सुखाची वाटचाल

“या सुखांनो या, एकटी पथ चालले, दोघांस आता साथ द्या, या सुखांनो या.” या गाण्याच्या ओळीप्रमाणे प्रत्येकाच्या मनात, जीवनाच्या वाटचालीत ती अधिकाधिक सुखकारक आणि आनंदी कशी होईल याचाच विचार असतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न असतो.

Story: मनातलं |
15th March, 10:56 pm
सुखाची वाटचाल

खरंच आयुष्य म्हणजे एक चिरंतन प्रवास असतो आणि आपण सारे त्या प्रवासाला निघालेले प्रवासी. असा जन्मोजन्मीचा प्रवास करताना आपण धडपडतो, कधी सपशेल तोंडावर आपटतो. कधी उंच भरारी घेतो, कधी मऊ मखमली हिरवळीवरून चालतो, तर कधी कुणाच्या नशिबी रेड कारपेट अंथरलेला असतो. नव्याने कितीतरी गोष्टी शिकत आणि चुकतमाकत प्रवासातले अनुभव गाठीशी बांधत असतो. असे अनुभव प्रत्येक वेळी एक नवे गुज सांगून जातात. जसा काळ बदलतो, तसे अनुभवही बदलत जातात आणि आपल्याला अनुभव संपन्न बनवतात. आपलं नशीब आपला मार्ग ठरवतं असं म्हणतात पण त्या मार्गावरून जाताना रस्त्यात कधी खाच-खळगे, कधी मोठे खड्डे, कधी काटे, तर कधी फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या असतात. फुलांवरून वाटचाल करताना आपण सुखावतो. यापुढचा मार्गही असाच सुखदायक असावा त्यात कसल्याच अडिअडचणींचा अडथळा येऊ नये असं वाटतं. 

कधी कधी सुख म्हणजे असतं तरी काय? याचं मनाला कोडं पडतं. प्रत्येकाला सुखाची कल्पना काय? असं विचारलं तर प्रत्येकाचं वेगळं उत्तर असतं. सुख ही संकल्पना इतकी सहज मांडता येत नाही. सर्वसामान्य माणूस हा भौतिक सुखात सुख शोधायचा प्रयत्न करत असतो. त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू ठेवतो. प्रत्येकाची अपेक्षा असते चांगल्या भरभक्कम पगाराची नोकरी असावी, गाडी, बंगला असावा, बायको मुलांना छान राहता येईल, त्यांना सुखात ठेवण्यासाठी हे गरजेचे असते. पण प्रत्येकाची तशीच मनोकामना असते असे नाही. कारण कुणाला कशात तर कुणाला कशात आनंद मिळत असतो ती कारणे वेगवेगळी असतात. त्या गोष्टी भिन्न असू शकतात. कुणाला काही देण्यात आनंद वाटतो, कुणाला दुसऱ्याला मदत करण्यात आनंद वाटत असतो, कुणाला समोरचा आनंदी असला की आनंद होत असतो. कुणाला निसर्गाच्या कुशीत बागडण्यात आनंद मिळत असतो. कुणाला तो आनंद घरातच सापडतो. सुखाने जगणं ही काही फारशी अवघड गोष्ट नाही पण सुख हे मानण्यावर असतं. सर्व सुखे पायाशी लोळत असतानाही काही माणसे दुर्मुखलेला चेहरा करून बसलेली असतात, जणू त्यांचा आनंद कुठेतरी हरवलाय. 

सुख आणि आनंद यांच्यातली सीमारेषा अगदी पुसट असते. आनंद ही मानसिक अनुभूति ती सर्वांच्या ठायी असते. आनंद माणसाच्या मनातच दडून बसलेला असतो. त्याचा शोध घेत तो इतस्त: फिरत असतो. आनंद मिळतानाच तो उपभोगायचा असतो. छोटी मुले छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंदित होतात तसं मोठ्या माणसांचं होत नाही. तसं पाहिलं तर शंभर टक्के कुणीच सुखी नसतो. काहीतरी कमतरता, उणीव मनाला भासत असते. पण छोट्या मुलांसारखी लहान लहान गोष्टीत आनंद शोधायची एकदा सवय लागली की कुठल्याही गोष्टीत आनंद दिसून येतो. कुठे दूर जावं लागत नाही. सुखाची वाटचाल या आनंदाच्या लहरींवर स्वार होत असते. सुख जरी बाह्य गोष्टींवर अवलंबून असलं तरी आनंद मात्र अंतरातल्या वृत्तीत असतो. बाहेरच्या भौतिक सुखाच्या गोष्टीत रममाण झालेला माणूस पूर्णपणे सुखी किंवा आनंदी असेलच असे नाही. पण तरीही माणूस आपले जीवन सुखी करण्यासाठी अशा गोष्टींच्या मागे पळत असतो. त्या त्याच्या वाटचालीत तो आनंदित असतो असं नाही.

आपण इंद्रिय सुखातच आनंद शोधतो पण इच्छा आणि मनाची संतुष्टी किंवा आनंदी अंतरंग यातला फरक कळत नाही. एखादी गोष्ट मिळाली नाही की मन दु:खी होते आनंद लयाला जातो पण त्यावेळी “जाऊ दे! जे होते ते चांगल्या साठीच होते नाही मिळाले हे बरे झाले” असे जेव्हा वाटते तेव्हा मनातला आनंद कायम राहतो. म्हणजे स्वत:ला जेव्हा समाधानी वृत्तीने पहायला लागतो तेव्हा माणूस आनंदाच्या गावा जातो. जो आनंद त्याच्या आजूबाजूलाच विखुरलेला असतो त्याची जाणीव होते जशी हवा आपल्या सर्व सभोवताली असते पण जाणवत नाही तसा आनंद आपल्या जवळच असतो पण त्याची जाणीव होत नाही. एखादी वाऱ्याची झुळूक आली की हवेची जाणीव होते तसं एखादी घटना घडली की त्यातून तुम्हाला आनंदाची जाणीव प्रकर्षाने होते. सुख हे आपल्याला जाणवते पण आनंद तुमच्या चेहऱ्यावर विलसत असतो. सुख विकत घेता येतं पण आनंद हा उपभोगायचा असतो. सुख शारीरिक जाणीवतून तर आनंद हा मानसिक जाणिवेतून  मिळतो. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे जेव्हा मनाला प्रसन्नता किंवा आनंद होत असतो तेव्हा सर्व गोष्टी आपोआप सकारात्मक म्हणजे सुखाच्या घडू लागतात. सुखाच्या पायघड्या अंथरल्या जातात. 

जीवन हा क्षणाक्षणांनी भरलेला एक दीर्घ प्रवास आहे. तो जर समाधानी वृत्तीने चालू ठेवला तर आनंद आणि सुख यांचा मिलाफ होताना दिसतो. पण असं जगण्याची किमया फक्त साधूसंतांना जमते सर्व साधारण माणसाला ते जमतेच असे नाही.  आपली जगण्याची वाटचाल सुखमय होण्यासाठी मनाचा आनंद टिकवून ठेवणं हीच त्याची गुरुकिल्ली आहे.  वाट आहे खड्डे, खाचखळगे असणारच कधी एखादा बाका प्रसंगही येऊ शकतो हे मनाला ठामपणे पटवून देत तरीही तू चाल पुढं म्हणत आनंदाने आगेकूच करायची असते. तिथे मग नकारात्मक विचारांना  जागा नसते जे होते ते सर्व शुभ आणि आनंददायक असते. सुखाची वाटचाल आणखीनच आनंदी होते. 


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.