महिलांनो, घट्ट कपडे घालण्यापासून सावधान !

“पोट दिसतंय ना माझं ह्या ड्रेसमध्ये... अन् नेमका आजच तो टमी कोरसेट नाही सापडत आहे.” वेदा आईला सांगत होती आणि त्यावर आईचं नेहमीचंच व्याख्यान. “अगं रोज रोज ते घट्ट तंग घालू नये गं. श्वास कसा नाही घुसमटत तुझा त्यामध्ये?”

Story: आरोग्य |
08th March, 10:05 pm
महिलांनो, घट्ट कपडे घालण्यापासून सावधान !

हल्लीच्या तरूणींना सुंदर दिसणे नी फॅशनेबल राहणे आवडते. टाईट जीन्स, टाईट फीटींगचे कपडे घालून स्लीमट्रीम दिसणे तरूणी पसंद करतात. सैल-फिटिंग कपड्यांपेक्षा घट्ट कपड्यांना पसंती देतात. शेपवेअर किंवा कोरसेट घातल्याने कोणत्याही आकाराच्या महिला फिट आणि आत्मविश्वासू दिसतात म्हणून तरूण महिलांमध्ये यांचा वापर हल्ली सर्रासपणे केला जातो.

स्लिमिंग बॉडी सूटपासून ते शेपवेअर, टाईट जीन्स-ब्रा व टमी कंट्रोल पॅन्टी सारखे कपडे महिला आपल्या शरीराला परिपूर्ण आकार देण्यासाठी, प्रेझेंटेबल दिसण्यासाठी वापरतात. पण अनेक महिलांना हे माहीत नसते की रोज शेपवेअर घातल्याने आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. 

कपडे घट्ट असल्याचे कसे समजावे?

एखाद्या व्यक्तीस घट्ट वाटणारे कपडे, दुसर्‍या व्यक्तीस आरामदायक वाटू शकतात. यामुळे कपडे गरजेपेक्षा जास्त घट्ट असल्याचे कसे समजावे हे कठीण जाते. कपड्यामुळे अस्वस्थता वाटणे, त्वचेवर लालसर डाग येणे, जळजळ होणे, श्वास घेण्यात अडचण वाटणे, घट्ट असणाऱ्या भागात सुन्नपणा किंवा मुंग्या येणे, शारीरिक हालचाली करता न येणे यासारखी लक्षणे दिसून येऊ शकतात. 

संसर्ग होण्याचा धोका

शेपवेअरचा व घट्ट कपड्यांचा अतिवापर केल्याने यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनपासून यीस्ट इंफेक्शनचा संसर्ग होण्याची संभावना कितीतरी पटींनी वाढते. 

योनी भागातील संसर्ग: दररोजच्या वापराने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन) धोका वाढू शकतो. घट्ट कपड्यांमुळे, पोटावर दाब आल्याने मूत्रमार्गाच्या कार्यावर दबाव येऊ शकतो. यामुळे मूत्रमार्गात जंतूची वाढ होऊन संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. शेपवेअर घातल्याने अस्वस्थता जाणवू शकते.

यीस्ट संसर्ग: घट्ट कपडे घातल्याने काखेत, योनी भागात तसेच सांधे दुमडलेल्या जाग्यांवर घाम येऊन अस्वस्थता आणि उष्णता निर्माण होऊ शकते. यामुळे त्या जाग्यांवर यीस्ट संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. खाज, लालसरपणा व जळजळ होऊ शकते. 

त्वचा संसर्ग: घट्ट कपड्यांमुळे त्वचेत संसर्ग होऊ शकतो. यामुळे त्वचेवर जळजळ, ओरखडे येणे आणि संसर्ग होऊ शकतो. शेपवेअर घातल्यामुळे त्या भागात लालसरपणा व सूज येऊ शकते. एक्जिमा, सोरायसिस वाढू शकतो. घट्ट कपडे परिधान केल्याने पायांवरील केसांच्या कूपांना संसर्ग होऊ शकतो व लेगिंग्ज किंवा घट्ट पँट घातल्यामुळे त्वचेवरील दाह वाढतो. 

स्नायूदुखी :

घट्ट कपडे, जीन्स किंवा शेपवेअर यांचा रोज वापर केल्याने ओटीपोट आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. यामुळे अस्वस्थता निर्माण होते व कलांतराने पाठदुखी होऊ शकते. घट्ट कपड्यांमुळे मेरॅल्जिया पॅरेस्थेटिका नावाचा स्पाइनल नर्व्ह कॉम्प्रेशन होऊ शकतो. सटयामुळे मांडीच्या बाजूला सुन्नपणा, मुंग्या येणे आणि वेदना होऊ शकतात.

पचनसंस्थेवर परिणाम :

घट्ट कपड्यांमुळे पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. सततचा बद्धकोष्ठता, गॅस होणे, अपचन होणे, पोट फुगणे, पोटात दुखणे यासारख्या समस्या होण्याची शक्यता असते. जास्त वेळ घट्ट कपडे घातल्याने पोट, आतडे व त्याभागातले स्नायू कमकुवत होतात व आकुंचन पावतात. इरिटेबल बोवेल सिंड्रोम, क्रोहन डिसीज, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स सिंड्रोम यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते. वारंवार ऍसिड रिफ्लक्समुळे अन्ननलिका दाह सारखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

रक्ताभिसरण व श्वसनप्रक्रियेत अडथळा :

घट्ट कपड्यांमुळे शरीरात ऑक्सिजनचे सेवन कमी होते. तसेच मानेभोवती खूप घट्ट असलेले शर्ट आणि टाय मेंदूतील रक्ताभिसरण कमी करू शकतात, ज्यामुळे डोकेदुखी, अस्पष्टता आणि अंधुक दृष्टी होते.

घट्ट कपड्यांसोबत घट्ट ब्रा घालणेही शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. घट्ट ब्राच्या वापराने त्वचेवर चाफिंग, जळजळ होऊ शकते. तसेच मान, खांदा यावर ताण आल्याने तिथे व छातीत दुखू शकते.

घट्ट कपडे घातल्याने होऊ शकणार्‍या आरोग्य समस्या टाळण्यासाठी तंग नसलेले, आरामदायक सैल-फिटिंगचे कपडे वापरात आणण्याचा प्रयत्न करावा.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर