हैदराबादचा घरच्या मैदानावर पराभव; पंजाब ठरले वरचढ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th February, 12:34 am
हैदराबादचा घरच्या मैदानावर पराभव; पंजाब ठरले वरचढ

हैदराबाद : पंजाब एफसीने इंडियन सुपर लीग २०२३-२४ (आयएसएल) मध्ये पुन्हा एक दमदार विजय नोंदवला. हैदराबाद एफसीचे पराभवाचे सत्र घरच्या मैदानावरही कायम राहिले आणि मंगळवारी झालेल्या लढतीत त्यांच्यावर पंजाब एफसी वरचढ ठरले. ल्युका माचेन व मदीह तलाल यांनी प्रत्येकी एक गोल करून पंजाब एफसीला २-० असा विजय मिळवून दिला. पंजाब एफसीने (१७) या विजयासह तालिकेत १ स्थान वर सरकून दहावा क्रमांक पटकावला. १७ सामन्यानंतरही हैदराबाद एफसीच्या विजयाची पाटी कोरी राहिली. मदीह तलाल या सामन्यातील प्लेअर ऑफ दी मॅच ठरला.
हैदराबाद प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे त्यांना निडर राहून पंजाबचा सामना करायचा होता. तिसऱ्या मिनिटाला रामहलुंछुंगाने पहिला ऑन टार्गेट प्रयत्न करून हैदराबादला सकारात्कम सुरुवात करून दिली. पुढच्याच मिनिटाला जाओ व्हिक्टरचा गोल थोडक्यात हुकला. ६व्या मिनिटाला पंजाबच्या रिकी शाबोंगने हैदराबादच्या बचावपटूंना चकवून मदीह तलालसाठी ६ यार्ड बॉक्समध्ये चांगली संधी निर्माण करून दिली होती. पण, तलालने भिरकावलेला चेंडू अगदीच संथ गतीचा होता आणि तो रोखण्यात यजमानांच्या गोरलक्षकाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. पंजाबने गमावलेली ही सर्वात सोपी संधी होती. १४व्या मिनिटाला ल्युका माचेनचा आणखी एक गोल हैदराबादच्या बचावपटूने अप्रतिम ब्लॉक करून अडवला.
विलमार जॉर्डन, तलाल, शाबोंग व ल्युका माचेन यांनी हैदराबादच्या बचावफळीवर दडपण निर्माण केले होते. २३व्या मिनिटाला साहील तावोराने क्रॉसवर थेट गोलसाठी केलेला प्रयत्न पाहून हैदराबादचा गोलरक्षक कट्टीमणीही आश्चर्यचकीत झाला. पण, वेळीच त्याने गोल रोखला. २९व्या मिनिटाला माचेनचा हेडर दिशाहिन राहिला. पण, हैदराबादच्या युवा बचावपटूंचे कौतुक करायला हवे. मागील सामन्यात ४ गोल स्वीकारल्यामुळे पंजाब एफसीची बचावफळी या लढतीत जरा जास्तच अलर्ट दिसले. हैदराबादने पहिल्या हाफच्या अखेरच्या १० मिनिटात आक्रमण करून पंजाबच्या बचावफळीला दडपणात ठेवले. ४३व्या मिनिटाला झोथानपुईयाने भिरकावलेला चेंडू बाहेरून गोलजाळीवर आदळला. ४५व्या मिनिटाला ल्युका माचेनने हेडरद्वारे ६ यार्ड बॉक्समधून गोल केला आणि पंजाब एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तलालने हा गोल सेट केला होता.
मध्यंतरानंतर पंजाबचे आक्रमण सुरूच राहिले, तलाल हा हैदराबादच्या बचावपटूंना संघर्ष करायला भाग पाडत होता. ५६व्या मिनिटाला तलालने अप्रतिम गोल करून हैदराबादच्या सर्व खेळाडूंना स्तब्ध केले. पुढच्याच मिनिटाला पंजाबला विलमार गिलने तिसरा गोल जवळपास मिळवून दिला होता, परंतु हैदराबादच्या बचावपटूने त्याला रोखले. २-० अशा आघाडीनंतर पंजाबने त्यांची बचावफळी मजबूत करताना काही बदल केले. ५८व्या मिनिटाला तलालकडून आणखी एक ऑन टार्गेट प्रयत्न झाला, परंतु यावेळी तो अडवला गेला. हैदराबादकडून सातत्याने गोलसाठी प्रयत्न होताना दिसले, ६९व्या मिनिटाला सजाद परायला थोडक्यात अपयश आले. हैदराबादला घाई करून चालणार नव्हती, योग्य रणनीती आखून त्यांना शेवटच्या १५ मिनिटांत खेळ करणे गरजेचा होता. ९०+१ मिनिटाला हैदराबादच्या राबीहने सुवर्णसंधी गमावली. गोलजाळीच्या अगदी समोरून त्याला फक्त चेंडूला दिशा द्यायची होती, परंतु घाई त्याला नडली.
........
निकाल - पंजाब एफसी २ (ल्युका माचेन ४५ मि. मदीह तलाल ५६ मि.) विजयी वि. हैदराबाद एफसी ०.