महान गीतकार आणि कवी गुलजार यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे ही अत्यानंदाची बाब आहे. गुलजारजींची कुठल्याही घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याची त्यांची दृष्टीच अगदी वेगळी आहे आणि म्हणूनच सामान्य माणसाला अगदी साधी वाटणारी गोष्ट देखील अतिशय तरलपणे, भावस्पर्शी होऊन त्यांच्या लेखणीतून उतरते. आपल्या भावनांशी आणि घेतलेल्या अनुभवांशी अतिशय प्रामाणिक राहणारा हा माणूस आहे. या प्रामाणिकपणामुळेच ते तरल अभिव्यक्तींना जन्म देऊ शकतात आणि म्हणूनच ते ‘गुलजार’ आहेत. माझ्या मते, मनस्वी संवेदनशीलतेचे अनुभव दुर्मिळ असतात. असे अनेक दुर्मिळ अनुभव गुलज़ारांनी दिले. ज्या माणसाच्या कवितेने, शब्दांनी आयुष्यातल्या लोखंडी क्षणांना परीसस्पर्श लाभला त्याच्या ॠणात राहणेच चांगले.
१९८८ सालची गोष्ट आहे. माझे स्नेही चित्रपट-दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. चित्रपटसृष्टीतल्या तार्यांची ये-जा चालू होती. आयुष्यात पहिल्यांदाच थिएटरचा पडदा सोडून सगळ्यांना पाहत होतो. नजरेत भांबावलेपण होतं. या चित्रतारकांच्या गर्दीत एका ठिकाणी शांतपणे गुलज़ार उभे होते. सगळेजण त्यांना नमस्कार करुन पुढे जात होते. त्या गर्दीला दूर सारून फक्त गुलज़ारांना भेटलो. ‘मेरे अपने’ हा त्यांचा मला त्या काळात आवडलेला चित्रपट. त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. धीर एकवटून त्यांना म्हणालो, ‘तुमच्याशी खूप बोलायचे आहे. तुम्हाला भेटायला घरी केव्हा येऊ?’ ते लगेच म्हणाले, ‘उद्या सकाळी आठ वाजता.’ त्यांनी घराचा पत्ता समजावून सांगितला. सकाळी आठ वाजता बांद्र्याला पाली हिलच्या बोस्कीयाना बंगल्यात गेलो. त्यांच्या धीरगंभीर आवाजाने भारावून जात होतो. ते बोलत होते. मी ऐकत होतो. दोन तास उलटून गेले. त्यांचा निरोप घेताना त्यांनी मला त्यांची चार पुस्तके भेट दिली.
पहिल्याच भेटीत मिळालेला त्यांचा दोन तासांचा सहावास आणि चार पुस्तके यामुळे झालेल्या आनंदात मश्गूल होतो. दुसरे काहीच सुचत नव्हते. एका ॠणानुबंधाच्या नात्याला सुरुवात झाली. यानंतर भेटीचे योग येत राहिले...
पुढे डिसेंबर २००० मध्ये नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता त्यांच्या घरी गेलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी म्हटले, ‘हे वर्ष संपले. पुढच्या वर्षी तू काय करणार आहेस?’
‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या संपादनाचे काम चालू आहे’ मी म्हणालो, ‘पाच-सहा महिने यात निघून जातील.’
ते म्हणाले, ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक तूच प्रकाशित कर. पुस्तक चांगले होईल.’
प्रकाशन क्षेत्र वेगळे आहे. मला त्यात पडायचे नव्हते. त्यांना माझे विचार सांगितले.
ते म्हणाले, ‘मला काही बाकीचे माहीत नाही. हे पुस्तक तूच प्रकाशित कर. तुला काही अडचण असल्यास मला सांग.’ गुलज़ारांच्या आग्रहाखातर मीच पुस्तक प्रकाशित केले. पहिली प्रत त्यांना दिली तेव्हा ते म्हणाले, ‘तू बघ आता. पुढे काय होते ते!
यानंतर या पुस्तकाच्या पंचविसाव्या आवृत्तीचे सेलिब्रेशन करत असताना ते मला म्हणाले, ‘तुला म्हणालो होतो ना ! तूच पुस्तक प्रकाशित कर.’ मग हसत हसत म्हणाले ‘कधी कधी आमचेही ऐकत जा.’
मनातल्या मनात पुटपुटलो, प्रतिभावान दिग्दर्शकानेे पहिला शॉट घेतला की, त्याला पुढचे सारे काही दिसू लागते आणि कवीला क्षितिजापल्याड दिसते. या दोन्ही गोष्टी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत ते गुलज़ार मला लाभले. बैठक संपता संपता पंचविसाव्या आवृत्तीवर त्यांनी लिहिले, ‘अरुण अब मै पास हो गया|’
यानंतर पुढच्या वर्षीची घटना. ‘ड्योढी’ कथासंग्रहाच्या प्रती नुकत्याच प्रकाशकाकडून आल्या होत्या. त्यातल्या एका प्रतीवर सही करून त्यांनी मला दिले आणि सांगितले, ‘हे पुस्तक तूच प्रकाशित कर. ‘ॠतुरंग’ प्रकाशनातर्फे पुस्तक प्रसिद्ध झालेले मला आवडेल.’
मी संकोचून गेलो. काहीच बोललो नाही. त्या निःशब्द शांततेचा भंग करीत ते म्हणाले, ‘या पुस्तकातून तुला नुकसान होणार असेल तर तू प्रकाशित करू नको.’
मी म्हणालो, ‘तसं नाही. तुमचं पुस्तक प्रकाशित करताना मनावर दडपण येतंय.’ ते म्हणाले, ‘प्रकाशित केल्यावर मला किती आनंद वाटेल याचा तू विचार केला आहेस का?’
त्यांच्या घरातून बाहेर पडलो. पुस्तकाच्या कामाला प्रारंभ केला. माझे आवडते लेखक अंबरीश मिश्र यांचा २४ डिसेंबर हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त ‘ड्योढी’ पुस्तक भेट पाठवले. पुस्तकाच्या अनुवादाचे चक्र माझ्या डोक्यात घोळत होते. अंबरीशजींना फोन केला. ते म्हणाले, ‘पुस्तक सुंदर आहे. अतिशय आवडले. एक वेगळे पुस्तक आहे. मला आता एक सांगा याचा अनुवाद कोण करणार आहे? तुम्ही काही ठरवले आहे का?’ मी लगेच म्हणालो, ‘तुम्ही अनुवाद केला तर मला आनंद वाटेल.’ अंबरीश म्हणाले, ‘मलाही आनंद वाटेल. दोघांच्याही आनंदाचे एकच सूत्र ‘ड्योढी’. त्यांच्यासारखा प्रतिभावन लेखक अनुवाद करणार आहे म्हटल्यावर माझी काळजीच मिटली. अनुवादाच्या निमित्ताने वारंवार भेटत गेलो. एक लेखक, माणूस म्हणूनही जवळून बघायला मिळाला.
नसरीन मुन्नी कबीर यांचे गुलज़ारांवरचे पुस्तक ९ डिसेंबरला प्रकाशित झाले. मला कार्यक्रमाला जाता आले नाही. नेहमीप्रमाणे सकाळीच आठ वाजता त्यांना भेटलो. अंबरीशजींचा अनुवाद त्यांना आवडला. अनुवादाविषयीच बोलत होतो. चहा पिता पिता ते म्हणाले, ‘अरूण, माझी एक सवय आहे. तू कुठल्याही गोष्टीला नाही नाही म्हणतोस. आता ‘नाही’ म्हणायचं नाही. कागद-पेन घे. मी ‘ड्योढी’ची अर्पणपत्रिका सांगतो. तू लिहून घे.
ते सांगत होते -
मेरी मराठी का
अ
अरुण शेवतेसे
शुरु होता है
यह किताब
उसी के लिये
ते ऐकून मी निःशब्द आकाशात हरवून गेलो. डोळे भरून आले. असा निर्मळ मनाने प्रेम करणारा माणूस आयुष्यात लाभणे याला भाग्य लागते. मला हे भाग्य गुलज़ारांनी दिले. मनस्वी संवेदनशीलतेचे अनुभव दुर्मिळ असतात. मला तर अनेक दुर्मिळ अनुभव गुलज़ारांनी दिले. ‘देवडी’ प्रकाशित करताना आनंद वाटतो. ज्या माणसाच्या कवितेने, शब्दांनी आयुष्यातल्या लोखंडी क्षणांना परीसस्पर्श लाभला. त्याच्या ॠणात राहणेच चांगले. असा ॠणानुबंध आयुष्यात यावा लागतो. माझ्या आयुष्यात तो मला लाभला.
गुलजारांकडे शब्द सामर्थ्याचे एवढे मोठे वरदान आहे की त्यांच्या मोजक्या शब्दातून ते प्रसंग आणि माणसे अचूकपणे उभी करतात. जीवनातील साध्या साध्या प्रतिमांचे दर्शन मोठ्या अनोख्या पद्धतीने गुलजारांच्या कथांमधून आणि कवितांमधून होते. कारण ते जीवनाला अतिशय साधेपणाने सामोरे जातात. त्यांच्या कविता इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात, कारण कवितेला आवश्यक असणार्या भावना, शब्द सौंदर्य त्यामध्ये असतेच पण त्याही पलिकडे असणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवितेचा स्पर्श त्यामध्ये असतो. या स्पर्शातून वाचणार्याला अनुभूती मिळते आणि ती खूप महत्त्वाची आहे. गुलजारांच्या लेखनाचे हेच मोठे सामर्थ्य आहे असे म्हणावे लागते.
इतर चार-चौघांप्रमाणेच मलाही चित्रपटांची आणि चित्रपट गीतांची आवड आहे. पण त्या क्षेत्रातला मी फार मोठा जाणकार किंवा पंडित नक्कीच नाही. पण तरीही गुलजारजी यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व एक माणूस म्हणून, मैत्री म्हणून माझ्या आयुष्यात आले, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. त्यांच्याकडून मला माणूस म्हणून किंवा त्यांच्या मैत्रीतून जे लाभले ते लाभणे हा दुर्मिळ योग आहे. मी स्वतःला फार नशिबवान समजतो की, त्यांचा सहवास, त्यांचे प्रेम मला लाभले.
एकदा एका खूप मोठ्या माणसाने मला गुलजारजींबाबत एक प्रश्न विचारला होता. ते मला म्हणाले होते की, तुम्ही ज्यावेळी गुलजारजींना भेटता तेव्हा ऊर्दूतून बोलता, इंग्रजीतून बोलता की मराठीतून बोलता? त्या माणसाला मी उत्तर दिले होते की, जो माणूस मुक्या आणि बहिर्या व्यक्तींवर ‘कोशीश’ सारखा सर्वस्पर्शी चित्रपट बनवतो त्या माणसाशी संवाद साधताना भाषा ही महत्त्वाची ठरतच नाही. मी त्यांच्याशी बोलतो ते माणूस म्हणूनच बोलतो आणि माणुसकीची तीच भाषा बोलतो. इतर कुठल्याही भाषेपेक्षा ती सर्वाधिक श्रेष्ठ असते.
गुलजार यांच्या कथांचे, चित्रपटांचे, कवितांचे फ्लॅशबॅक हे खास वैशिष्ट आहे. किंबहुना त्यांच्या जीवनाचेच हे वैशिष्ट्य आहे की, ते अनुभवलेले, पाहिलेले कधी विसरत नाहीत. विसरत नाहीत म्हणजे ते त्याला कवटाळून ठेवतात असे नाही, तर कुठल्याही घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याची त्यांची दृष्टीच अगदी वेगळी आहे आणि म्हणूनच सामान्य माणसाला अगदी साधी वाटणारी गोष्ट देखील अतिशय तरलपणे, भावस्पर्शी होऊन गुलजारांच्या लेखणीतून उतरते. आपल्या भावनांशी आणि घेतलेल्या अनुभवांशी अतिशय प्रामाणिक राहणारा हा माणूस आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, चित्रपट सृष्टीसारख्या झगझगीत क्षेत्रामध्ये राहूनही हा माणूस एवढा साधा का? याचे उत्तर अगदी सोपे आहे. जो माणूस आपल्या क्षणांशी प्रामाणिक राहतो तो नेहमी साधाच असतो. परंतु असे राहणे मोठे आवघड असते. गुलजारांना ते अगदी सहजपणे जमते आणि म्हणूनच प्रामाणिकपणा हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, यामुळेच ते तरल अभिव्यक्तींना जन्म देऊ शकतात आणि म्हणूनच ‘गुलजार’ आहेत. ‘ज्ञानपीठ’सारखा साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मनापासून आनंद होत आहे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनतर्फे गुलजार यांच्या कथांचे ‘देवडी’ या पहिल्या मराठी अनुवादित पुस्तकासह अन्य काही पुस्तके प्रकाशित झालेले आहेत.)
अरुण शेवते