अळंबीपासून काढता येतात सोन्याचे सुक्ष्म कण!

डॉ. सुजाता दाबोळकर यांचे संशोधन : कॅन्सरप्रतिकारक औषधात होतो वापर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th February, 12:15 am
अळंबीपासून काढता येतात सोन्याचे सुक्ष्म कण!


संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. सुजाता दाबोळकर.

पणजी : वारूळावर निसर्गत: उगवणाऱ्या अळंब्यांपासून नैसर्गिक पद्धतीने गोल्ड नॅनो पार्टिकल्स (सोन्याचे सुक्ष्म कण) तयार करता येतात. हे कण कॅन्सरला प्रतिकार करणाऱ्या औषधासाठी वापरले जाऊ शकतात, असे संशोधन डॉ. सुजाता दाबोळकर यांनी गोवा विद्यापीठात केले आहे. यासंबंधी शोधनिबंध सादर केल्यानंतर डॉ. सुजाता दाबोळकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी संशोधनासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. नंदकुमार कामत, पर्यावरणमंत्री ॲलेक्स सिक्वेरा आणि जैवविविधता मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
राज्यात नैसर्गिक अळंबीच्या ३५ प्रजाती आहेत. यापैकी काही प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. अळंबी उखडून विकण्याची सध्याची पद्धत अशीच सुरू राहिल्यास भविष्यात अनेक प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे, असे डॉ. नंदकुमार कामत यांनी यावेळी सांगितले.
वारूळावर उगवलेल्या अळंबीवर (टर्मिटोमायसिन मशरूम) नैसर्गिक प्रक्रिया करून गोळे तयार केले जातात. एका अळंबीपासून अनेक गोळे बनवता येतात. त्यावर प्रक्रिया करून सोन्याचे नॅनो कण तयार केले जातात. एक लिटर गोळ्यांमधून १ ग्रॅम नॅनो कण तयार होतात. कमी खर्चात सोन्याचे नॅनो कण तयार करता येतात. एक ग्रॅम नॅनो पार्टिकल्स तयार करण्यासाठी सरासरी १०० रुपये खर्च येऊ शकतो, असे कामत म्हणाले.
सोन्याच्या सुक्ष्म कणांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे पार्टिकल्स सेन्सर्स, औषध वितरण आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरले जातात. कॅन्सरवरील उपचारांसाठी हे सोन्याचे नॅनोकण वापरले जातात. अळंबीच्या प्रजाती सुरक्षित करण्यासह कमी खर्चात सोन्याचे नॅनो कण तयार करणारे संशोधन स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन देणारे आहे. या संशोधनाचा उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने सोन्याचे नॅनो पार्टिकल्स स्टार्टअपसाठी खूप फायदेशीर ठरतील, असे डॉ. नंदकुमार कामत म्हणाले.      

हेही वाचा