इजिप्तचा निरोप

Story: प्रवास |
16th March, 10:39 pm
इजिप्तचा निरोप

पॅपिरस वनस्पतीपासून प्राप्त झालेल्या, पपायरसने प्राचीन इजिप्शियन सभ्यतेमध्ये लेखन आणि दस्ताऐवजीकरणासाठी प्राथमिक सामग्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धार्मिक ग्रंथ, प्रशासकीय नोंदी, साहित्य आणि अगदी वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन रेकॉर्ड करण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देणारा कागदाचा सर्वात जुना प्रकार म्हणजे पपायरस! त्याच्या टिकाऊपणाने आणि व्यापक उपलब्धतेने इजिप्तच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाला आकार देऊन ज्ञानाचं संरक्षण आणि प्रसारण सुलभ केलं. हा पपायरस नक्की कसा बनवतात हे बघायला आम्ही गेलो. इजिप्तमध्ये हा आमचा शेवटचा दिवस होता. इथे येऊन कागदाचा आविष्कार न पाहता जाणं पटेना म्हणून शेवटच्या क्षणी हा प्लॅन आखला होता. ह्या शिवाय आम्हाला इथली बाजारपेठही पहायची होती. 


आम्ही ज्या पपायरस शॅापमध्ये गेलो तिथे एक माणूस ह्या कामाचं आम्हाला प्रत्यक्षिक करून दाखवत होता. त्याने आम्हाला सांगितल्याप्रमाणे, पूर्वी नाईल डेल्टा प्रदेशात पॅपिरस वनस्पतीची दीर्घकाळ लागवड केली जात होती, आजही केली जाते. ह्या वनस्पतीचे देठ किंवा स्टेम्स गोळा केले जातात, तिच्या साली तासून फक्त मध्यवर्ती भाग पातळ पट्ट्यांमध्ये कापला जातो, तो एकामेकांवर रचवून एकत्र दाबला जातो आणि कापडात गुंडाळून सुकायला उन्हात ठेवला जातो. ह्यामुळे एक गुळगुळीत पातळ पृष्ठभाग तयार होतो. जो लेखनासाठी उत्कृष्ट असतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या बांबूसारख्या दिसणाऱ्या वनस्पतीचे तुकडे करणं, ते एकामेकांवर रचून ठेवणे इत्यादी त्याने कुशलतेने पटापट करून दाखवल्या. मग आम्हाला त्याने अगोदर तयार करून ठेवलेले पपायरसचे वेगवेगळे नमुने दाखवले. दाट, पातळ, चौकोनी, स्क्रोल इत्यादी. आणि एकावर शाईने इजिप्तच्या जुन्या लिपिने काहीतरी लिहूनही दाखवले. जवळून पाहायला नि त्याची कला निरखायला त्याने आमच्या हातात तो ‘पेपर’ दिला. पेपर बनवण्याच्या ह्या त्याच्या कलेमुळे आम्ही सगळेच अचंबित झालो. तिथे बरीच चित्रं विक्रीसाठी ठेवली होती. पण खूप महाग. त्यामुळे त्यांना फक्त बघून आम्ही त्याचा निरोप घेतला. 

इथून आम्ही मार्केट पाहायला गेलो. मार्केटमध्ये ही गर्दी! सुविनिर घ्यायची तर इथल्या लोकल मार्केटमध्ये येऊनच. कारण पिरॅमिडकडे असलेले विक्रेते ज्या गोष्टींसाठी अव्वाच्या सव्वा किमती सांगत होते, त्याच गोष्टी इथे खूप स्वस्त दरात उपलब्ध होत्या. आम्ही भरपूर खरेदी काही केली नाही, पण वेळ मात्र भरपूर घालवला. इथल्या स्त्रीट फूडमध्ये ‘शावर्मा’ फेमस. त्यामुळे तो घेतला. शाकाहारी शावर्मा काही मिळेना. त्यामुळे आदित्य आणि अद्वैतला हा अनुभव चुकला. पण इतरांनी खूप मजा करत इथल्या ह्या खास पदार्थाचा आस्वाद घेतला. 


मी इजिप्तमध्ये पाऊल ठेवल्यापासून, त्याने मला खूप काही दिलं होतं. इथल्या ऐतिहासिक वास्तूंची भव्यता, वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर अभिमानाने उभ्या असलेल्या पिरॅमिड्सचं कालातीत आकर्षण आणि ह्या देशाच्या हृदयातून वाहणारी भव्य नाईल नदी पाहून मी माझे डोळे दिपवून घेतले होते. ह्या आठवणी मी कायमच्या मनात ठेवणार होते. कैरोच्या चक्रव्यूहासारख्या रस्त्यांवरून भटकणं, प्राचीन सभ्यतेची ती वास्तुशिल्पं अनेकदा पाहूनही प्रत्येक वेळेला तितकंच भारावून जाणं मी मिस करणार होते. गजबजलेल्या बाजारपेठा आणि छोट्या छोट्या कॅफेंच्या चैतन्यमय वातावरणात रमून जाणं, इतिहासाबद्दल केलेल्या गप्पा गोष्टी, विचारांची देवाणघेवाण, सगळं सगळं मिस करणार होते.

पण ह्या समृद्ध इतिहासाच्या आणि चित्तथरारक लँडस्केपच्या पलीकडेही, इजिप्शियन लोकांच्या उबदारपणाने आणि आदरातिथ्याने माझ्यावर खरोखरच कायमचा छाप सोडला होता. हसतमुखाने आमचं स्वागत करणाऱ्या आमच्या टूर कंपनीच्या प्रत्येक स्टाफपासून ते दयाळू अनोळखी लोकांपर्यंत ज्यांनी आम्हाला ह्या भूलभुलैय्यासारख्या शहरात दिशा दाखवली, त्या प्रत्येकाला मी स्मरणात ठेवणार होते. 

इजिप्तचा निरोप घेणं सोपं नव्हतं; एखाद्या जुन्या मित्राला निरोप दिल्यासारखं वाटलं, परत कदाचित इथे येणं शक्य नाही ह्याची जाणीव होती. परंतु इथे परत यायला मला आवडेल हे ही नक्की! परत येऊन ह्या वेळेस राहून गेलेल्या शहरांना भेट द्यायला मला आवडेल. जसजसा माझा इजिप्तमधला वेळ संपत आला, तसतशी मी घरी परतण्याच्या उत्साहात माझं हे विरह दुःख विसरले. पण आजही इजिप्त आठवलं की वाटतं, ‘और एक ट्रीप तो बनती है !’


भक्ती सरदेसाई