करु साजरा हंगाम ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाचा

हिवाळा सुरू झाला की गोव्यासहीत कोकण प्रदेशातील किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीचे मादी समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात. हे कासव साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस अंडी घालतात. सप्टेंबरपासून सुरू होणारा हा हंगाम पुढे मार्च महिन्यापर्यंत सुरू राहतो. तथापि, एप्रिल ते मध्य मे महिन्या पर्यंतही गोव्यातील किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातलेली उदाहरणे आहेत.

Story: साद निसर्गाची |
24th February, 10:12 pm
करु साजरा हंगाम ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाचा

कासवांनी अंडी घातल्यानंतर साधारणपणे दोनेक महिन्यांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पिल्लांना लगेच समुद्रात सोडणे योग्य असते असे पर्यावरणप्रेमी सांगतात. त्याचे कारण असे की नवजात कासवांच्या पोटाकडील खालच्या भागात अंड्याच्या पिवळया बलकाची एक पिशवी असते. कासवाची नवजात पिल्ले स्वतःचे अन्न शोधण्यास सक्षम होईपर्यंत (सुमारे एक आठवडा) ही पिशवी त्यांना पोषण देते. किनाऱ्यावर सोडल्यानंतर समुद्राच्या पाण्यापर्यंत सरपटत जाण्यासाठी लागणारी शक्ती देखील त्यांना ही अन्न पिशवीच पुरवत असते. 

किनाऱ्यावर नवजात पिल्लांना खेकडे, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांपासून धोका असतो. समुद्रात पोहोचल्यानंतरही समुद्री पक्षी, मासे आणि इतर समुद्री भक्षकांपासून त्यांच्या जीवाला धोका संभवतो. समुद्री भक्षकांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवण्याचे कामही अन्न पिशवीच करते. नंतरही नवजात पिल्ले पाण्यात जाण्यासाठी चंद्रप्रकाशाची मदत घेऊन आपली दिशा ठरवतात. 

आतापर्यंत गोव्यातील मिरामार, आगोंदा, गालजीबाग, मोरजी, हरमल, केळशी, वागातोर, आश्वे, मांद्रे ह्या समुद्र किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातलेली आहेत. गोव्यात येणारे देशी विदेशी पर्यटक कासवांच्या नैसर्गिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या मनोरंजनासाठी पिल्लांना किनाऱ्यावर अडवून ठेवतात. त्यांना हातात उचलणे, सेलफोनचा फ्लॅश घालून त्यांचे फोटो काढणे, उलट-सुलट करुन त्यांच्यासोबत सेल्फी काढणे इत्यादी उपद्व्याप करतात. 

मोबाईलचा कृत्रिम फ्लॅश डोळ्यांवर पडल्यामुळे पिल्ले आपली नैसर्गिक दिशा भटकतात. तसेच, त्यांना हातात घेतल्याने ती दचकतात आणि घाबरून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करतात. ह्या प्रयत्नात त्यांची मौल्यवान ऊर्जा वाया जाते. परिणामी, नैसर्गिक प्रक्रियेत झालेल्या मानवी हस्तक्षेपाचे वाईट परिणाम बिचाऱ्या पिल्लांना भोगाव लागतो. 

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संरक्षण स्थितीवर लक्ष ठेवणारी सर्वोच्च संघटना) भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७९ (सुधारित १९९१) च्या अंतर्गत लाल यादीत, ही प्रजाती असुरक्षित असल्याचे सूचीबद्ध केलेले आहे.

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संरक्षणासाठी दरवर्षी वन खात्यातर्फे सॅटेलाईट टॅगिंग, रात्री समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालणे, किनारपट्टीवर कासव संरक्षित क्षेत्र सीमांकीत करणे, कासव संरक्षण क्षेत्र उभारणे, पिल्लांच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक तैनात करणे, ऑलिव्ह रिडले समुद्री कासव व कासव संवर्धन ह्यासारख्या महोत्सवाचे आयोजन करुन लोकजागृती निर्माण करणे इत्यादी पावले उचलली जातात. 

कासव म्हटले की आपल्याला सहज आठवते ती ससा आणि कासवाची गोष्ट. आठवतो तो संथगतीने चालून शर्यत जिंकणारा कासव अन् त्याच्या विरुद्ध जलदगतीने धावूनही शर्यत हरणारा ससा! धावण्यात पटाईत असूनदेखील बेजबाबदार, अतिआत्मविश्वास व दुसऱ्याला कमी लेखण्याच्या वृत्तीमुळे सशाला संथगतीने चालणाऱ्या कासवाकडून कशी हार पत्करावी लागली हे आपण सगळे जाणतोच. ससा आणि कासवाची गोष्ट जरी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी असली तरी खोल विचार केल्यास ही गोष्ट वस्तुस्थितीशी निगडित असल्याचे आपल्या लक्षात येईल. आजच्या समाजाने ससा आणि कासवाच्या गोष्टीकडून बोध घेण्याची  गरज आहे. 

आजचा मानव सतत निसर्गाच्या नियमांचे उलंघन करून विकास साधण्याच्या प्रयत्नात असलेला दिसून येतो. स्वतःच्या मनोरंजनासाठी मुक्या जनावरांशी मनाला येईल तसा वागत असतो. झाडांची कत्तल, जनावरांशी मानवाने चालवलेला सततचा संघर्ष तर सर्वश्रृत आहे. 

वनखाते किंबहुना पर्यावरणप्रेमी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांसारख्या कितीतरी असुरक्षित प्रजातींच्या संरक्षणासाठी लाखो पावले उचलत असतात. या प्रजातींना संरक्षित यादीत आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. पण दुर्दैवाने कुठे ना कुठे सामान्य माणूस आपली जबाबदारी ओळखायला विसरतो. निसर्ग संवर्धन व संरक्षण ही फक्त एका वनखात्याची किंवा पर्यावरणप्रेमींची जबाबदारी नसून आपणा सर्वांची जबाबदारी आहे. जोपर्यंत आपण आपली जबाबदारी ओळखत नाही, निसर्गाप्रती संवेदनशील होत नाही तोपर्यंत असुरक्षित प्रजातींना सुरक्षित यादीत आणणे कठीणच!


स्त्रिग्धरा नाईक