म्हापशातील रस्ते आठ दिवसांत पूर्ववत : वीजमंत्री

स्थानिक स्वराज्य संस्था चलो अभियानमार्फत पालिकेला भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th February, 12:14 am
म्हापशातील रस्ते आठ दिवसांत पूर्ववत : वीजमंत्री

म्हापसा पालिकेत स्थानिक स्वराज्य संस्था चलो अभियमान मध्ये लोकांची गाऱ्हाणी ऐकताना वीज मंत्री सुदिन ढवळीकर. सोबत उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर व इतर.

म्हापसा : विकसित भारत अंतर्गत राज्यातील मंत्र्यांचे स्थानिक स्वराज्य संस्था चलो अभियान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी म्हापसा पालिकेला भेट दिली. शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामामुळे रस्ते वेळेत पूर्ववत होत नाहीत, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. या कामामुळे बाजारपेठेतील स्थिती दयनीय झाल्याची कैफियत यावेळी सर्वच नगरसेवकांनी मांडली.
याप्रसंगी उपसभापती जोशुआ डिसोझा, हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, इतर नगरसेवक तसेच विविध सरकारी अधिकारी उपस्थित होते. वीजमंत्री ढवळीकर यांनी येत्या आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण होऊन खोदलेले रस्ते पूर्ववत केले जातील. तसेच नागरिकांसह नगरसेवकांची गाऱ्हाणी ऐकून घेत संबंधित विषय सोडविण्याचे आश्वासनही दिले. शिवाय शासकीय खात्याने आंतरसंवाद राखण्यासाठी बारचार्टचा वापर करावा. जेणेकरून विकासकामावेळी सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी करता येईल, असा सल्ला ढवळीकर यांनी अधिकारी वर्गाला दिला.
नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकरांनी म्हापसा मार्केटमधील भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे निर्माण झालेल्या स्थितीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. मार्केटमधील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. सध्या सर्व्हिस कनेक्शनचे काम बाकी असून हे रस्ते पालिका अंतर्गत येतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या खाेदकामावेळी कंत्राटदार हे बेजबाबदारपणे कामे करतात. परिणामी रस्त्यालगत असलेली गटारे कोसळतात. यास प्रशासकीय मंजुरी मिळविण्यास वर्षे लागतात, अशी तक्रार नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी केली. यापुढे ही कामे करताना अभियंत्यांनी जातीने लक्ष ठेवावे, अशी सूचना ढवळीकर यांनी अधिकाऱ्यांना केली.
म्हापसा शहरातील एका मोठ्या आस्थापनांकडून अतिक्रमण करून किराणा व्यवसाय केला जातो, अशी तक्रार एका महिलेने मंत्र्यांकडे केली. याविषयी पालिका तसेच स्थानिक आमदार दखल घेत नाही, असा आरोप त्यांनी केला. आपण यात लक्ष घालतो, असे मंत्र्यांनी त्यांना सांगितले.
प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य नाही
नगरसेवक डॉ. तारक आरोलकर म्हणाले, आपल्या प्रभागात गेल्या वर्षी विहीर खचून कोसळली होती. या विहिरीच्या पाण्यावर अनेक घरे अवलंबून आहेत. पण, अद्याप प्रशासकीय पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळत नाही. गेल्या अडीच वर्षात आपल्या प्रभागात विकासकामांसंदर्भात २९ ठराव घेतले. पण, एकही काम होत नाही. मंत्र्यांनी ही कामे तडीस लावली जातील, अशी ग्वाही दिली. तसेच विहिरीचा विषय मार्गी लावावा आणि पंप बसवून व पाणी फिल्टर करून नागरिकांना द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

नगरसेवक सुधीर कांदोळकर, साईनाथ राऊळ, शुभांगी वायंगणकर, प्रिया मिशाळ, सुशांत हरमलकर, केयल ब्रागांझा यांनी जुने वीज खांब तसेच रस्त्यांबाबत प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केले. आठवडाभरात अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन हे प्रश्न सोडवू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. तसेच पालिका पालिकेमध्ये स्वयंपूर्ण मित्र म्हणून कुणाची नियुक्ती केली गेली आहे, याची माहिती पालिका मंडळालाच नसल्याचे नगरसेविका वायंगणकर यांनी सांगितले.                   

हेही वाचा