स्व-चित्ताचे मोल देऊन बोल विकत घ्या!

श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले सगळे तत्वबीज मी तुम्हाला सांगेन. ते तुम्ही मनाच्या कानांनी ऐका आणि बुध्दीच्या डोळ्यांनी बघा. तुमच्या चित्ताची किंमत देऊन इथले हे बोल विकत घ्या आणि एकाग्रतेच्या हाताने ते तुमच्या हृदयात नेऊन सोडा! ते बोल ज्ञानियांची बुध्दी संतुष्ट करून स्व-हितास शांती प्रदान करतील.

Story: विचारचक्र |
11th February, 09:42 pm
स्व-चित्ताचे मोल देऊन बोल विकत घ्या!

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुध्दकिल्बिष:।

अनेकजन्मसंसिध्दस्ततो याति परां गतिम् ।।४५।।

सरळ अर्थ : जर याप्रमाणे मंद प्रयत्न करणाऱ्या योग्यालाही परमगती प्राप्त होते, तर हे काय सांगावयास पाहिजे की अनेक जन्मांपासून अंत:करणाची शुध्दीरूप सिध्दी मिळवलेला आणि अतिशय प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापांपासून उत्तम प्रकारे शुद्ध होऊन त्या साधनाच्या प्रभावाने परम गतीप्रत पावतो अर्थात् त्याला परमात्मप्राप्ती होते.

विस्तृत विवेचन : स्वानुभवातून प्रत्ययास आलेल्या ब्रह्मस्थितीचे वर्णन शब्दब्रह्माच्या आपल्या सर्वसंपन्नतेने करण्याचा एक प्रयत्न संत करत आहेत. अशा प्रकारे हजारो जन्मांचे कोट्यवधी वर्षे प्रत्ययास येणारे प्रतिबंध ओलांडून, संसारसागर ओलांडून त्या पलिकडचे आत्मसिद्धि-तीर ज्या जीवाने गाठले, त्याला आपोआपच सगळी साधने साध्य झालेली असतात. असा तो साधक मग अनायासे विवेकाच्या राज्यावर बसतो आणि मग होता होता हळूहळू स्वरूपी विचाराचा वेग स्थिरावल्याने विवेकही माघार घेतो. तिथे हे अर्जुना, तो साधक जडून राहतो! तिथे मनाचा मेघ व त्याला वाहून नेणाऱ्या वाऱ्याचा वारेपणाही विरून जातो. चिदाकाशही आपल्याच ठिकाणी पूर्णपणे मुरून जाते. ओंकाराचे टोकही न दिसण्याइतपत बुडून गेल्यासारखे झाल्याने शब्दातीततेचे अवर्णनीय सुख त्याला अनुभवायला मिळते. याप्रमाणे आधीच बोलाला मौन पडल्यामुळे सगळ्या गतींची अमूर्त अशी गती जी ब्रह्मस्थिती, तिची तो साधक स्वतः मूर्ती होऊन राहतो. त्याने जन्मजन्मांतरी मनाच्या चंचलतेचा केर झाडलेला असल्याने हा जन्म प्राप्त होताच त्याची लग्न-घटी खऱ्या अर्थाने बुडून त्याला ब्रह्माशी एकरूप होण्याचा मुहूर्त लाभतो.

जसा एखाद्या विरळ ढगाचे वस्तुमान विरळ विरळ होत जाऊन शेवटी तो आकाशाशी तद्रूपता पावतो, त्याप्रमाणे हा साधक ब्रह्मस्वरूपात विलीन होऊन त्याच्याशीच अभिन्न होऊन जातो. ज्या स्वरूपापासून हे समस्त दृश्यादृश्य विश्व निर्माण होते व ज्या स्वरूपात ते पुन्हा लीन होते, तेच स्वरूप हा साधक स्वतः विद्यमान देहाने होऊन राहतो.

तपस्विभ्योsधिको योगी ज्ञानिभ्योsपि मतोधिकः ।

कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ।।४६।।

सरळ अर्थ : कारण, योगी तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे व शास्त्रज्ञांहूनही श्रेष्ठ मानला गेला आहे. त्याचप्रमाणे सकाम कर्म करणाऱ्यांहून देखील योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो!

विस्तृत विवेचन : आपल्या बाहूंच्या व धैर्याच्या क्षमतेवर विसंबून अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह (म्हणजे दान घेणे) या षट्कर्मांच्या प्रवाहात उडी घालणारे कर्मनिष्ठ; किंवा ज्ञानाचे कवच लेऊन आयुष्याच्या रणांगणात प्रपंचाशी नि:शंक झुंजणारे ज्ञानीजन; किंवा तपाची कास धरून अत्यंत निसरडा व अवघड असा तपोदुर्गाचा कडा चढू पाहणारे तपस्वी; या सगळ्यांसाठी भजनीय, यजनीय, पूजनीय व अंतिमत: प्राप्य अशी एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे परब्रह्म. ते साधकांचे साध्य व मोक्षाचे स्वरूप असे प्रत्यक्ष परब्रह्म जो (योगी) आपण स्वतः झालाय तो (आणि या जगात तोच एक) त्यायोगे सगळ्या कर्मनिष्ठांना, ज्ञाननिष्ठांना आणि तपोनिष्ठांना जाणण्यास योग्य व आद्यवंद्य होय. परम् पावन अशा जीव-परमात्मा संगमात ज्याचे मन सर्वतोपरी लीन झाले आहे असा तो योगी. हे अर्जुना, जरी देहधारी असला, तरी त्या देहासकट तो आद्यवंद्याच्या थोरवीस पोचतो. म्हणून हे पंडू सुता, माझे तुला असे सांगणे आहे की, सदा सर्वदा तू चित्ताने योगी हो.

योगीनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।

श्रध्दावान्भजते यो मां स मे युक्ततमो मत: ।।४७।।

सरळ अर्थ : सर्व योग्यांमध्ये ही जो श्रध्दापूर्ण योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला निरंतर भजतो तो योगी मला परम श्रेष्ठ वाटतो.

विस्तृत विवेचन : भक्तीचा परमोच्च बिंदू कधी साधला जातो म्हणायचा, तर भक्ताने ज्याची भक्ती करायची तोच जेव्हा भक्ताचे भजन करायला लागतो तेव्हा. योग्याला जेव्हा स्वानुभवाच्या आधारे अखंडित असे माझे स्वरूप प्राप्त झाल्याचे जाणवते, तेव्हा त्याला ही अनुभूती होते. अखंड एकरूपता झाल्यावर परस्परांतील प्रेमभाव शब्दांनी कसा वर्णन करेल? तिथे देह मी व तो आत्मा ही एकच उपमा यथार्थ ठरते.

"चकोराचा चंद्र" ही एक कल्पना आहे. त्यात चकोर नावाचा जो एक पक्षी असतो तो केवळ चंद्राच्या चांदण्यावर जगतो, असे म्हटले जाते. म्हणजे जसा चंद्र चकोरासाठी तसेच परब्रह्म हे सगळ्या ज्ञाताज्ञात विश्वासाठी होय. असे गुणाचा सागर देवकीकृष्णाने कुंती पुत्र अर्जुनाला सांगितल्याचे संजयाने राजा धृतराष्ट्राला विदीत केले.

पार्थाच्या ठायी श्रवणाची आस्था होतीच. तीच आता द्विगुणित झाल्याचे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. आपण जे काही सांगतोय ते यथार्थपणे ग्रहण करण्यासाठी अर्जुन स्वतः दर्पण झालाय हे जाणून त्याचे (श्रीकृष्णाचे) चित्त साहजिकच तृप्त झाले आणि अशा आनंदाच्या बहरात श्रीकृष्ण गीतातत्वाचे निरूपण करेल ते प्रसंग पुढे यायचे आहेत, ज्यायोगे खऱ्या अर्थाने शांतरसाचे प्रकटीकरण होईल.

भात व इतर धान्यांच्या बिया आत (म्हणजे मातीच्या मडक्यात) घालून बाहेरून पेंढा अगर गवत यांचे आवरण घालून त्यावरून सुंभाने अगर दोरीने बांधून एक अंडाकृती गाठोडे त्या बीजांच्या साठवणीसाठी तयार करतात. त्याला "कणगा" वा "मुंडा" अशी संज्ञा आहे. हे झाले अन्नधान्य बियांच्या बाबतीत. सिध्दांत संकल्पनांची जी बियाणी आहेत ती भरून ठेवलेला जो मुंडा आहे, तो प्रत्यक्ष योगधाम असलेल्या श्रीकृष्णासारख्या विभुतींनाच ठावा असतो. तो श्रीकृष्णाकडून उघडला गेला की त्यायोगे सत्वगुणाचा वर्षाव होतो. त्यायोगे श्रोतयांच्या भावनांना बहर येतो. त्यायोगे आधिव्याधिस्वरूप आध्यात्मिक दु:खाची सगळी ढेकळे विरून जातात. भाविक-चित्ताचे चतुर असे ते वाफे अनायासे सिद्ध झाले की त्यावर अवधानाच्या पेरणीचा सुवर्णसमय येतो. श्री ज्ञानदेव म्हणतायत की, अशी परिस्थिती आत्ता इथे अनायासे निर्माण झालेली असल्याने श्रीगुरू निवृत्तिनाथांना त्या वाफ्यात ज्ञानबीज पेरण्याची इच्छा झाली आणि ते अपूर्व कर्म करण्यासाठी त्यांनी मला बी पेरण्याचे औजार करून आपल्या आशीर्वादरूप हाताने ते बी माझ्यात घातले आहे, तुमच्या भाव-चित्ताच्या वाफ्यात पेरण्यासाठी. ते तुमच्यासारख्या सज्जनांना निश्चितच प्रमाण होईल याची मला खात्री आहे. ते श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले सगळे तत्वबीज मी तुम्हाला सांगेन. ते तुम्ही मनाच्या कानांनी ऐका आणि बुध्दीच्या डोळ्यांनी बघा. तुमच्या चित्ताची किंमत देऊन इथले हे बोल विकत घ्या आणि एकाग्रतेच्या हाताने ते तुमच्या हृदयात नेऊन सोडा! ते बोल ज्ञानियांची बुध्दी संतुष्ट करून स्व-हितास शांती प्रदान करतील.

(६ वा अध्याय ज्ञानयोग समाप्त)

मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३