे भविष्य आपण रंगवू पहात आहोत त्या तरुण पिढीचे भवितव्य 'बर्न' होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. यामुळे येणाऱ्या काळात त्याचे गंभीर परिणाम आपल्या समाजावर निश्चितच होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

अंमली पदार्थ हा आज प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला आहे. ज्यांच्या खांद्यावर भारताच्या भवितव्याच्या पालख्या घेण्याची ताकद निर्माण करण्या ऐवजी आज तरुण मुलांची प्रेते ओढण्याची पाळी पालकांवर येऊ लागलेली आहे हे खरोखरच दुर्दैव म्हणावे लागेल. प्रत्येकाला वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ नये. मात्र अशा प्रकारच्या गोष्टी विचार करून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मुलांचा सांभाळ करतानाच समाजातील तरुण पिढी याकडे आकर्षित होऊन ती बरबादीच्या दिशेने वाहून जाणार नाही याची जबाबदारी घेण्याचे कर्तव्य हे प्रत्येकाच्या खांद्यावर देण्याची खरी गरज आहे. कारण ती काळाची गरज बनलेली आहे. 

गोवा हे अंमली पदार्थाचे प्रमुख केंद्र अशा प्रकारचा चुकीचा समज हा जगामध्ये निर्माण झालेला आहे. समुद्रकिनारी भागातील तरुण आज मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हे लोण आता हळूहळू ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागलेली आहेत. यामुळे सरकारच्या पोलीस यंत्रणेची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. फक्त पैशांच्या कागदी नोटांसाठी सरकारच्या संबंधित यंत्रणेने अशा प्रकारच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून समाजाच्या बरबादीचे खलनायक न बनता सकारात्मक पिढी उभी करण्याचे नायक बनणे हे आजच्या काळाची खरी गरज आहे.

अवघ्याच वर्षांपूर्वी 'उडता पंजाब' नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमांमध्ये पंजाबात तरुण पिढी गांजा व अंमली पदार्थाच्या आहारी कशी जाते याचे भयानक चित्र दाखविलेले आहे. अशा चित्रपटाच्या माध्यमातून आपण जागरूक होणे अत्यंत गरजेचे आहे. चित्रपट असो किंवा नाटक, जनजागृतीचे चांगल्या प्रकारचे माध्यम आहे. समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टींवर फुंकर घालण्याऐवजी त्यातून समाज नष्ट करण्याचे आगडोंब निर्माण होणार नाहीत. याकडे विशेष लक्ष देणे आज अत्यंत गरजेचे बनलेले आहे. 

एरवी सांगावेसे वाटते ते असे की आज आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संत संप्रदाय आहेत. या संत संप्रदायाचे समाज अध्यात्मिक क्षेत्राकडे वळून व्यसनमुक्तीची नवी चळवळ निर्माण करण्याचे महत्त्वाचे घटक आहेत हे आपण विसरून चालणार नाहीत. आज संत समाज संप्रदाय आहेत. म्हणूनच समाजामध्ये व्यसनमुक्ती करण्याची मोठी चळवळ निर्माण होऊ लागलेली आहे. याचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत खरे, मात्र ज्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थाच्या मोहजाळ्यात फसवून त्यांचे भवितव्य अंधाराच्या साम्राज्यात नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे. त्यामध्ये संत संप्रदायाने व्यसनमुक्तीची चळवळ यामध्ये आशेचा किरण दिसू लागलेला आहे. आज मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीचे कार्यक्रम होऊ लागलेले आहेत. सिगारेट, बिडी असो तंबाखू गुटखा असो किंवा अंमली पदार्थ असो. हे सर्व घातक प्रकार ईश्वराने दिलेल्या सुंदर जीवनाला बरबाद करून टाकणारे आहेत. त्या पुढे जाऊन संत संप्रदायाने समाजाच्या रक्षणासाठी व या समाजाची वाटचाल सुकर मार्गाने पुढे जावी यासाठी केलेले कार्य व करीत असलेले कार्य हे खरोखरच ईश्वरप्रति आहे असेच म्हणावे लागेल.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलाप्रती जागृत राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या भोवती असणारी मित्रमंडळींच्या संदर्भात सातत्याने सतर्क राहिल्यास येणाऱ्या धोक्याचे आपण बळी ठरणार नाही असे सांगावेसे वाटते. आज बाप होणे सोपे असते मात्र पालक होणे अत्यंत कठीण बाब आहे. पालकावर मुलांची जबाबदारी असते. आपली मुले जबाबदारीने वागतात का? याकडे विशेष लक्ष देणे हे पालकांचे कर्तव्य असते. यामुळे पालकांनी निष्काळजीपणाने न वागता सतर्कता बाळगून येणाऱ्या धोक्यात आपले पाल्य वाहून जाणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज बनलेली आहे. धूम्रपान निषेध दिवस हा जरूर साजरा करावा. मात्र हा दिवस साजरा करीत असताना प्रत्येकाने मनामध्ये, हृदयामध्ये, निश्चय करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण निश्चयाच्या माध्यमातून आपण ठरवलेल्या गोष्टीपर्यंत जाऊ शकतो हे प्रत्येकाने जाणले पाहिजे.

माणूस हा लहरी प्राणी आहे. आपल्यासमोर निर्माण होणार्‍या भुलभुलैय्याकडे तो सातत्याने आकर्षित होत असतो. हे आकर्षण आपल्या बरबादीचे कारण तर ठरणार नाही ना? याचा निदान थोडासा तरी विचार करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. अंमली पदार्थ समुद्रकिनाऱ्यापर्यंत असो किंवा ग्रामीण भागाच्या टोकापर्यंत असो. त्या संदर्भात आपण गंभीर राहून याकडे आपली मुले किंवा आपण आकर्षित होणार नाही याची जबाबदारी घेणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे.


उदय सावंत, वाळपई