चोडण, सुरावली ग्रामसभेत ठराव
चोडण ग्रामसभेत ईव्हीएमविरोधी ठरावाला अनुमोदन देताना ग्रामस्थ.
पणजी/मडगाव : मतदानासाठी ईव्हीएम वापरण्यास विरोध होत असतानाच आता ग्रामसभेत ठराव मंजूर केले जात आहेत. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर बंद करावा, अशी मागणी करणारा ठराव चोडण आणि सुरावलीच्या ग्रामसभेत रविवारी मंजूर करण्यात आला.
ईव्हीएम मशीनमुळे मतदानात हस्तक्षेप होऊ शकतो. प्रत्येक मतदाराला त्याचे मत सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे चोडण येथील लोकांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्या ठरावाला समर्थन दिले. ज्योकिम फर्नांडिस यांनी हा ठराव मांडला होता.
सुरावलीच्या ग्रामसभेत रविवारी ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आगामी सर्व निवडणुका या ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याने मतदारांच्या मताच्या हक्कावर गदा न येण्यासाठी ईव्हीएम बंदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेत गावातील रेल्वे फाटक बंद करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. रेल्वेकडून अंडरपास तयार करण्यात आलेला आहे, पण तांत्रिक चुकांमुळे त्यात पाणी भरुन राहते. अंडरपासची समस्या सोडवण्यात यावी, त्यानंतरच रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
गावातील रेल्वे फाटकाचा प्रश्न नागरिकांकडून मांडण्यात आला. गावातील लोकांना चर्च, शाळा व पंचायतीत जाण्यासाठी सर्वांत नजीक असलेला रेल्वे फाटकाचा मार्ग अंडरपास आल्यानंतरही बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी काहींनी केली. तसेच काहींनी रेल्वे अंडरपास तयार करताना अनेक तांत्रिक चुका झालेल्या असल्याने त्या रस्त्यावर कायम पाणी असते. याचा त्रास सर्वांनाच होणार आहे. ही समस्या आधी सोडवण्यात यावी व त्यानंतर रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानुसार ठराव घेण्यात आला व रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार आहे.