ईस्ट बंगाल एफसीच्या विजयात नंदकुमार चमकला

चेन्नईयन एफसीला बसला धक्का

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th February, 12:17 am
ईस्ट बंगाल एफसीच्या विजयात नंदकुमार चमकला

कोलकाता : ईस्ट बंगाल एफसीने इंडियन सुपर लीग २०२३-२४ (आयएसएल) मध्ये सोमवारी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर चेन्नईयन एफसीवर १-० असा विजय मिळवला. ६५व्या मिनिटाला नंदकुमार सेकरने केलेला गोल ईस्ट बंगाल एफसीच्या विजयात महत्त्वाचा ठरला. चेन्नईयन एफसीकडून ४ ऑन टार्गेट प्रयत्न झाले, परंतु ईस्ट बंगालचा गोलरक्षक प्रभसुखन गिल याने तितकाच अविश्वसनीय बचाव केला.
ईस्ट बंगाल एफसी आणि चेन्नईयन एफसी हे दोन्ही संघ मागील सामन्यात पराभव पत्करून मैदानावर विजयाची लय पकडण्यासाठी उतरले. दुसऱ्याच मिनिटाला ईस्ट बंगाल एफसीला फ्री किक मिळाली आणि क्लीटन सिल्वाचा ऑन टार्गेट प्रयत्न थेट चेन्नईयनच्या गोलरक्षकाच्या हाती विसावला. आज दोन्ही संघ थोड्या सावधपणे खेळताना दिसले. पाचव्या मिनिटाला व्हिन्सी बारेट्टोचा गोल साठीचा प्रयत्न थोडक्यात हुकला, ईस्ट बंगालचा बचाव सुरेख राहिला. ८व्या मिनिटाला चेन्नईयनच्या फारुख चौधरीने गोलसाठी प्रयत्न केलेला, परंतु चेंडू गोलरक्षक प्रभसुखन गिलच्या हाती सहज विसावला. चेन्नईयन एफसी सातत्याने आक्रमक खेळ करत होते. ११व्या मिनिटाला जॉर्डन मरेचा प्रयत्न रोखला गेला. पण, पुढच्याच मिनिटाला ईस्ट बंगाल एफसीच्या फेलिसिओ फोर्ब्सला चांगली संधी मिळाली होती, परंतु १८ यार्डवरून त्याने घेतलेला प्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेला.
चेन्नईयन एफसीला सलग ३ फ्री किक्स मिळाल्या, परंतु त्यांना एकही गोल करता आला नाही. २२व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेला चेंडू प्रभसुखन गिलने अडवला, परंतु गोलरक्षकाच्या हातून तो निसटला आणि ६ यार्ड बॉक्समध्ये उपस्थित चेन्नईयनच्या खेळाडूंना गोलची सुवर्णसंधी मिळाली होती. नशीब मात्र ईस्ट बंगालच्या बाजूने होते आणि पाहुणे गोल करू शकले नाही. ३० मिनिटांच्या खेळात चेन्नईयनच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र होती. ३५व्या मिनिटाला क्लीटनने संधी गमवल्यानंतर चेन्नईयनकडून ४५ व्या मिनिटाला कोनोर शिल्ड्स, व ४५+१ मिनिटाला रहिम अलीने प्रयत्न केले. पण, पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीवर रहावे लागले. चेन्नईयनने या हाफमध्ये दोन ऑन टार्गेट प्रयत्न केले.
४६व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या नंदकुमार सेकरचा प्रयत्न ब्लॉक केला गेला. ईस्ट बंगालला ५०व्या मिनिटाला जॉर्डन मरेकडून प्रत्युत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ४ मिनिटानंतर मरेने गोल करण्याची संधी गमावली. ईस्ट बंगालकडून क्लीटन सातत्याने गोलसाठी प्रयत्न करताना दिसला. परंतु त्याच्या वाट्याला यश येत नव्हते. ६५व्या मिनिटाला ईस्ट बंगालचे गोलखाते उघडले. नंदकुमार सेकरने चेन्नईयनच्या बचावपटूंना चकवून भन्नाट गोल केला. चेंडू गोलजाळीत विसावण्यापूर्वी चेन्नईयनच्या खेळाडूच्या पायाला लागला आणि त्यामुळे त्याची दिशा बदलली आणि गोलरक्षक तो रोखू शकला नाही. या गोलनंतर यजमानांच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली आणि चेन्नईयनला बचाव भक्कम करावा लागला. त्यामुळे त्यांना आक्रमण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. चेन्नईयनकडून अखेरच्या मिनिटाला बरोबरीच्या गोलसाठी चांगले प्रयत्न झाले, परंतु त्यांच्या वाट्याला गोल आला नाही. ईस्ट बंगाल एफसीने १-० अशी आघाडी कायम राखून विजय पक्का केला.
......................
निकाल-
ईस्ट बंगाल एफसी १ (नंदकुमार सेकर ६५ मि.) विजयी वि. चेन्नईयन एफसी ०.