कारे लॉ कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज अजिंक्य

आंतर-महाविद्यालयीन क्रिकेट पुरुष चॅम्पियनशिप

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th February, 12:30 am
कारे लॉ कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज अजिंक्य

पणजी : गोवा विद्यापीठाची वार्षिक आंतर-महाविद्यालयीन क्रिकेट पुरुष चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी झालेल्या दोन सामन्यात गोविंद रामनाथ कारे कॉलेज ऑफ लॉ आणि सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा या संघांनी विजय मिळविला.
तळेगाव येथील गोवा विद्यापीठ क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात गोविंद रामनाथ करे कॉलेज ऑफ लॉने विकास परिषदेच्या मांद्रे कॉलेजचा ६ गडी राखून पराभव केला. विकास परिषदेच्या मांद्रे कॉलेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मांद्रे कॉलेजने २० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या. त्यांच्या अनिकेत उतेकरने ५३(३२), तर अथर्व चांदुरे ४४(२८)ने चांगली फलंदाजी केली. गोविंद रामनाथ कॉलेजचे गोलंदाज कुणाल नाईक २० धावांत २, तर बशीर उल्लाहने २१ धावात २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात गोविंद रामनाथ करे कॉलेज ऑफ लॉने १९.१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या. त्यांच्या वृषज तळावलीकर ८०(५३), तर कुणाल नाईक २८(२३)ने चांगली कामगिरी केली. सामन्यात मांद्रे कॉलेजच्या तेजस शेटगावकरने २४ धावांत २ गडी बाद केले. सर्वाधिक धावा करणारा फलंदाज वृषज तळावलीकर आणि अष्टपैलू कुणाल नाईक यांनी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली.

सेंट झेवियर्सची फार्मसी कॉलेजवर मात
या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसाने गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचा ८ गडी राखून पराभव केला. गोवा कॉलेज ऑफ फार्मसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १०५ धावा केल्या. संघातील हेरंब खानोलकरने सर्वाधिक १८‍ धावा केल्या. तर सेंट झेवियर्सच्या साईश परबने ३, तर हर्ष भगतने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळताना सेंट झेवियर्स, म्हापसाने १२.३ षटकांत २ बाद १०८ धावा केल्या. त्यांच्या लक्ष्मण शेट्ये (३४), तेजस नाईक (नाबाद २८) धावा केल्या. साहिल गावकर आणि दानिश मो. यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
फोटो : साईश परब