माझी गिरनार यात्रा

तोंडाने श्री दत्तांचे नामस्मरण करत एक एक पायरी चढून गुरु शिखर गाठले. सर्वप्रथम श्री दत्तांची सुंदर मूर्ती पाहिली आणि दत्तांच्या पादुकांवर डोके ठेवले. सोबत आणलेला नारळ वाहिला... मन भरून आले, डोळे पाणावले. हा क्षण असाच रेंगाळत राहावा आणि इथून उठूच नये असे सारखे वाटत होते.

Story: भटकंती |
10th February, 12:19 am
माझी  गिरनार यात्रा

आपली भारतीय संस्कृती मंदिरातून, मठातून, आश्रमातून विकसित होत असतानाच पवित्र मंगल अशा वातावरणाची निर्मितीही होते. आपण नेहमी आपल्या कुलदेवता, त्यांचे दर्शन आणि त्याचबरोबर इतर देव-देवतांचेही दर्शन घेतो. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांची महती, देवत्व साऱ्या दुनियेत भरून राहिले आहे म्हणून आपण नेहमीच म्हणतो जन्मा यावे आणि पंढरीसी जावे. पंढरीच्या विठोबाचे दर्शन झाले नाही असा माणूस शोधून सापडणे कठीण. अर्थात आपल्या  धर्मातील परमेश्वराच्या भेटीसाठी आपण नेहमी उत्सुक असतो. आपल्याला   देवाच्या पायावर डोके ठेवून मागणे मागायचे असते.

मी दोन वर्षांपूर्वी अशीच अनपेक्षितपणे कुरवपूर, पिठापूर यात्रा केली. पिठापूर येथे श्री दत्तात्रयांचे जन्मस्थान असून त्यांच्या पादुकांचे दर्शन म्हणजे अमृततुल्य योगच म्हणायला हवा. पादुकावरील रुद्राभिषक सोहळा डोळे भरून पाहिल्यानंतर   गिरनार चढून श्री दत्ताची भेट घ्यावी असे सारखे मनात येत असे. पण दहा हजार पायऱ्या चढायच्या कशा हा प्रश्नही मनाला  सतावत होता. वयाची सत्तरी क्रॉस केलेली माणसेसुद्धा पायऱ्या चढून जातात हे ऐकून मलाही शक्य होईल असे सारखे वाटू लागले. पण मी माझ्या मताशी ठाम नव्हते. पुढे तिथे रोपवेंची सेवा सुरू झाल्यानंतर मात्र माझ्या मनाचा पक्का निश्चय झाला. पण बोलावणे यायचे बाकी होते. अशीच एका संध्याकाळी मी सहज दुर्ग मल्हारची टूर मॅनेजर अश्विनीला फोन केला आणि गिरनार यात्रेला जायची इच्छा बोलून दाखवली.  आश्चर्य म्हणजे गिरनार साठीचे बुकिंग झाले होते. पण एकटीला ते कॅन्सल करावे लागत होते. त्या ठिकाणी तुम्ही येणार का असे विचारताच  मी मागचा पुढचा काहीच विचार न करता तत्क्षणी हो म्हणून टाकले. गुरु महाराजांनी कौल दिला असावा असेच वाटले.

सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि २३ तारखेला पहाटे यात्रेसाठी मार्गस्थ झाले.  गोव्यातून आम्ही पाच जणी निघालो होतो. पाच वाजता संध्याकाळी बॉम्बे सेंट्रलला पोहोचलो विश्रांती, जेवण करून बरोबर दहा वाजता राजकोटला जाणाऱ्या गाडीसाठी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. तिथे आमचे टूर मॅनेजर व इतर  यात्रीही आले होते. टूर मॅनेजरने सर्वांची ओळख करून घेतली आणि आम्ही गाडीत चढलो. सकाळी नऊ वाजता गाडी राजकोटला पोचली. तिथून एसी  बसने जुनागड गाठले. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी तलेठी येथे भारती आश्रमात सर्वांची राहायची व्यवस्था केली होती. थोडी विश्रांती घेऊन दुपारी जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलो. सुग्रास पंचपक्वांनासह अनलिमिटेड थाळी होती. भूकही लागली होती. जेवणावर मस्त ताव मारला. इथून परत येताना वाटेत जुनागड किल्ला, दामोदर कुंड, श्रीकृष्ण मंदिर, अन्नपूर्णा मंदिर वगैरे पाहिली व आश्रमात येऊन थोडी विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर भारती आश्रमाच्या आवारातील श्री शंकराच्या मंदिरात गेले. तिथे संध्याकाळच्या आरती चालू होत्या. खूप प्रसन्न वातावरण होते. तिथून जवळच गोशाळा आहे तसेच एक निवासी स्कूल सुद्धा आहे. तिन्ही  सांजेला सगळी मुले ओळीत बसून स्तोत्रे म्हणतात. येथील वातावरण खूपच मोकळे व सुंदर आहे.

रात्रीच्या जेवणाआधी टूर मॅनेजर विवेक यांनी दुसऱ्या दिवशीच्या सर्व सूचना स्पष्टपणे सांगितल्या. यात्रेला पहिल्या पायरीपासून चालत जाणाऱ्यांनी रात्री बारानंतर निघायचे होते, तर रोपवेने जाणाऱ्यांनी सकाळी सहा वाजता तयार होऊन  जायचे होते.

आम्ही रोपवेने जाणार असल्यामुळे सकाळी सहा वाजता तयार होऊन रोपवेच्या ठिकाणी आलो. ऑनलाइन तिकीट काढलेल्यांना आधी सोडले होते. आमची ऑनलाईन तिकीट असल्यामुळे आम्ही पहिल्याच फेरीला  गेलो. रोपवेतून जाताना गिरनारच्या आम्ही न चढलेल्या पायऱ्यांचे दर्शन होत होते आणि ती वाट किती कठीण आहे त्याची ही जाणीव झाली. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात पर्वत शिखरे खूपच सुंदर दिसत होती. आम्हाला तिथपर्यंत जायची ओढ लागली होती. अंबाजीला उतरल्यावर आमच्या सोबत असलेल्या हर्षदाने आम्हाला प्रत्येकाला एक एक काठी दिली आणि सर्वांनी मिळून प्रार्थना केली व गिरनार चढायला सुरुवात केली.

सुरुवातीला थोड्या पायऱ्या चढल्यावर मध्ये थोडा सपाट भाग पुन्हा पायऱ्या असं चढत आम्ही गोरक्षनाथला पोहोचलो. पण गोरक्षनाथांचे दर्शन येताना घ्यायचे असल्यामुळे आम्ही थेट पुढे चालत गेलो. आता इथून आम्हाला जवळजवळ दीड हजार पायऱ्या उतरून जायचे होते. लक्ष सगळे  पायऱ्यावर केंद्रित करून हातातली काठी व पाय पुढे पुढे टाकत चालले. आणि कधी कमानीपाशी येऊन पोहोचले हे मला कळले सुद्धा नाही. इथे दोन कमानी आहे. डाव्या कमानीतून  आठशे पायऱ्या चढून गुरुशिखर गाठायचे होते तर उजव्या बाजूची कमान ही कमंडलू तीर्थाकडे जाणारी होती. मी प्रथम गुरुशिखराकडे चालले. तोंडाने श्री  दत्तांचे नामस्मरण करत एक एक पायरी चढून गुरु शिखर गाठले. सर्वप्रथम श्री दत्तांची सुंदर मूर्ती पाहिली आणि  दत्तांच्या पादुकांवर डोके ठेवले. सोबत आणलेला नारळ वाहिला... मन भरून आले, डोळे पाणावले. हा क्षण असाच रेंगाळत राहावा आणि इथून उठूच नये असे सारखे वाटत होते. पण दर्शन तर सगळ्यांनाच घ्यायचे असते. त्यामुळे जास्त वेळ थांबू देत नाहीत. देवाच्या  पायावरचे प्रसादाचे फूल घेतले आणि प्रदक्षिणेला मागे गेले. रेंगाळत  प्रदक्षिणा घातली तेवढाच श्रीदत्तांचा सहवास. श्री दत्तांच्या पाठीमागे गेल्यावर एक खड्डा दिसतो तिथे श्री शंकराचे स्थान आहे त्याचे दर्शन घेतले. जड अंतकरणाने पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आता अगदी हलके हलके वाटत होते. थकवा कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. श्री दत्त भेटल्याच्या आनंदात एकेक पायरी उतरत कमानीपाशी पोहोचले.

उजव्या बाजूच्या कमानीतून खाली सव्वाशे पायऱ्या उतरून कमंडलू तीर्थाकडे पोहोचले. यावेळी माझ्याबरोबर हर्षदा होती आणि मानसी सुद्धा. धुनीचे दर्शन घेतले. धुनी फक्त दर सोमवारीच पेटते. त्यामुळे पेटलेली धुनी पाहायला नाही मिळाली. पण आज गुरुवार होता पौष पौर्णिमा होती आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा होता. हेही नसे थोडके. गुरुजींनी प्रसाद दिला त्या प्रसादाच्या  पिशवीत धुनीतील अंगारा होता,  प्रसाद होता श्रीदत्तांचा फोटो होता आणि एक रुद्राक्ष होता.

दर्शन घेतल्यावर आतील बाजूस भोजनाचा प्रसाद ग्रहण करून तृप्त मनाने पायऱ्या चढून वर कमानीपाशी आलो. आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. दीड हजार पायऱ्या चढून गोरक्षनाथांकडे जायचे होते. आता कसलेच टेन्शन नव्हते त्यामुळे सावकाश पायऱ्या चढत गोरक्षनाथांच्या मंदिरापाशी पोहोचले. दोन पायऱ्या वर  चढून जाताच छोट्याशा  घुमटीत मारुती राय दिसले. त्यांना नमस्कार केला आणि पुढे  गोरक्षनाथांच्या पायावर डोके ठेवले. नमस्कार केला. खोबऱ्याचा प्रसाद घेतला आणि प्रदक्षिणेला मागे गेले. समोर मध्यान्हीच्या सूर्याच्या तेजाने तळपणारे सुंदर गुरुशिखर दिसत होते. फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, सोबत सेल्फीही काढली. गुरुशिखरापेक्षा  किंचित उंचावर गोरक्षनाथांचे शिखर आहे. गोरक्षनाथ हे श्री दत्तांचे परमप्रिय भक्त. गुरुला नेहमीच आपला भक्त श्रेष्ठ  वाटतो म्हणून असेल.

तेथील मंदिरातील इतर मूर्तींचे दर्शन घेऊन थोडा वेळ तिथे विश्राम करून पुढे निघाले. खूप पायऱ्या चढून   अंबा मातेचे दर्शन घेतले. थोडा वेळ विश्रांती घेतली खाली येऊन एका ठिकाणी बसून सरबत प्यायलो आणि परत रोपवेने खाली आलो. कृतकृत्य झाल्याचे समाधान होते, मन तृप्त झाले होते, जीवनाचे सार्थक आणि सोने हे झाले होते. त्या आनंदातच आश्रमात   पोहोचलो. आमच्यासाठी जेवण तयार होते. त्याआधी मसाज करून घेतला खूप मस्त वाटले. जेवले आणि ताणून दिले. मन मात्र गुरुशिखरावरच होते डोळ्यासमोर सारखे अनुभवलेले दृश्य येत होते. जे मला अशक्य वाटत होते ते शक्य झाले होते तेही डोली वगैरे न करता स्वतः चालत जाऊन दर्शन घेतले याचा आनंद झाला होता. हे सगळे केवळ गुरुकृपेने शक्य झाले होते. मी गुरुना पुन्हा एकदा मनोमन नमस्कार केला आणि झोपेच्या आधीन झाले.


शुभदा मराठे