माऊंटन मॅरेथॉन स्पर्धेत गोव्याचा टॅडी कार्दोज विजेता

फ्रेंड्स ग्रुप अॉफ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन : ७०० धावपटूंनी पूर्ण केली शर्यत

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
12th February, 12:17 am
माऊंटन मॅरेथॉन स्पर्धेत गोव्याचा टॅडी कार्दोज विजेता

फ्रेंड्स ग्रुप अॉफ चॅरिटेबल ट्रस्ट च्या ६व्या मांऊटन मॅरेथॉन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे प्रदान करताना सहकार मंत्री सुभाष शिरोडकर. सोबत दुमिंग वाझ, जयेश नाईक दुर्गाप्रसाद रामानंद.

बोरी : फ्रेंड्स ग्रुप अॉफ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सहावी आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग असलेली व गोव्यातील एकमेव माऊंटन मॅरेथॉन स्पर्धा गोव्याचा धावपटू टॅडी कार्दोज यांनी जिंकली १२५० फूट उंचीवर असलेल्या श्री सिद्धनाथ पर्वतावर मंदिराला वळसा घालून परत श्री गोपाल कृष्ण मंदिराच्या आवारात एकूण १५ किलोमीटरचे अंतर कापून टॅडिने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील द्वितीय स्थानावर सुनील झोरे, तृतीय संतोष मुर्मु यांनी पुरस्कार पटकावले. एकूण सात विभागांत ५ कि‌.मी., १५ कि.मी. शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पर्धेचे बावटा दाखवून स्पर्धेला प्रारंभ केला. यावेळी त्यांच्या सोबत सरपंच दुमिंग वाझ, पंच जयेश नाईक, ट्रस्टचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद रामानंद, सुध‍ीर शिंदे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत यंदा विक्रमी स्पर्धक सहभागी झाले होते, असे यावेळी दुर्गाप्रसाद रामानंद यांनी सांगितले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. शिरीष बोरकर, ज्येष्ठ स्पर्धक शिक्षक पद्मनाभ प्रभुदेसाई यांनी आपले अनुभव व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण सोहळ्यात सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी फ्रेंड्स ग्रुप अॉफ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. शेवटी सुधीर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. ५ किमी (पुरुष गट) : प्रथम जलेश नाईक, द्वितीय रामनाथ नाईक, तृतीय विनोद नाईक. ५० वर्षांवरील पुरुष गट (५ किमी) : प्रथम बाबु गावकर, द्वितीय हरी वेळीप, तृतीय प्रवीण गडकरी. ५ किमी (महिला गट) : प्रथम अंकिता वेळीप, द्वितीय सिया नाईक, तृतीय नेहा गावकर. ५० वर्षांवरील महिला गट (१५ किमी) : प्रथम ज्युडिथ डिकॉस्ता, द्वितीय इंदिरा कॅस्थिलो, तृतीय मारिया मार्था जिनिविवीलीया. ५० वर्षांखालील महिला गट (१५ किमी) : प्रथम सपना पटेल, द्वितीय सिमरन, तृतीय अपूर्वा नाईक, ५० वर्षांवरील पुरुष गट (१५ किमी) : प्रथम प्रणय नाईक, द्वितीय शैलेश नाईक, तृतीय शामसुंदर सरमळकर. ५० वर्षांखालील पुरुष गट (१५ किमी) : प्रथम टॅडी कार्दोज, द्वितीय सुनील झोरे, तृतीय संतोष मुर्मू.