लक्ष्य-हरीत ऊर्जा

हरीत ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने पाहता, इतर अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या तुलनेत सर्वात जास्त फायदे दर्शविणारा स्त्रोत कोणता असेल तर तो सूर्य. म्हणूनच, पवन, जैवइंधन (बायोफ्युएल), लाटा आणि भूऔष्णिक जरी अक्षय ऊर्जेचेच स्त्रोत असले तरी भारतात सौर अक्षय ऊर्जा निर्मितीवर सर्वात जास्त भर दिला जातो.

Story: साद निसर्गाची |
16th March, 10:32 pm
लक्ष्य-हरीत ऊर्जा

पारंपरिक ऊर्जा निर्मितीचे पर्यावरणावर होणारे विघातक परिणाम पाहता जीवाश्म इंधनाचा वापर आणखी वेगाने कमी करणे अनिवार्य असल्याचे लक्षात येते. भारतात, सौर ऊर्जा निर्मितीवर जरी सर्वांधिक भर दिला असला तरीही सौर पॅनल सूर्याची ऊर्जा अपेक्षित कार्यक्षमतेने विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतरित करु शकत नाही. जीवाश्म इंधनाचा वापर आणि त्यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी हरीत ऊर्जा निर्माण करणाऱ्या स्त्रोतांना समान प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते. सौर स्त्रोता व्यतिरिक्त अक्षय ऊर्जेचे इतर महत्त्वाचे स्त्रोत:

जैविक इंधन ऊर्जा

जैव द्रव्यापासून बनविलेल्या तसेच ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थाला जैविक इंधन असे म्हणतात. जैविक इंधने प्राणीज व वनस्पतीज घटकांपासून तयार होतात. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांपेक्षा जैविक इंधने वेगळी आहेत. जैवइंधन ही बायोमासपासून मिळणारी ऊर्जा आहे. बायोमास वनस्पती आणि शैवाल सामग्री आणि प्राणी कचरा संदर्भित करते. ही सामग्री नियमितपणे भरली जाते आणि म्हणूनच, जैवइंधन हा उर्जेचा अक्षय स्रोत मानला जातो.

उदाहरणार्थ इथेनॉल. इथेनॉलचा वापर त्याच्या शुद्ध स्वरूपात वाहनांसाठी इंधन म्हणून केला जाऊ शकतो. इथेनॉल हे ऊस किंवा साखरेच्या बीटमधून काढलेल्या साखरेपासून किंवा स्टार्चने भरलेल्या पिकांमधून काढलेल्या साखरेपासून आंबवून तयार केले जाते.  

जैविक इंधनाचे आणखी एक उदाहरण म्हणजे बायोडिझेल. बायोडिझेलचा वापर वाहनांसाठी इंधन म्हणून केला जाऊ शकतो. हे भाजीपाला तेल किंवा प्राण्यांच्या चरबीपासून तयार केले जाते.

पवन ऊर्जा

पवन ऊर्जा तयार करण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जातो. हवा किंवा नैसर्गिक वारा हा पवन ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. पवनचक्कीच्या मदतीने नैसर्गिक हवेमधील गतिशील ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरीत केली जाते. हे रूपांतरण करण्याचे काम वायू टर्बाइन करते. 

तसे पहायला गेलो तर पवन ऊर्जा ही अप्रत्यक्षपणे सूर्यापासून निर्माण झालेली ऊर्जा आहे. वातावरणातील असमान तापमान, पृथ्वीचे अनियमित पृष्ठभाग (पर्वत आणि दऱ्या) आणि सूर्याभोवती ग्रहाची परिक्रमा या सर्व गोष्टी एकत्र येऊन वारा निर्माण होतो.

भरती-ओहोटी ऊर्जा

भरती-ओहोटी ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा सर्वात आश्वासक आणि स्वच्छ स्त्रोत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत जेथे भरतीच्या लाटांचा जोर नेहमी जास्त असतो किंवा भरतीच्या वेळी खाजणात जमा झालेल्या ठिकाणी जनित्राचा वापर करुन विद्युत निर्मिती केली जाते. या ऊर्जेला भरती-ओहोटी ऊर्जा असे म्हणतात. 


भरती-ओहोटीची ऊर्जा ही पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षण आणि समुद्रात येणाऱ्या भरती-ओहोटीमुळे निर्माण होत असते. भरती-ओहोटीचा अंदाज अनेक महिने किंवा वर्षांआधीच लावता येत असल्याने ही ऊर्जा अचूक वेळी निर्माण करता येऊ शकते. 

भरती वेळी जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा भरतीची ऊर्जा धरणांमधून खाडीच्या दिशेने वाहू लागते. धरणातून पाणी जात असताना, वाहिन्यांशी जोडलेले टर्बाइन फिरू लागते आणि जनित्राद्वारे भरतीच्या ऊर्जेचे रूपांतर विजेमध्ये होते. ओहोटीच्या वेळी समुद्राची पातळी घसरते आणि ती खाडीमध्ये साठलेल्या पाण्याच्या पातळीपेक्षा खाली जाते. या स्थितीत टर्बाइनच्या ब्लेडची दिशा उलटी होते आणि उंचीच्या फरकामुळे पाणी समुद्राकडे वाहू लागते आणि पुन्हा जनित्राद्वारे ओहोटीच्या ऊर्जेचे रूपांतर विजेमध्ये केले जाते.

भूऔष्णिक ऊर्जा

पृथ्वीच्या कवचात निसर्गत: आढळणारी उष्णता म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. ही ऊर्जा भू-कवचाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागांमध्ये उपलब्ध असते. भू-पृष्ठभागाखाली खोलवर शिलारस वितळलेल्या अवस्थेत असतो. या शिलारसामुळे पृष्ठभागाखाली काही किमी. अंतरावरील खडक आणि भूजलसमृद्ध सच्छिद्र खडकांचे थर तापतात. या भूस्तराला भूऔष्णिक ऊर्जास्रोत असे म्हणतात.

पावसाचे पाणी भूकवचातील जलधरांमध्ये झिरपले की भूऔष्णिक संयंत्राद्वारे वापरल्या गेलेल्या प्रवाही पदार्थाचे पुनर्भरण होते. भूऔष्णिक ऊर्जास्रोत हा नूतनीक्षम ऊर्जास्रोत आहे. भूऔष्णिक प्रवाही पदार्थ भूऔष्णिक विहिरीद्वारे जमिनीवर आणतात. काही ठिकाणी उष्ण पाण्याचे नैसर्गिक झरे असतात. अशा झऱ्यातील उष्ण पाणी पंपाने बाहेर काढून त्या उष्णतेचा थेट वापर भूऔष्णिक ऊर्जा म्हणून केला जातो.


स्त्रिग्धरा नाईक