भाजप-काँग्रेसकडून व्याहींना उमेदवारी ! निकम - खलप निवडणुकीच्या मैदानात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 12:15 am
भाजप-काँग्रेसकडून व्याहींना उमेदवारी ! निकम - खलप निवडणुकीच्या मैदानात

पणजी : दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवणाऱ्या प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे उत्तर गोव्याचे काँग्रेस उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांचे व्याही आहेत. 

भाजप-काँग्रेस या प्रमुख पक्षांनी यावेळी महाराष्ट्र, गोव्यात व्याहींना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईतील १९९३ चा बॉम्बस्फोट आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यांमुळे उज्ज्वल निकम देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. देशातील अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी केलेली आहे. याचीच दखल घेत भाजपने त्यांना मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. 

उज्ज्वल निकम यांचे गोव्याशी जवळचे संबंध आहेत. काँग्रेस उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांच्या मोठ्या भावाचा मुलगा महेश खलप यांचे निकम सासरे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यात हे दोन व्याही काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

दरम्यान, उज्ज्वल निकम हे माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचे मेहुणेही आहेत. शांताराम नाईक यांच्या पत्नी तथा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बिना नाईक यांचे ते बंंधू आहेत.

हेही वाचा