त्या बनल्या कित्येक नवजात शिशुंच्या आई... गंगी वरक (मोडक)

जन्मदात्री आई असली तरी बाळाच्या संगोपनाचे काम हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे १९८० सालापासून ज्या ज्या शिशुंना त्यांनी तेलमालीश करून त्यांचे आरोग्य राखले, या सर्व मुलांच्या त्याही एक प्रकारे आईच बनल्या आहेत.

Story: तू चाल पुढं |
10th February, 12:17 am
त्या बनल्या कित्येक नवजात शिशुंच्या आई... गंगी वरक (मोडक)

आईच्या पोटात नऊ महिने वास्तव्य केल्यावर नवजात शिशुचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा त्याची काळजी योग्य प्रकारे आणि अतिशय काळजीपूर्वक घ्यावी लागते. कारण आईच्या पोटात असताना बाळ सुरक्षित आवरणात असते आणि बाहेर आल्यावर त्याला बाहेरील वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते.

बाळ जन्माला येते तेव्हा त्याची रोज तेल मालीशने आंघोळ करण्यासाठी खास बाईची (वैजिण) नेमणूक केली जाते. आजच्या बदलत्या युगात या वैजिणीची संख्या कमी होत चालली आहे कारण नवजात शिशुला तेलमालीश करून आंघोळ घालणे ही व्यवस्था आजच्या पिढीला रुचत नाही. त्यामुळे एका छोट्याशा टबात छोट्या शिशूची आंघोळ उरकण्याला पसंती दिली जाते. काही आया मात्र नवजात शिशुला पारंपरिक पद्धतीने तेल मालीश करून आंघोळ घालण्याला आपली पसंती देतात.

दाबेल, पैंगिण-काणकोण येथील ६६ वर्षांच्या गंगी वरक (मोडक) या १९८० सालापासून गेली ३५ वर्षे वैजिणीचे काम करत आहेत. काणकोण भागात नवजात शिशु जन्माला आले की लगेच गंगी यांची आठवण काढली जाते व त्यांना नवजात शिशुला पारंपरिक पद्धतीने आंघोळ घालण्यासाठी खास आमंत्रित केले जाते. काणकोणातील दुर्गम भागातील अनेक खेड्यात जाऊन गंगी आपले हे काम करत आहेत. २०१२ साली त्यांचे पती धाकलू मोडक यांचे निधन झाल्यावर त्यांनी हिंमत न हारता आपले काम चालू ठेवत आपल्या आलोक आणि छाया या दोन मुलांचा सांभाळही न डगमगता केला.

नवजात शिशुची त्वचा फार नाजूक असल्यामुळे त्याच्या त्वचेला सोसवेल इतकेच गरम तेल मालीश करण्याकरता घ्यावे लागते. बाळाला प्रथम हातापायाच्या तळव्याला तेल लावून झाल्यावर त्याच्या बेंबीत तेल घातले जाते. त्याच्या डोक्यावर तेल थापून त्याची टाळू भरण्यात येते आणि मग त्याच्या संपूर्ण अंगाला तेलाने रगडून मालीश केले जाते. हे तेल जास्त करून खोबरेल तेल असते. बाळाला तेलाने मालीश केल्याने त्याचे अंग हे निसरडे झालेले असते. त्यामुळे मालिश झाल्यावर त्याला आंघोळीसाठी नेताना ते हातातून निसटण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला योग्य रितीने सांभाळावे लागते असे गंगी सांगतात.

बाळाला आंघोळ घालताना पायाखाली पाट घेणे, जेणेकरून बाळाचे तोंड उंचावर राहील अशी सावधगिरी बाळगावी लागते. बाळाच्या अंगावरील तेल काढण्यासाठी बेसन पीठ आणि हळदीचे मिश्रण लावून हे तेल काढावे लागते आणि मग लहान मुलांच्या खास साबणाने आंघोळ घालावी लागते. आंघोळ झाल्यावर त्याला मऊसूत कपड्याने पुसून त्याला धूप दाखवला जातो. जेणेकरून बाळाच्या अंगाला छान शेक मिळून उबदारपणा प्राप्त होतो आणि बाळाच्या अंगावर काही ओलसरपणा असल्यास तो नाहीसा होतो. मग बाळाला तीट लावून, काजळ लावून त्याला दुपट्यात गुंडाळले जाते. अंगाला तेलाची छान मालीश, कोमट पाण्याची आंघोळ आणि मग छानसा शेक मिळाल्याने दुपट्यात गुंडाळलेले बाळ मस्तपैकी झोपी जाते. बाळाच्या वाढीसाठी बाळाला ही गाढ झोप मिळणे आवश्यक असते. शांत झोपी गेलेले हे बाळ पाहताना गंगी यांच्या चेहर्‍यावर समाधान झळकते.

त्यांच्या हाताची उबदार मालीश व आंघोळ मिळालेली मुले आज मोठी होताना निरोगी आयुष्य जगत आहेत, हे सर्व अनुभवताना त्यांना विशेष आनंद होतो असे त्या म्हणतात. वैजिणीचे काम करताना जर मुलांना हगवण, उलटी असे  बारीक सारिक आजार झाले, तर त्या झाडपाल्याची आयुर्वेदिक औषधेही देतात. त्यांनी दिलेल्या या औषधाचा तत्काळ परिणाम होतो आणि बाळ परत पूर्वपदावर येते.

हे सर्व करता असताना गंगी यांची जास्त अपेक्षा अजिबात नसते. बाळाच्या घरातील सदस्य जे काही मोबदला देतील, त्यावर त्या समाधान मानतात. त्यांची आलोक आणि छाया ही दोन्ही मुले आज उच्चशिक्षीत आहेत आणि गंगी यांना याचा अभिमान आहे.


कविता प्रणीत आमोणकर