प्रत्येक स्त्रीला सुंदर बनवण्याचा मंत्र देणार्‍या पल्लवी नाईक

ब्युटीशियन पल्लवी नाईक या त्यांच्यापाशी येणार्‍या प्रत्येक स्त्रीचे अथवा मुलीचे अभिजात सौंदर्य खुलवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांच्याकडे सौंदर्य प्रसाधनेसाठी आलेली प्रत्येक स्त्री तेथून निघताना जेव्हा आरशात पाहते, तेव्हा आपले बदललेले रूप पाहून त्यांच्यातील आत्मविश्वास नक्कीच जागृत होतो.

Story: तू चाल पुढं |
08th March, 10:09 pm
प्रत्येक स्त्रीला सुंदर बनवण्याचा मंत्र देणार्‍या पल्लवी नाईक

हेल्प ग्रुपमधील स्त्रिया किंवा गटाच्या माध्यमातून येणार्‍या  इतर स्त्रिया, मुली यांना जनशिक्षण संस्थेद्वारे सौंदर्य प्रसाधनाचे शिक्षण देण्याचे काम शांतीनगर, मांडोप येथील पल्लवी नाईक या गेली १५ वर्षे करत आहेत. या संस्थेद्वारे इच्छुक स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनाचे शिक्षण देण्याचे कार्य करताना त्यांनी अनेक स्त्रियांना ‘सुंदर मी होणार!’ हा मंत्रच दिला आहे.

जनशिक्षण संस्थेद्वारे गटामार्फत येणार्‍या इच्छुक स्त्रियांना पल्लवी सौंदर्य प्रसाधनाचे शास्त्रोक्त शिक्षण देतात. या संस्थेद्वारे अतिशय माफक खर्चात हे शिक्षण दिले जाते आणि संस्थेतर्फे यासाठी लागणारे सर्व सामानही पुरविले जाते.

बी.ए. झाल्यावर पल्लवीचे लग्न झाले. लग्न होण्याच्या आधी त्यांनी सौंदर्य प्रसाधनाचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांनी लग्न झाल्यावर हेच काम पुढे सुरू करण्याचे ठरवले. भाड्याचे दुकान जरी घेतले तरी त्याला दहा ते पंधरा हजार रुपये देणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा सुरुवातीला त्यांनी घराघरात जाऊनही सेवा देण्यास सुरुवात केली. पार्लरमध्ये जाऊन तासन् तास प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा अनेक स्त्रिया पल्लवी यांना घरी बोलावून त्यांच्याकडून आवश्यक त्या सुविधा प्राप्त करून घेत असत. यात वेळेची बचत होत असल्याने आणि पल्लवीचे काम अतिशय चांगल्या प्रकारे होत असलाने त्यांच्यावरचा विश्वास वाढला आणि हळूहळू पार्लरमध्ये येणार्‍यांच्या संख्येतही वाढ होत राहिली.

पुढे जनशिक्षण संस्थेत सौंदर्य प्रसाधन शिक्षिका म्हणून रुजू झाल्यावरही त्यांनी आपले हे काम सोडले नाही. कारण सुरुवातीच्या काळात यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी बरेचसे कष्ट घेतले होते आणि त्यांच्या चांगल्या सेवेसाठी त्यांचे अनेक ग्राहकही सौंदर्य सेवेसाठी पल्लवी यांनाच प्राधान्य देत होते. त्यामुळे त्यांनी आपले हे काम सुरूच ठेवले.

सुरुवातीला जास्त ओळखी नसल्याने त्यांना ग्राहक मिळणे दुरापास्त होत असे. परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांनी १५० रूपयासाठी ही पहाटे पाचला उठून सेवा दिली आहे. पण हळूहळू जसजसा यात त्यांचा जम बसत गेला, तसतशे त्यांच्याकडे येणार्‍या स्त्रियांची संख्या वाढू लागली. पुढे जनशिक्षण संस्थेत सौंदर्य प्रसाधक शिक्षिका म्हणून रुजू झाल्यावर त्यांचा संपूर्ण वेळ यातच जाऊ लागला. यासाठी त्यांना त्यांच्या पतीचेही उत्तम सहकार्य मिळत आहे.

जनशिक्षण संस्थेद्वारे काम करताना त्यांची अनेक स्त्रियांशी ओळख झाली. त्यात त्यांना दिसून आले की शिक्षण घेतलेल्या स्त्रियाही केवळ चूल आणि मूल सांभाळताना आपल्या घरसंसारात आपले सर्वस्व देऊन बसल्या आहेत. घरातली कामे कितीही केली तरी त्याला किंमत नसते पण जर तुम्ही स्वत: घराबाहेर पडून आपल्या श्रमाने दहा रुपये जरी कमावले, तरी त्याला खूप मोठी किंमत असते हे त्यांनी अनेक स्त्रियांना पटवून दिले आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जागा केला.

दिवसभर घरकामात गुंतून राहिल्याने स्त्रिया आपल्या सौंदर्‍याकडे लक्ष न देता अव्यवस्थित राहतात. पण जेव्हा त्यांच्यातील सौंदर्य पल्लवी खुलवतात, तेव्हा आपलाच बदललेला चेहरा पाहून त्या स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक आत्मविश्वासाची छटा दिसते आणि हाच आत्मविश्वास जर त्यांच्यात जागावून ठेवला, तर त्या स्त्रिया आपल्या कलागुणांचा योग्य तो वापर करायला शिकून आपल्या पायावर उभ्या राहायला शिकतात ही मेख पल्लवी यांनी जाणून घेतली आणि मग त्यांनी त्यांच्यापाशी येणार्‍या प्रत्येक स्त्रीला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आज अनेक स्त्रियांना त्यांनी सौंदर्य प्रसाधनाचे शिक्षण देताना त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यास शिकवले आहे.आयूष्य हे खूप कमी आहे पण सुंदर आहे. त्यामुळे आपल्याकडे जे नाही, त्याची खंत करण्यापेक्षा आपल्यापाशी जे आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून स्वत:च्या पायावर उभ्या राहाला शिका हा मंत्रच पल्लवी आपल्यापाशी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला देता असताना 'तू चाल पुढं!' हेच सांगत आहेत.


कविता प्रणीत आमोणकर