पणजी : राज्यातील बहुतेक पोलीस स्थानकांत महिला उपनिरीक्षकांची कमतरता असल्याचे वृत्त ५ फेब्रुवारी रोजी ‘गोवन वार्ता’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होताच या वृत्ताची गंभीर दखल पोलीस खात्याने घेतली आहे. खात्याने लगेच ७ रोजी बदल्या आणि नियुक्त्यांचा आदेश जारी करत ही कमतरता भरून काढली आहे. या आदेशाद्वारे आवश्यक पोलीस स्थानकांत महिला उपनिरीक्षकांची नेमणूक करण्याबरोबरच १८९ पोलिसांच्याही बदल्या केल्या आहेत.
हेही वाचा
राज्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांची कमतरता
महिला किंवा बालकांशी संबंधित गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी कायद्यानुसार महिला उपनिरीक्षकाची आवश्यक असते. परंतु त्या उपलब्ध नसल्यामुळे काही वेळा पुरुष उपनिरीक्षकांना गुन्हा दाखल करावा लागत आहे. नंतर तो गुन्हा महिला उपनिरीक्षकाकडे वर्ग केला जातो किंवा दुसऱ्या स्थानकातील महिला उपनिरीक्षक आल्यानंतर तिला गुन्ह्याची प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास योग्य वेळेत होत नाही. परिणामी गुन्हेगार हाती लागत नाही. तसेच त्याला अटकपूर्व जामीन दाखल करण्यासाठी वेळ मिळतो. अशा परिस्थितीत काही वेळा जिल्हा अधीक्षक दुसऱ्या स्थानकातील महिला उपनिरीक्षकाच्या तत्काळ नियुक्तीचा आदेश जारी करतात. काही महिला उपनिरीक्षक इतर विभागांत सेवा बजावत असल्याचे समोर आले आहे. त्यांची योग्य ठिकाणी नियुक्ती करण्याची मागणी बिगर सरकारी संस्थेांनी वेळोवेळी केली होती.
दरम्यान, राज्यातील ३१ पैकी फक्त ११ पोलीस स्थानकांत महिला उपनिरीक्षक सेवा बजावत आहेत. इतर उपनिरीक्षक विविध विभागांत किंवा सुटीवर असल्यामुळे बहुतेक स्थानकांमध्ये महिला उपनिरीक्षकांची कमतरता आहे. यासाठी खात्याने योग्य व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, अशी बातमी गोवन वार्ताने ५ फेब्रुवारी रोजी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली होती. या बातमीची गंभीर दखल घेत पोलीस खात्याने लगेच ७ रोजी बदल्या आणि नियुक्तीचा आदेश जारी करत महिला उपनिरीक्षकांची कमतरता भरून काढली आहे.
इथे वाचा,.बदल्या व नियुक्तीचा आदेश...