रणजी क्रिकेट : रेल्वेविरुद्ध गोव्याला प्रथम विजयाची संधी

गोव्याला २१३ धावांची गरज : सुयशचे नाबाद अर्धशतक, दर्शनचे ४ बळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12th February, 12:24 am
रणजी क्रिकेट : रेल्वेविरुद्ध गोव्याला प्रथम विजयाची संधी

सूरत : गोव्याला यंदाच्या रणजी क्रिकेट हंगामातील आपला पहिला विजय नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. सूरतच्या लालभाय कॉँन्ट्रॅक्टर स्टेडियमवर सोमवारी शेवटच्या दिवशी गोव्याला विजयासाठी आणखी २१३ धावांची आवश्यकता असून त्यांच्या ९ विकेट्स शिल्लक आहेत. या सामन्याचा निकाल लागणार हे निश्चित असून गोव्याच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली तरच त्यांना विजय मिळू शकेल.
विजयासाठी ३०६ धावांचे आव्हान स्वीकारून तिसऱ्या सत्रात आपला दुसरा डाव सुरू केलेल्या गोव्याने तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा एका गड्याच्या मोबदल्यात ९३ धावा केल्या होत्या. गोव्यासाठी दुसऱ्या डावात सुयश प्रभुदेसाईने (नाबाद ५४ धावा, ८८ चेंडू ३x४) नाबाद अर्धशतक ठोकले. स्नेहल कवठणकर २३ धावांवर त्याला साथ देत होता. दरम्यान, गोव्याची धावसंख्या ३५ असताना अमोघ देसाई (१३) बाद झाला. त्यानंतर सुयश आणि स्नेहल या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागिदारी केली.
तत्पूर्वी, बिनबाद ३१ धावांवरून खेळण्यास सुरुवात केलेल्या रेल्वेचा दुसरा डाव २०८ धावांत संपुष्टात आला. सकाळच्या सत्रात गोव्यासाठी लक्षय गर्ग व हेरंब परबने चांगली गोलंदाजी करताना प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. एकवेळ रेल्वेची स्थिती प्रथम सिंग बाद झाल्यानंतर ५ बाद ८५ अशी होती. त्यानंतर आशुतोष रामनी (८१ धावा, ९३ चेंडू ८x४, ३x६)ने आकर्षक फटकेबाजी केल्याने रेल्वेला २०० धावांचा पल्ला गाठता आला. गोव्यासाठी दर्शन मिसाळने ४, लक्षय गर्ग व हेरंब परबने प्रत्येकी दोन, तर मोहित रेडकरने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :
रेल्वे : पहिला डाव : २९७ धावा. दुसरा डाव बिनबाद ३१ धावांवरून ६३.३ षटकांत सर्वबाद २०८ (विवेक सिंग २१, सूरज आहुजा २१, प्रथम सिंग २८, मोहम्मद सैफ ५, उपेंद्र यादव ०, साहब युवराज सिंग ३४. आशुतोष शर्मा ८१, युवराज ०, आकाश पांडे ५, हिमांशू सांगवान नाबाद १. आदर्श सिंग ० धाव. गोलंदाजी : लक्षय गर्ग १६-२-५३-२, हेरंब परब १४-२-४२-२, फॅलिक्स आलेमाव ३-०-१९-०, दीपराज गावकर ३-०-९-०, मोहित रेडकर ११-२-४०-१, दर्शन मिसाळ १६.३-३-४४-४.)
गोवा : पहिला डाव : २०० धावा. दुसरा डाव : ३१ षटकांत १ बाद ९३ (सुयश प्रभुदेसाई नाबाद ५४, अमोघ देसाई १३, स्नेहल कवठणकर नाबाद २३ धावा. गोलंदाजी : आकाश पांडे १-२९).      

हेही वाचा